Android app on Google Play

 

श्री लोकपालेश्वर महादेव

 

दैत्यांचे देवतांवर वाढत जाणारे प्रभुत्व आणि देवतांच्या शिव आराधनेद्वारा दैत्यांचा संहार, यांच्याशी निगडीत आहे लोकपालेश्वर महादेवाची कथा. पौराणिक कथांनुसार प्राचीन काळी हिरण्यकश्यपू द्वारा अनेक दैत्यगण उत्पन्न झालेले होते. त्यांनी वने, पर्वत इथे जाऊन आश्रम नष्ट करून संपूर्ण पृथ्वीवर उलथापालथ करून ठेवली. यज्ञ बंद पडले. वेदांचे ध्वनी ऐकू येईनासे झाले. पिंडदान देणे बंद झाले आणि पृथ्वी यज्ञ रहित झाली. तेव्हा लोकपाल (देवता) भयभीत होऊन भगवान विष्णूंकडे गेले हात जोडून आणि प्रार्थना करू लागले की हे प्रभू, तुम्ही या आधी देखील नमुचि, वृषभरवन, हिरण्यकशिपु, नरकासुर, मुरनामा यांसारख्या भयंकर दैत्यांपासून आमचे रक्षण केले आहे. कृपा करून या दैत्यांपासून देखील आमचे रक्षण करा. आम्ही तुम्हाला शरण आलो अहोत.


इकडे दैत्य आपले आधिपत्य वाढवत जाताच होते. मग स्वर्गात जाऊन त्यांनी इंद्राला, दक्षिण देशेला धर्मराजाला, पश्चिम देशेला जाऊन जलराज वरुणाला आणि उत्तर दिशेला जाऊन कुबेराला जिंकून घेतले. तेव्हा भगवान विष्णूंनी सर्व देवताना व्याकूळ अवस्थेत बघून त्यांना महाकाल वनात जाण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की महाकाल वनात जा आणि देवाधिदेव भगवान शंकराची आराधना करा. हे ऐकून सर्व लोकपाल महाकाल वनात आले, परंतु इथे देखील दैत्यांनी त्यांच्या मार्गात अडथळा आणला.
तेव्हा मग भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून ते अंगाला भस्म फासून, घंटा – नुपूर – कपाल इत्यादी धारण करून कापालिक वेशात महाकाल वनात गेले. तिथे त्यांना एका दिव्य लिंगाचे दर्शन झाले. त्या लिंगाचे दर्शन घेऊन सर्व लोकपाल त्याची मनोभावे स्तुती करू लागले ज्याचा परिणाम म्हणून त्या लिंगातून भयंकर उग्र अशा ज्वाला बाहेर निघाल्या आणि जिथे जिथे दैत्य होते तिथे जाऊन त्या सर्वाना जाळून भस्म करून टाकले. समस्त लोकपालांनी या शिवलिंगाची स्तुती केली म्हणून हे दिव्य लिंग श्री लोकपालेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध झाले.
 मान्यता आहे की इथे दर्शन घेतल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. असे देखील मानले जाते की इथे दर्शन केल्याने शत्रूंवर विजय प्राप्त होतो. बाराही महिने इथे दर्शन घेता येते, परंतु संक्रांत, सोमवार, अष्टमी आणि चतुर्दशी या दिवसांत इथे दर्शनाचे विशेष महत्व आहे. उज्जैन मधील ८४ महादेव मंदिरांपैकी एक असलेले श्री लोकपालेश्वर महादेव मंदिर हरिसिध्द दरवाजा इथे उभे आहे.