महाभारतातील कर्णकथा - भाग ४
मागील लेखात म्हटल्याप्रमाणे, कर्णाचा खरा पिता कोण हे रहस्य कुंतीने अखेरपर्यंत जपले. पांडूशी विवाह होऊन पुष्कळ काळ विवाहसौख्य भोगूनहि तिला वा माद्रीला अपत्य झाले नाही. पुत्राशिवाय मोक्ष नाही या भावनेने पांडूने अखेर नियोग पत्करला व कुंतीला तसे सुचवले तेव्हाही कुंतीने आपल्या कानीन पुत्राच्या (कर्णाच्या) अस्तित्वाचा उल्लेख केला नाही. तो कोठे आहे हे तिला माहीत नसावें हे एक कारण असेल. त्याचा जन्म ब्राह्मण वा क्षत्रिय पित्यापासून झालेला नसल्यामुळे तो पांडूला मान्य होणार नाही हे कुंती जाणून होती हे जास्त सयुक्तिक कारण दिसतें. विचित्रवीर्याच्या मृत्यूच्या वेळी ही अडचण आली नव्हती. सत्यवतीचा कानीन पुत्र व्यास हा पराशर पुत्र होता. तो ऋषि असल्यामुळे स्वत: कुरुंचा राजा होणार नव्हता पण अंबिका-अंबालिका यांना पुत्रवती करण्य़ासाठी त्याला बोलावण्याचा सल्ला खुद्द भीष्मानेच सत्यवतीला दिला व तिलाही तो वावगा वाटला नाही.
नियोगांतून पांडव जन्मले. पांडू व माद्री यांचा मृत्यु झाला व कुंती पुत्रांसह हस्तिनापुराला आली. तोवर दुर्योधनादि कौरवांचाहि जन्म झालेला होता. दुर्योधन व भीम एका वयाचे होते. कौरव-पांडव मोठे झाले. प्रथम कृपाचार्य व मग द्रोणाचार्य यांनी त्यांचे युद्धकलेचें शिक्षण केले. या सर्व काळात एकदांहि कर्णाचा उल्लेख येत नाही. त्याचे बालपण व शिक्षण कोठे झाले याबद्दल काही उल्लेख नाही. कुंती पांडुपत्नी बनून हस्तिनापुराला येण्यापूर्वी कर्णाला अधिरथाने दूर पाठवले असले पाहिजे. त्या काळात त्याचे शिक्षण दुसर्या कोणा गुरूपाशी झाले व मग त्याने धनुर्वेदाचे उच्च शिक्षण परशुरामापाशी झाले. आपण ब्राह्मण असल्याचे त्याने म्हटले होते ते खरे नाही असे उघडकीस आल्यामुळे ’मी दिलेली विद्या तुला ऐनवेळी कामास येणार नाही’ असा शाप परशुरामाने त्याला दिला अशी कथा आहे. यांतहि कर्णावर अन्याय झाला असे काहीना वाटते. माझ्या मते कर्ण अनेक वेळा कसोटीच्या वेळी उणा पडलेला दिसतो त्याचे हे स्पष्टीकरण दिलेले असावे.
गुरु द्रोण, त्याचे कौरव, पांडव व इतर शिष्य, विशेषेकरून अर्जुन, यांची कीर्ति कर्णाच्या कानावर गेली असावी. कौरवपांडवांचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांच्या कौशल्यप्रदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे हेहि त्याच्या कानावर गेले असणार. या कार्यक्रमाच्या वेळी, जन्मकथेनंतर प्रथमच महाभारतात कर्णाचा उल्लेख येतो. सर्व शिष्य व शेवटी अर्जुन याचे कौशल्यप्रदर्शन पार पडल्यानंतर अचानक कर्ण आपल्या कौशल्याचे प्रदर्शन दाखवण्यासाठी पुढे सरसावला. त्याला अर्जुनाचा वाटणारा मत्सर त्याच्या आव्हानात्मक भाषणातून स्पष्ट झाला. आव्हान दिल्याप्रमाणे त्याने अर्जुनाच्या बरोबरीने सर्व कौशल्याचे प्रदर्शन केले. अधिरथाला कर्ण असा अचानक रंगमंचावर येणार आहे याची बिलकुल कल्पना नव्हती, नाहीतर त्याने खचितच त्याचे अचानक कुंतीसमोर येणे टाळले असते! कर्णाच्या कौशल्याने भीष्म-द्रोण चकित झाले. हा परशुरामशिष्य आहे हे कोणाला माहीत नसावे. या प्रसंगाच्या वर्णनात तसा उल्लेख अजिबात नाही. कर्ण हा द्रोणाचा शिष्य होता अशी काहींची समजूत असते पण ते मुळीच खरे नाही. सूतपुत कर्णाचा द्रोणाने शिष्य म्हणून स्वीकार केला नसता. निषादराजपुत्र एकलव्य याचाही त्याने स्वीकार केला नव्हता! कर्णजन्मानंतर काही काळाने कुंतीचा विवाह, मग हस्तिनापुरात दीर्घकाळ वास्तव्य व संसारसुख भोगल्यावर वनात काही काळ संचार, अपत्यप्राप्तीबद्दल