Android app on Google Play

 

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ६

 

पांडवांना वारणावतास पाठवण्याच्या दुर्योधनाच्या बेतामागील कारस्थान भीष्माला उमगले नाहीं. विदुराला उमगले व आपल्यापरीने त्याने पांडवांना वांचवण्यासाठी साह्य केलें (वाड्यातून पळून जाण्यासाठी भुयार खणण्यासाठी आपला विश्वासू माणूस युधिष्ठिराकडे पाठवला), मात्र नवल म्हणजे त्याने आपला संशय भीष्माच्या कानावर मुळीच घातला नाहीं वा वारणावतास पांडवांना पाठवूं नये असें त्याने भीष्माला मुळीच विनवले नाहीं! असें कां झालें? भीष्म कांहीहि करणार नाहीं असें विदुराला वाटलें काय? महाभारत याबद्दल गप्प आहे! शेवटी वारणावतास जे व्हायचे ते झाले. वाड्याला लागलेल्या आगीतून पांडव व कुंती कसेबसे वांचले व परागंदा झाले. तीं वांचल्याची कुणकूण विदुराला लागलीच असणार पण त्याने तेहि भीष्माला कळूं दिले नाही. कौरवांनी पांडव व कुंती यांचे और्ध्वदैहिकहि केले असे महाभारत म्हणते. सत्य परिस्थितीबाबत भीष्म पूर्ण अंधारात राहिला.
द्रौपदीच्या स्वयंवराच्या मंडपांत वारणावतांतून वांचून परागंदा झालेले पांच पांडव ब्राह्मणवेषांत प्रगट झाले होते. अनेक वर्षांचा सहवास असूनहि, कौरवांपैकीं कोणीहि, भीष्मानेदेखील, त्यांना अजिबात ओळखले नाहीं. अर्जुनाने दुष्कर पण जिंकला तरीहि ’हा अर्जुन तर नव्हे’ अशी शंका कोणालाहि आली नाहीं. नंतर ’पण अखेर एका ब्राह्मणाने जिंकला’ म्हणून रागावलेल्या क्षत्रिय राजांबरोबर अर्जुन व भीम यांचे जोरदार युद्ध झाले त्यांत भीमाचे अफाट बळहि प्रगट झाले तरीहि युद्ध संपल्यावर इतरांप्रमाणे कौरव तसेंच भीष्महि पांडवांना अखेरपर्यंत न ओळखतां हस्तिनापुरास निघून गेले. पांडवद्रौपदी विवाहालाहि कौरवांकडून कोणी आलें नाहीं. काही काळ गेल्यावर पांडव-द्रौपदी–कुंती हस्तिनापुराला परत आल्यावर मग अखेर भीष्माने राज्याचा वांटा पांडवांना द्यावा असा सल्ला दिला. यावेळीं त्याने म्हटलें कीं ’वारणावत प्रकरणीं लोक मलाच दोष देतात’ ! खरे तर युधिष्ठिराला पूर्वीच यौवराज्याभिषेक केलेला होता तर मग आतां तो जिवंत परत आल्यावर धृतराष्ट्राचे जागीं त्यालाच हस्तिनापुरचे राज्य मिळावयास हवे होते. भीष्माने तसे केले नाहीच. राज्याचा वाटाहि खरे तर दिला नाही. ’खांडवप्रस्थास जाऊन तुम्ही राज्य करा’ असे पांडवांना म्हटले. तेथे खांडववन जाळून, नवीन प्रदेश वस्तीखाली आणून, नवीन इंद्रप्रस्थ राजधानी बनवून, नवेच राज्य पांडवांना मिळवावे लागले. या सर्व घटनांमध्ये भीष्माची न्यायबुद्धि दिसत नाही. आपला निर्णय धृतराष्ट्रावर वा दुर्योधनावर लादण्याची त्याची इच्छा वा तयारी नव्हती असे म्हणावे लागते. येथून पुढे त्याने दुर्योधनाच्या कुटिल बेताना कधीच प्रखर प्रतिकार केलेला नाही. दुर्योधनाचा सर्वाधिकार त्याने जणू मान्यच केलेला दिसतो.