Android app on Google Play

 

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग २

 

देवव्रत (भीष्माचे खरे नाव)तरुण झाला, पित्याने त्याला यौवराज्याभिषेकहि केला अन मग, चार वर्षे गेल्यावर, उतारवयाच्या पित्याची सत्यवतीशीं विवाह करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याने सर्वस्वाचाच त्याग केला. आपण विवाह व संसाराच्या बंधनात अडकून पडावयाचे नाही असे त्याचे आधीच ठरले असावे अशी मला शंका येते कारण त्याच्या विवाहाचा विचारहि शांतनूने अद्याप केला नव्हता. त्याच्या या विचारांची शांतनूला बहुधा कल्पना आली असावी आणि त्यामुळे याचेकडून आपला वंश चालू राहण्याची त्याला उमेद राहिली नसावी. सत्यवतीशीं उतार वय असूनहि विवाह करावा असें आपल्याला कां वाटते याचे त्याने पुत्राशी केलेले स्पष्टीकरण वाचले म्हणजे ही शंका बळावते. सर्वच क्षत्रिय राजांना शिकारीचा नाद असताना ’तुला शिकारीचा फार नाद आहे आणि तूं नेहमीं शस्त्र घेऊन फिरत असतोस त्यामुळे तुझ्या जीवनाची शाश्वति नाही’ असे तो देवव्रताला म्हणतो हे नवलाचे नव्हे काय? आपल्याकडून वंश टिकण्याची पित्याला उमेद नाही तेव्हां त्याला पुन्हा विवाह करून वंशवृद्धि करावयाची आहे तर ते होऊ द्यावे, आपण त्याआड येऊ नये उलट सत्यवतीला व तिच्या पित्याला हवे असलेले आश्वासन द्यावे असे देवव्रताला वाटले काय? महाभारतात वर्णन केलेल्या घटनांचे असेहि एक स्पष्टीकरण असूं शकतें! मला तें जास्त नैसर्गिक वाटते.
सत्यवती ही उपरिचर या क्षत्रिय राजाची धीवर स्त्रीपासून झालेली कन्या होती. (महाभारतातील वर्णन, उपरिचराच्या वीर्यापासून एका मत्स्यीला झालेली कन्या, असें आहे तें अर्थातच रूपकात्मक आहे.) मात्र राजकुळात न वाढता ती धीवर कुळात वाढली होती. ऋषि पराशराने तिची अभिलाषा धरून तिच्या पदरांत एक पुत्र टाकून मग तिला सोडून तपश्चर्येचा मार्ग धरला होता. पुत्र व्यास याला सत्यवतीने धीवरकुळांतच वाढवले. व्यास ’मोठा झाल्यावर’ मातेची अनुज्ञा घेऊन आपल्या मार्गाने गेला असा उल्लेख आहे. शांतनू सत्यवतीच्या प्रेमात पडला तोवर तीहि लहान राहिलेली नव्हती असे त्यामुळे म्हणावे लागते. तिचा विवाह कोणातरी थोर क्षत्रियाशींच व्हावा असा तिच्या धीवर पालक पित्याचा हेतु होता. म्हणून त्याने एका थोर ऋषीला नकारहि दिला होता. राजा उपरिचर व सत्यवतीचा धीवर पालक यांची भेट होत असे असें महाभारत म्हणतें व शांतनूशीं सत्यवतीचा विवाह व्हावा अशी उपरिचराचीहि इच्छा होती. प्रष्न फक्त तिच्या पुत्राला राज्य कसें मिळणार हा होता! तो देवव्रताने पूर्णपणे सोडवला व भीष्म ही पदवी वा नाम मिळवले. धीवराला हवे असलेले, राज्यावर हक्क न सांगण्याचे आणि स्वत: ब्रह्मचर्यहि पाळण्याचे आश्वासनहि भीष्माने दिले व अखेरपर्यंत पाळले. जन्मभर कुरुकुळातच राहण्याचे व कुळाचे हित जपण्याचे वचन काही सत्यवतीच्या पित्याने मागितलेले नव्हते व भीष्माने दिलेले नव्हते. मात्र तो हस्तिनापुर सोडून कोठेच गेला नाही. स्वत: संसारात न पडूनहि सर्व सांसारिक सुखे व अनेक दु:खेहि त्याला भोगावी लागलीच!