Get it on Google Play
Download on the App Store

महाभारतातील कर्णकथा - भाग ११

भारतीय युद्ध अठरा दिवस चालले. युद्धाचे अतिशय विस्तृत व खुलासेवार वर्णन महाभारतात आहे. युद्धाचे पहिले दहा दिवस कर्ण युद्धाबाहेरच होता. भीष्म सेनापति असेपर्यंत त्याच्या आधिपत्याखाली त्याला लढावयाचे नव्हते. आपल्या पराक्रमाचे श्रेय भीष्माला मिळेल असे क्षुद्रपणाचे कारण त्याने दिले होते. वास्तविक, हा दुर्योधनाच्या जीवन-मरणाचा लढा होता, त्यापासून कोणत्याही कारणामुळे वा निमित्तामुळे कर्णाने दूर रहाणे हे उचित म्हणतां येत नाही. त्यापेक्षा स्वाभिमानाला थोडी मुरड घालणे जास्त उचित झाले असते! भीष्माने युद्धापूर्वी दोन्ही पक्षांतील प्रमुख वीरांचे मूल्यमापन दुर्योधनाच्या विचारण्यावरून केले त्यावेळी त्याने कर्णाला अर्धरथी ठरवले याचा कर्णाला राग आला होता. भीष्माने कर्णाच्या मूल्यमापनांत एका गोष्टीवर अचूक बोट ठेवले होते. त्याने ’कर्ण हा युद्धात बेसावध रहाणारा आहे’ अशी टीका केली होती. तसेच गुरूला फसवून मिळवलेली विद्या त्याच्या कामी येणार नाही असे म्हटले होते. कर्णाच्या अनेकांकडून झालेल्या पराभवांचे हेच कारण असावे. मात्र तो सामान्य योद्धा खासच नव्हता. कर्ण युद्धापासून अलिप्त राहिला यात भीष्माचाच हेतु साध्य झाला. आत्मसन्मान राखण्यापुरते थोडेसे युद्ध होऊन दोन्ही पक्षांमध्ये सन्माननीय तडजोड होऊ शकली तर बहुधा ती भीष्माला हवी होती. आततायी स्वभावाचा व दीर्घद्वेषी कर्ण बाजूला राहिला तरच कदाचित हे शक्य झाले असते. यासाठीच युद्धाची सूत्रे भीष्माने स्वत:च्या हातात ठेवली. त्याच्या अपेक्षेप्रमाणे कर्ण वागला!
भीष्मपतनानंतर पांच दिवस द्रोण सेनापति असताना व पुढील दोन दिवस स्वत: सेनापति होऊन कर्ण युद्धात सहभागी झाला. या सात दिवसांच्या युद्धवर्णनात कर्णाचा सहभाग असलेले अनेकानेक युद्धप्रसंग आहेत. अनेकांवर त्याने विजय मिळवला पण अनेकांनी त्याला हरवले व पळवून लाविले असेहि प्रसंग आहेत. अर्जुन व कर्णाची तुलना अटळ आहे. अर्जुन सर्व अठरा दिवस लढला व युद्धाचा प्रमुख भार भीमाच्या बरोबरीने, वा जास्तच, त्याने वाहिला. कर्णाची परिस्थिति तशी नव्हती. अर्जुनाचा, भीष्म सोडला तर इतर कोणीहि, द्रोणानेहि निर्णायक पराभव केला नाही. भीष्म व द्रोण या दोघांशीहि तो केवळ नाइलाजाने युद्धाला तयार झाला होता. अखेर भीष्म व द्रोण दोघांशीहि त्याची सरशी झालीच. त्रिगर्तांचा त्याने दररोज पराभव केला व सर्वांना मारले. पुढील भागात ही तुलना पुढे चालू ठेवू.