Android app on Google Play

 

श्री कपालेश्वर महादेव

 

श्री कपालेश्वर महादेवाच्या महिमेचे साक्षी स्वतः महादेव आहेत. श्री कपालेश्वर महादेवाची आराधना करून स्वतः महादेवाच्या ब्रम्ह हत्या दोषाचे निवारण झाले होते.
पौराणिक कथांनुसार त्रेता युगात एकदा ब्रम्हदेव यज्ञ करत होते. हा यज्ञ महाकाल वनात केला जात होता. तिथे ब्राम्हण बसलेले होते आणि आहुती देत होते. तेव्हाच भगवान शंकर भस्म धारण करून कपाल हातात धरून विकृत रुपात तिथे प्रकट झाले. त्यांना या रुपात पाहून ब्राम्हण अत्यंत क्रोधीत झाले आणि त्यांचा अपमान केला. तेव्हा कापालिक वेश धारण केलेल्या भगवान शंकरांनी सांगितले की ब्रम्ह हत्येचे पाप नष्ट करण्यासाठी मी कपाल धारण करण्याचे व्रत घेतले आहे. हे व्रत पूर्ण झाल्यानंतर मला सद्गती प्राप्त होईल.


तेव्हा कृपा करून मला आपल्या सोबत बसू द्या. तेव्हा ब्राम्हणांनी त्यांना नकार देऊन तिथून निघून जाण्यास सांगितले. यावर शंकर म्हणाले की थोडा वेळ माझी प्रतीक्षा करा, मी भोजन आटोपून येतो. तेव्हा ब्राम्हणांनी त्यांना मारायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या हातातील कपाल खाली पडून फुटले. आणि तसेच ते पुन्हा प्रकट झाले. ब्राम्हणांनी क्रोधीत होऊन कपालाला ठोकर मारली. ज्या ठिकाणी कपाल पडले तिथे शेकडो कपाल निर्माण झाले. ब्राम्हणांनी ते पुन्हा फेकले तर करोडो कपाल निर्माण झाले. तेव्हा आश्चर्याने थक्क झालेल्या ब्राम्हणांना लक्षात आले की हे कार्य महादेवाचेच आहे.
मग ब्राम्हणांनी शतरुद्र इत्यादी मंत्रांनी हवन केले. तेव्हा शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी ब्राम्हणांना वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा ब्राम्हण म्हणाले की अज्ञानाने आमच्या हातून घोर पाप घडले आहे, आमच्याकडून ब्रम्ह हत्या झाली आहे, कृपया त्याचे निवारण करण्याचा उपाय सांगा. तेव्हा भगवान शंकरांनी सांगितले की ज्या ठिकाणी कपाल पडले होते तिथे अनादिलिंग महादेवाचे लिंग आहे जे काळाबरोबर बुजले गेले आहे. त्या लिंगाचे दर्शन घेतल्याने ब्रम्ह हत्येचा दोष निवारण होईल.
भगवान शंकरांनी पुढे ब्राम्हणांना सांगितले की एकदा ब्रम्हदेवाचे पाचवे मस्तक कापल्याने त्यांना ब्रम्ह हत्येचे पातक लागले होते आणि ब्रम्हदेवाचे मस्तक त्यांचं हाताला लागले होते. त्या दोषाने त्यांचे अंतःकरण क्षोभाने भरून टाकले होते, त्या दोषाचे निवारण करण्यासाठी त्यांनी कित्येक तीर्थस्थळ पालथी घातली परंतु ब्रम्ह हत्येचा दोष काही केल्या निवारण होईना. तेव्हा आकाशवाणी झाली की महाकाल वनात गजरूपाजवळ दिव्य लिंग आहे त्याची आराधना करावी. तेव्हा ते महाकाल वनात आले आणि त्या दिव्य लिंगाचे दर्शन केल्यावर त्यांच्या हातून ब्रम्हदेवाचे मस्तक कपाल खाली पृथ्वीवर पडले. त्या लिंगाचे नाव कपालेश्वर ठेवले गेले. शंकराच्या सांगण्यानुसार त्या ब्राम्हणांनी त्या लिंगाचे दर्शन घेऊन भक्तिभावाने पूजन केले आणि त्यांची समस्त पापे नष्ट झाली.
असे मानले जाते की कपालेश्वर महादेवाच्या दर्शनाने कठीण मनोरथ पूर्ण होतात आणि सर्व पापे नष्ट होतात. चतुर्दशीच्या दिवशी या लिंगाच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. श्री कपालेश्वर महादेवाचे मंदिर उज्जैन मध्ये बिलोटीपुरा मधील राजपूत धर्मशाळेच्या जवळ आहे.