Android app on Google Play

 

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग 3

 

शांतनूला व सत्यवतीला चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र झाले. त्यानंतर थोड्या काळानेच शांतनूचा मृत्यु झाला. ठरल्याप्रमाणे चित्रांगद राजा झाला. हा शूर होता. भीष्माला त्याने सत्तेपासून दूर ठेवले असावे. त्याचा विवाह झाल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे पत्नी वा अपत्याचे नाव नाहीच. त्याचे व चित्रांगद याच नावाच्या गंधर्वाचे कुरुक्षेत्रात युद्ध झाले. तीन वर्षे एवढा दीर्घ काळ चाललेल्या या युद्धात भीष्माने कोणताही भाग घेतला नाही. असें कां झालें असावें? एक तर चित्रांगदाने भीष्माला खड्यासारखे दूर ठेवले असावे किंवा भीष्म कुरुकुळांत राहत असूनहि पूर्ण अलिप्त झाला असावा. महाभारत याबाबत काहीच सांगत नाहीं. युद्धात चित्रांगद मारला गेला एवढेच म्हणतें. त्याला मदत न केल्याबद्दल सत्यवतीनेहि भीष्माला दोष दिलेला नाही! हे प्रकरण जरासे धूसरच आहे!
चित्रांगदानंतर विचित्रवीर्य राजा झाला. (असे ’विचित्र’ नाव त्याला कां दिले असावे?). त्या वेळेला तो वयाने लहान असावा. तो मात्र भीष्माच्या कलाने वागत होता असे दिसते. काही काळानंतर त्याला भार्या मिळवून देण्यासाठी भीष्म काशिराजाच्या तीन मुलींच्या स्वयंवराला गेला. मात्र एकटाच! विचित्रवीर्याला बरोबर नेलेच नाही! ब्रह्मचर्याचा गाजावाजा झालेल्या भीष्माला स्वयंवरमंडपात एकटाच पाहून साहजिकच त्याची बरीच टिंगल झाली. तिन्ही मुलींना पळवून आणावयाचे असाच भीष्माचा बेत होता म्हणूनच बहुधा विचित्रवीर्याचे लोढणे त्याने बरोबर बाळगले नसावे. विचित्रवीर्यामध्ये काहीतरी जन्मदोष असावा व त्यामुळे त्याला सुखासुखी योग्य भार्या मिळण्यात अडचण पडेल असे दिसल्यामुळेच असा आडमार्ग भीष्माला पत्करावा लागला असावा. ठरवलेल्या बेताप्रमाणे भीष्माने केले. सर्व चिडलेल्या राजांशी यशस्वी सामना केला. एकट्या शाल्वाने अंबेला सोडवण्यासाठी निकराचे युद्ध केले पण त्याचाहि निभाव लागला नाही. मात्र भीष्माने त्याला न मारतां जिवंत सोडले. या प्रसंगात भीष्माने शौर्य प्रगट केले. शाल्व हेहि एक कुळ असावे व त्यातील पुरुषांना शाल्व म्हणत असावे कारण पुढे खूप दीर्घ काळानंतर, कृष्ण व शाल्व यांचे वैर व युद्ध झाले. तेव्हा तो शाल्व हा या कथेतील शाल्वाचा वंशज असला पाहिजे. अंबेच्या इच्छेप्रमाणे भीष्माने तिला शाल्वाकडे पाठवले पण त्याने तिला स्वीकारले नाही. ती भीष्माकडे परत आली व ‘तुम्ही माझा हात धरलात म्हणून शाल्व मला स्वीकारीत नाही तेव्हा आता तुम्हीच माझा स्वीकार करा’ असे विनवले पण भीष्मानेहि प्रतिज्ञेमुळे तिला स्वीकारले नाहीच. तिची परवड झाली. अंबेने परशुरामाकडे तक्रार नेली आणि तिच्या वतीने खुद्द परशुरामाने आव्हान दिल्यामुळे त्याच्याशी झालेल्या युद्धात परशुरामालाही भीष्माने दाद दिली नाही. परशुरामाने अंबेला सांगितले कीं ’तुझ्यासाठी मी आणखी काही करूं शकत नाहीं, तुझे तूं पहा!’ या युद्धानंतर भारतीय युद्धापर्यंत एकाही प्रसंगात भीष्माचे शौर्य विशेषत्वाने प्रगट झालेले नाही! कौरव राज्याच्या वतीने त्याने अश्वमेध वगैरे केला नाही वा कोणा राजाचे पारिपत्य करून राज्य विस्तारहि केलेला नाही.