महाभारतातील कर्णकथा - भाग ९
यानंतर यथावकाश पांडव अज्ञातवासात गेले. त्यांच्या कथेत यानंतर कर्णाचा उल्लेख कौरवांनी विराटाच्या गायी हरण करण्याच्या प्रसंगात येतो. पांडवांच्या शोधार्थ पाठवलेले सेवक हात हलवीत दरबारात परत आले. तेव्हा कर्णाने पुन्हा जास्त हुशार माणसे शोधार्थ पाठवण्याचा सल्ला दिला. पांडव हुडकले गेले नाहीत तर लवकरच त्यांच्याशी युद्धप्रसंग उद्भवेल तेव्हा सैन्य, संपत्ति या साधनांचा विचार कर असा दुर्योधनाला कृपाने सल्ला दिला. पण तो सर्व विषय बाजूलाच राहून, त्रिगर्त राजा सुशर्मा याने सुचवले कीं कीचक मेल्यामुळे विराट आता दुबळा झाला आहे तेव्हां त्याचे गोधन लुटावे. कर्णाने मत दिले कीं पांडव आता दुबळे झाले आहेत तेव्हा त्यांची काळजी करण्याची जरुरी नाही, म्हणून त्रिगर्ताची सूचना मान्य करावी. त्रिगर्त व कौरव यांनी दोन्हीकडून विराटावर हल्ला केला. दक्षिणेकडून त्रिगर्ताने केलेल्या हल्ल्याचा विराटाने चार पांडवांच्या सहाय्याने यशस्वी प्रतिकार केला. मात्र रात्रीपर्यंत युद्ध चालल्यामुळे राजधानीला परत येतां आले नाही. त्यामुळे दुसर्या दिवशी उत्तरेकडून कौरवांनी केलेल्या हल्ल्याचा प्रतिकार करण्याची पाळी विराटपुत्र उत्तरावर आली. बृहन्नला वेषांतील अर्जुनाने सारथ्य केले. प्रत्यक्ष युद्धक्षेत्रावर उत्तराचा निभाव लागणे शक्यच नसल्यामुळे त्याला सारथी बनवून, शमीवरील शस्त्रे घेऊन अर्जुन स्वत:च युद्धाला सज्ज झाला. हा अर्जुनच हे पाहून द्रोणाने त्याची स्तुति आरंभली. कर्णाने नेहेमीप्रमाणेच, अर्जुनाला आपली वा दुर्योधनाची सर येणार नाही अशी बढाई मारली! हा अर्जुन उघडकीस आला आहे तेव्हा माझे कामच झाले कारण तेरा वर्षे पुरी झालेली नाहीत असे दुर्योधनाने म्हटले. अर्जुन प्रगट झाल्यामुळे भीष्म, द्रोण विचारांत पडले. कर्णाने ’मी एकटाच अर्जुनाचा सामना करतों’ अशी फुशारकी मारली. कृप व अश्वत्थामा यांनी त्याला बजावले कीं ’तूं अर्जुनाप्रमाणे एकट्याने कधीहि पराक्रम गाजवलेला नाहीस. सर्वांनी मिळून एकजुटीने अर्जुनाशीं सामना केला नाही तर निभाव लागणार नाही.’ कर्णाला क्षमा करा असें त्यांना भीष्माने म्हटले. भीष्माने सौरमानाचे गणित मांडून आज सकाळीच अज्ञातवास पुरा झाला आहे असे म्हटले ते सपशेल नाकारून दुर्योधनाने युद्धाची तयारी केली. दुर्योधन एकटाच गोधन घेऊन ह्स्तिनापुराकडे वळला व सर्व कौरववीर अर्जुनाला अडवून युद्धाला उभे राहिले. अर्जुनाने प्रसंग ओळखून, प्रथम दुर्योधनावरच हल्ला करून व त्याला हरवून गोधन मुक्त केले. नंतर सर्व कौरववीरांशी धैर्याने व कौशल्याने युद्ध करून सर्वांस पराभूत केले. अर्जुनाने कर्णबंधु संग्रामजित याला कर्णाच्या उपस्थितीतच मारल्यावर कर्ण व अर्जुन यांचा सामना झाला. अत्यंत त्रस्त व भयभीत होऊन कर्णाने पळ काढला. सर्वांचा अर्जुनाने पुन्हापुन्हा पराभव केल्यावर, भीष्माने, ’गोधन तर गेलेच आहे, आतां आपण सर्वांनी जीव वांचवून परत फिरावे’ असा सल्ला दिला. कौरव परत जात आहेत हे पाहून अर्जुनानेहि युद्ध आवरते घेतले. या एकूण युद्धप्रसंगांत अर्जुनाच्या अस्त्रबळापुढे कोणाचेहि चालले नाही व कर्णाचा पूर्न तेजोभंग झाला. या प्रसंगानंतर कर्णाने कधीहि बढाया मारल्या कीं अश्वत्थामा, कृप व द्रोण त्याला या प्रसंगाची आठवण देत! कर्णाच्या बळाच्या मर्यादा याही प्रसंगी दुर्योधनाला स्पष्ट दिसून आल्या तरी त्याचा कर्णावर भरवसा कायम राहिला हे नवलच!
यापुढील कर्णचित्रण पुढील भागांत वाचा.
यापुढील कर्णचित्रण पुढील भागांत वाचा.