Android app on Google Play

 

शिखंडीच्या पूर्व जन्माची कथा -

 दुर्योधनाने विचारल्यावर भीष्म पितामहांनी त्याला शिखंडीच्या पूर्व जन्माची कथा आणि त्यच्या स्त्री पासून पुरुष बनण्याच्या विचित्र कहाणी बद्दल सांगितले, जे अशा प्रकारे आहे -
भीष्मांनी सांगितले की, जेव्हा हस्तिनापूरचा राजा माझा छोटा भाऊ विचित्रवीर्य होता, त्यावेळी त्याच्या विवाहासाठी मी स्वयंवराच्या भर सभेतून काशिराजाच्या तीन कन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका यांना अपहरण करून आणले होते, परंतु जेव्हा मला हे समजले की अंबाच्या मनात राजा शाल्व बद्दल प्रेमभावना आहे तेव्हा मी तिला सन्मानपूर्वक राजा शाल्व याच्याकडे पाठवून दिले, परंतु राजा शाल्व याने तिचा स्वीकार करायला नकार दिला.
अंबाला वाटले की तिच्यावर ही आपत्ती केवळ माझ्यामुळे आली आहे. त्यामुळे तिने माझा बदला घेण्याचा निश्चय केला. ही गोष्ट जेव्हा अंबाचे नाना (आईचे वडील) राजर्षी होत्रवाहन यांना समजली तेव्हा त्यांनी अंबाला भगवान परशुरामांना भेटायला सांगितले. परशुरामांना भेटून तिने सारी व्यथा सांगितली. अम्बाची व्यथा ऐकून भगवान परशुराम माझ्याकडे आले आणि त्यांनी मला अंबाशी विवाह करायला सांगितले, परंतु मी तसे करण्यास नकार दिला.
तेव्हा  परशुराम आणि भीष्म यांच्यामध्ये भयंकर युद्ध झाले होते. भीष्म पितामहांनी दुर्योधनाला सांगितले की, जेव्हा मी अंबाशी विवाह करायला नकार दिला, तेव्हा माझे गुरु परशुराम यांना माझा प्रचंड राग आला आणि त्यांनी माझ्याशी युद्ध करण्याचा निश्चय केला. गुरु परशुराम आणि माझ्यात २३ दिवसांपर्यंत युद्ध चालू राहिले, परंतु युद्धाचा निर्णय लागत नव्हता. २४ व्या दिवशी जेव्हा मी महाभयंकर प्रस्वापास्त्र अस्त्राचा प्रहार जेव्हा पर्शुरामांवर करणार होतो, तेव्हा आकाशात उपस्थित असलेल्या नारद मुनींनी मला तसे करण्यापासून रोखले.


तेव्हा मी ते अस्त्र धनुष्यावरून खाली उतरवले. हे पाहून भगवान परशुराम मला म्हणाले की भीष्मा तू मला पराभूत केले आहेस. तेव्हाच तिथे भगवान परशुरामांचे पितर उपस्थित झाले आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी शस्त्र खाली ठेवले. अशा प्रकारे ते युद्ध थांबले. तेव्हा अंबा माझ्या विनाशासाठी तपश्चर्या करायला वनात निघून गेली.
भीष्म पितामहांनी दुर्योधनाला सांगितले की माझा सूड घेण्यासाठी अंबा यमुनेच्या तटावर राहून तपश्चर्या करू लागली. तपश्चर्या करता करता तिने आपले शरीर त्यागले. पुढच्या जन्मात ती वत्सदेशाच्या राजाच्या कन्येच्या रुपात जन्माला आली. तिला आपल्या पूर्वजन्माची माहिती होती. म्हणून माझा बदला घेण्यासाठी तिने पुन्हा तपश्चर्या सुरु केली. तिच्या तपाने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी तिला दर्शन दिले. त्या मुलीने भगवान शंकरांकडून माझ्या पराभवाचे वरदान मागितले.
भगवान शंकरांनी तिला तिच्या मनाजोगते वरदान दिले. तेव्हा ती मुलगी म्हणाली की मी एक स्त्री आहे, तेव्हा मी भीष्मांचा वध कसा करू शकेन? तेव्हा भगवान शंकरांनी तिला सांगितले की पुढच्या जन्मात तू पुन्हा एक स्त्री म्हणून जन्म घेशील, परंतु तरुण झाल्यावर तू एक पुरुष बनशील, आणि भीष्मांच्या मृत्यूचे कारण बनशील. असे वरदान मिळाल्यावर त्या मुलीने एक चिता रचली आणि " मी भीष्मांचा वध करण्यासाठी अग्नीत प्रवेश करत्ये" असे म्हणून त्या पेटत्या चितेत प्रवेश केला.