Android app on Google Play

 

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग १

 

महाभारतात आरंभापासून अखेरपर्यंत वावरलेले एक प्रमुख पात्र म्हणजे भीष्म. आपल्या मनात भीष्माबद्दल फार आदरभाव असतो. तो अयोग्य वा अकारण आहे असे मुळीच म्हणतां येणार नाही. मात्र सर्व कथेमध्ये ज्या ज्या प्रसंगांत त्याची उपस्थिति आहे त्या अनेक प्रसंगांतील त्याचे वर्तन काही वेळा अनाकलनीय वाटते, त्याची संगति लागत नाही. अर्थात कल्पनारम्य वर्णने वा अद्भुतरस बाजूला ठेवून या विविध प्रसंगांकडे मानवी पातळीवरून पाहिले म्हणजे काही प्रष्नचिन्हे उभी रहातात. या दृष्टिकोनातून भीष्मकथेचा विस्ताराने आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.
भीष्माची जन्मकथा महाभारतात खूप विस्ताराने सांगितलेली आहे. ती शब्दश: घेतली तर काही प्रश्न नाही पण अद्भुतरस बाजूला ठेवला व तर्क वापरावयाचे म्हटले म्हणजे काही प्रश्न पडतातच. भीष्माचा पिता शांतनु, प्रतीप या त्याच्या पित्यानंतर राजा झाला. त्याचा जन्म त्याचा पिता प्रतीप खूप वृद्ध झाल्यावर झाला होता. प्रतीपाला देवापि व बाल्हीक असे दुसरे दोन पुत्र होते असेहि म्हटलेले आहे. देवापि राज्याचा लोभ सोडून तपश्चर्येला गेला होता. बाल्हीक व शांतनु दोघेहि राजे झाले असेहि एके ठिकाणी म्हटले आहे. मात्र बाल्हीक हस्तिनापुराचा राजा झाला नाही. त्याचे राज्य कोठे होते हे स्पष्ट नाहीं. बाल्हीक या नावाचा महाभारतात अनेक ठिकाणी, अनेक प्रसंगी उल्लेख आहे. कुरूंच्या दरबारात त्याचे अस्तित्व वेळोवेळी जाणवते ते थेट भारतीय युद्धापर्यंत. खुद्द भीष्मच युद्धापर्यंत खूप वृद्ध झाला होता मग त्याचा काका युद्धात होता? बहुधा त्याच्या वंशातील सर्वच पुरुषांचा ’बाल्हीक’ असाच उल्लेख होत असावा. (बाल्हीक म्हणजे अफगाणिस्तानातील ’बल्ख’ शहर असे एक मत वाचलेले आहे.)
शांतनूने राजा झाल्यावर छत्तीस वर्षे स्त्रीसुखाचा अनुभव घेतला पण त्याला तेव्हां अपत्य झाल्याचा उल्लेख नाही. त्याची पत्नी मृत झाली असे मात्र म्हटलेले नाही. त्यानंतर गंगा ही नदी मानव शांतनूची पत्नी झाली. ती ’नदी’ हे शब्दश: घेतले नाही तर ती गंगाकिनारच्या एखाद्या कुळातील मानव स्त्री मानावी लागते. गंगेने स्वत:चे व शांतनूचे सात पुत्र जन्मत:च मारून टाकले. कां? तिचे कुळ मातृसत्ताक असल्याने अपत्य पुरुष असेल तर नष्ट करणे हा तिच्या कुळाचा रिवाज होता कीं काय? श्री. विश्वास दांडेकर यांनी ’धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ मध्ये असाच तर्क केला आहे व मला तो सयुक्तिक वाटतो. तिने शांतनूला वरताना अटच घातली होती कीं ’मी करीन त्या कोणत्याही कृत्याला विरोध करावयाचा नाही, तसे केल्यास मी तुला सोडून जाईन’ त्यामागे हेच कारण असावे. गंगेला, राजा महाभिषाला (शांतनु हा त्याचा अवतार) व अष्टवसूंना स्वर्गांत मिळालेल्या शापांची कथा हे एक रूपकच आहे. ही कथा या अपत्यनाशांचे (लंगडे) समर्थन करण्यासाठी उघडच रचलेली दिसते. पूर्वीचे अपत्य नसूनहि सात पुत्रांचा मृत्यु शांतनूने सहन केला हे नवलच. आठव्या पुत्राच्या जन्माच्या वेळी मात्र, गंगा आपल्याला सोडून जाईल याची पर्वा न करतां, शांतनूने तिला ’एक पुत्र तरी राहूंदे’ असे विनवले म्हणून गंगेने त्याला न मारतां आपल्याबरोबर नेले पण ती शांतनूला सोडून गेलीच. कुमार वयाचा झाल्यावर तिने हा पुत्र देवव्रत पुन्हा शांतनूच्या स्वाधीन केला. त्याने वेदाभ्यास केला आहे व तो ज्ञानी आणि शूर आहे असे गंगा म्हणाली. मात्र परशुरामापाशी त्याने धनुर्विद्या शिकल्याचा येथे उल्लेख नाही. पण तो परशुरामशिष्य म्हणून मानला जातो. मग तो केव्हां परशुरामापाशी शिकला याचा उलगडा होत नाहीं. शांतनूकडे आल्यावर शिकला असावा. गंगेच्या मातृसत्ताक कुटुंबियांत तो वाढला याचा त्याच्या मनोवृत्तीवर काही परिणाम झाला काय? त्याने आमरण ब्रह्मचर्य पत्करले त्या मागे त्याच्या बालवयातील काही संस्कार कारण होते काय? प्रत्यक्ष मातेने केलेले पुत्रघात त्याला कळले असणारच शिवाय आईच्या जनसमुदायांत असे इतरहि प्रसंग घडले असतील ते पाहून आपल्याला गृहस्थाश्रम नकोच अशी त्याची मनोभूमिका झाली होती कीं काय अशी शंका येते.