पांडूची पूर्ण निराशा झाल्यावर मग नियोगाचा स्वीकार, नंतर युधिष्ठिर, भीम व नंतर अर्जुन यांचा जन्म हा कालक्रम विचारांत घेतला तर, कर्ण हा अर्जुनापेक्षा १२-१४ वर्षांनी वडील असला पाहिजे! अर्जुन या प्रसंगी १६ वर्षांचा कोवळा तरुण असणार तर कर्ण २८-३० वर्षांचा होता! त्याने नवतरुण अर्जुनाबरोबर स्पर्धा करणे हास्यास्पदच म्हणावे लागेल! त्याने अर्जुनाला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिल्यावर साहजिकच त्याच्या कुळशीलाची चौकशी झाली. याचवेळी अधिरथाने पुढे येऊन त्याला पुत्र म्हणून संबोधिल्यामुळे तो सूतपुत्र आहे हे उघड झाले. पूर्वी कधीहि न पाहिलेला कर्ण समोर आल्यावर कुंतीने त्याला ताबडतोब ओळ्खले व तिला भोवळ आली! विदुराच्या ते लगेच लक्षात आले व त्याने तिच्यावर उपचार करविले. कुंतीचे रहस्य उघड होऊ दिले नाही. कुंतीने जन्मजात कवचकुंडलांमुळे कर्णाला ओळखले असे महाभारत म्हणते. कवचकुंडले ही एक अद्भुत कथा आहे. ती दूर ठेवावयाची तर कवचकुंडले म्हणजे दागदागिने, सोनेनाणे असे मानले पाहिजे. तेव्हा कुंतीने कर्णाला ओळखण्याचे कारण, ओळखीचे दागिने किंवा, बहुधा, खर्या पित्याशी कर्णाचे असलेले साम्य हे असावे. कुंतीने अर्थातच कर्णाची ओळख दाखवली नाही. ते शक्यच नव्हते. ती अगतिक होती.
कर्ण सूतपुत्र ठरल्यामुळे द्वंद्वाचा विषय संपला. दुर्योधनाने कर्णाला लगेच जवळ केले, अंगदेशाचे राज्य दिले. हे कसे काय? वास्तविक दुर्योधन स्वत: राजा वा युवराजहि नव्हता. वयानेहि दुर्योधन अर्जुनापेक्षा किंचित मोठा, तरीहि विशीतलाच होता. अंगदेश कुरूंच्या राज्यात समाविष्ट होता काय? त्याची राजधानी कोठे होती? महाभारत म्हणते तेव्हा राज्य दिले हे खरे मानले पाहिजे. कर्णाने तेथे जाऊन राज्य चालवले असे दिसत नाही. तो कायम दुर्योधनापाशीच दिसतो. अंगदेशाचे राज्य या वेळेपर्यंत ज्या कोणाकडे होते त्यांनी कर्णाचे स्वामित्व मान्य केले काय व कां? महाभारतांत खुलासा नाही. अंगदेशाचे राज्य हा जणू एक नाममात्र सन्मान होता! किंवा अंगराज्याकडून कौरवांना मिळणारी खंडणी यापुढे कर्णाला मिळणार होती. अर्थात राज्य दिले तरी दुर्योधन कर्णाला क्षत्रिय करू शकत नव्हता. अखेरपर्यंत कर्णाला सूत म्हणूनच जन्म घालवावा लागला. मात्र कर्णाने या प्रसंगी दुर्योधनाची बाजू घेतली ती अखेरपर्यंत कधीहि सोडली नाही. दुर्योधनानेहि दु:शासनाएवढेच प्रेम व सन्मान कर्णाला नेहेमीच दिला. मैत्रीचे असे उज्वल उदाहरण क्वचितच सापडेल. अर्जुनाबद्दल असूया व स्पर्धेची भावनाहि कर्णाने कायमच बाळगली. वयाचा फरक लक्षात घेतला तर या प्रसंगात कर्ण अर्जुनापेक्षा उजवा ठरला असे म्हणता येत नाही.
यानंतर लगेचच, पूर्वीच्या अपमानाची भरपाई करून घेण्यासाठी द्रोणाच्या मागणीप्रमाणे प्रथम कौरवांनी व नंतर पांडवांनी द्रुपदावर हल्ला केला. यावेळी कर्ण दुर्योधनाबरोबर होता. मात्र कर्णाच्या धनुर्विद्येचा द्रुपदावर काहीहि प्रभाव पडला नाही! कर्णाचा पराभव झाला याचे दुर्योधनाला फारसे वैषम्य वाटलेले दिसत नाही. द्रोण हा काही कर्णाचा गुरु नसल्यामुळे त्याच्या अपमानाशी त्याला काही देणेघेणे नव्हते त्यामुळे तो पूर्ण बळाने लढला नाही असे फार तर त्याच्या समर्थनासाठी म्हणता येईल. कौरव व द्रोण हरल्यावर मात्र, पांडवांनी द्रुपदाचा पूर्ण पराभव करून द्रोणाच्या अपमानाची भरपाई केली. यात मुख्य पराक्रम अर्थातच अर्जुनाचा होता. या प्रसंगात त्यामुळे अर्जुन कर्णापेक्षा निश्चितच उजवा ठरला.
यापुढील कर्णकथेचा मागोवा पुढील भागात वाचा.