कुबेराने यक्षाला शाप का दिला?
शिखंडी आपल्या पुरुष रुपात पांचाल नगरात राहत होता. त्याच दरम्यान एकदा यक्षराज कुबेर फिरत फिरत स्थूणाकर्ण याच्याकडे पोचले. परंतु तो यक्ष त्यांना अभिवादन करायला आला नाही. तेव्हा कुबेराने इतर यक्षाना याचे कारण विचारले. त्यांनी कुबेराला सर्व वृत्तांत सांगितला आणि सांगितले की या वेळी स्थूणाकर्ण स्त्री रुपात आहे. म्हणूनच संकोचाने तो आपल्या समोर येत नाहीये. हे सर्व ऐकून यक्षराज कुबेर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी स्थूणाकर्णला शाप दिला की आता त्याला याच रुपात राहावे लागेल. स्थूणाकर्णने क्षमा मागितल्यावर यक्षराजाने सांगितले की शिखंडीच्या मृत्युनंतर तुला तुझे पुरुष रूप परत मिळेल. इकडे जेव्हा शिखंडीचे कार्य सिद्धीला गेले, तेव्हा तो जंगलात स्थूणाकर्ण कडे गेला. तेव्हा स्थूणाकर्णने शिखंडीला सर्व वृत्तांत सांगितला. हे ऐकून शिखंडीला फार आनंद झाला. महाभारताच्या युद्धाच्या समाप्तीनंतर जेव्हा मरणासन्न अवस्थेतील दुर्योधनाने अश्वत्थामाला आपला सेनापती बनवले, तेव्हा महादेवांच्या तलवारीने अश्वत्थामाने निद्राधीन अवस्थेतील शिखंडीचा वध केला.