Get it on Google Play
Download on the App Store

महाभारतातील कर्णकथा - भाग ६

स्वयंवर होऊन पांडवाना द्रुपदाचा पाठिंबा मिळाला आहे हे लक्षात आल्यावर आता काय करावयाचे याबद्दल दुर्योधन, धृतराष्ट्र व कर्ण यांची चर्चा झाली. दुर्योधनाने अनेक कुटिल डावपेच धृतराष्ट्राला सुचवले. कर्णाने या प्रसंगीं मात्र या सर्व डावपेचांची निंदा केली. पांडव येथे तुमच्यापाशी असताना व त्याना कोणाचे सहाय्य नसताना तुम्ही त्यांचे काही वाकडे करू शकला नाही. आता त्याना पांचालांचे सहाय्य आहे. तेव्हां पोरकट उपायांचा विचारही करूं नका. उलट, त्यांनी पक्का पाय रोवण्यापूर्वीच आपण त्यांचेवर हल्ला करून त्याना पकडून आणू असा वीरोचित सल्ला त्याने दुर्योधनाला दिला. धृतराष्ट्राने त्याची वीरवृत्तीबद्दल पाठ थोपटली पण त्याच्यावर भरवसा ठेवला नाही! भीष्म, द्रोण व विदुरा बरोबर सल्लामसलत करण्यास सांगितले! त्या तिघांनी पांडवांना त्यांचा वाटा देण्याचा सल्ला दिला. कर्णाने त्या तिघांबद्दल संपूर्ण अनादर दाखवून त्यांची कुत्सित्पणे निंदा केली. त्यांना धृतराष्ट्राचे आश्रित ठरवले. विदुर व भीष्माने पुन्हा निक्षून सागितल्यावर धृतराष्ट्राला पांडवाना राज्याचा हिस्सा देणे भाग पडले. कर्णाचा युद्धबेत कोणीच स्वीकारला नाही. या प्रसंगी कर्णाचे वर्तन व बोलणे अतिशय अनुचित व माजोरीपणाचे झाले. वास्तविक, कुरुराज्याच्या अंतर्गत वादाशी त्याचा काही संबंध नव्हता. येथून पुढे, वेळोवेळी, कर्ण स्वत:ला भीष्मद्रोणांच्या बरोबरीचा मानून नेहेमीच त्यांचा अनादर करताना दिसतो. भीष्म स्वत: परशुरामशिष्य व कर्णहि, फसवणुकीने, पण परशुरामाचाच शिष्य. इतर कोणीहि समकालीन वीर परशुरामाचा शिष्य नव्हता. कदाचित या जोरावर कर्ण स्वत:ला भीष्माच्या बरोबरीचा मानताना दिसतो. परिणामी, भीष्माने कर्णाला नेहेमीच तुच्छतेने वागवले. त्याचे कारण तो सूतपुत्र हे नाही. तो खलप्रवृत्तीचा, पांडवांचा अकारण वैरी व दुर्योधनाला खलकृत्यात नेहेमी सहाय्यक म्हणून त्याचेवर भीष्माचा राग होता. कर्णाचे गुणदोष तो उत्तमपणे जाणत होता. कर्णाचा त्याने वेळोवेळी अपमान व तेजोभंग केला.
पांडवानी इंद्रप्रस्थ वसवले व राज्यविस्तार केला. अर्जुन राज्य सोडून, उलुपी, चित्रांगदा याचेबरोबर राहून अखेर द्वारकेहून सुभद्रेशी विवाह करून परतला. नंतर अभिमन्यु व इतर पांडवपुत्रांचा जन्म झाला, पांडवानी मयसभेची निर्मिति केली व राजसूय यज्ञ ठरवला. त्या निमित्ताने जरासंधवध झाला व मग पांडवांनी दिग्विजय केला. त्यावेळी भीमाचे व कर्णाचे युद्ध होऊन भीम जिंकला. मात्र हे युद्ध फारसे गांभीर्याने लढले गेले असे म्हणता येणार नाही. बहुतेक राजांनी नाममात्र युद्ध करून पांडवांच्या यज्ञाचे स्वागत केले तसेच कर्णानेहि केले असणार.
राजसूय यज्ञ पार पडला. अग्रपूजेच्या वेळी शिशुपालाने बेताल वर्तन केले, कृष्णाने त्याचा वध केला. या प्रसंगात कर्णाची उपस्थिति विशेष जाणवत नाही. मात्र, उपस्थित राजांच्या नामावळीत त्याचे नाव आहे. शिशुपालाने कृष्णाच्या अग्रपूजेला विरोध करताना अनेकांबरोबर कृष्णाची तुलना करून त्याला अग्रपूजेला अपात्र ठरवले. त्यात कर्णाबरोबरहि त्याची तुलना केलेली होती व कर्णाला वरचढ ठरवले होते. मात्र, यांत शिशुपालाचा कॄष्णद्वेषच दिसून येतो. खुद्द कर्णानेहि कधी आपण कृष्णापेक्षा वरचढ असल्याचा दावा केलेला नाही. शिशुपालाच्या कृष्णाने केलेया अचानक वधाने अनेक राजे चवताळले व युद्धाचा बेत करू लागले. यात कर्णाचे वा दुर्योधनाचे नाव नाही. भीष्माचा शिशुपालाने फार अपमान केल्यावर मग त्याचा वध झाला त्यामुळे दुर्योधनाला गप्प बसणे भागच होते. परिणामी कर्णहि स्वस्थ बसला!
यापुढील द्यूतप्रसंगातील कर्णाचा सहभाग पुढील भागात पाहूया.