Get it on Google Play
Download on the App Store

बर्मूडा ट्रँगल!


सन १४९२ मध्ये प्रसिध्द दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबसने भूतांच्या त्रिकोणातील (बर्मूडा ट्रँगल) आपल्या प्रवासाची नोंद डायरीमध्ये केली आहे. तो म्हणतो की या प्रदेशात कांही गूढ मॅग्नेटीक ओढ आहे. बोटीवरील दिशादर्शक यंत्रे विचित्रपणे वागू लागली आहेत. आणि हो, एक आगीचा लोळ देखील नुकताच समुद्रात पडलेला खलाशांनी पाहिला आहे.

सन १८७२ आणखी एक भयंकर चक्रावणारी घटना समोर आली. नोव्हेंबर ७, जिनीव्हाला जाण्यासाठी ‘मेरी सेलेस्टा’ हे जहाज प्रवासी व खलाशी घेवून निघाले, एक महिन्यांनी बर्मुडा ट्रँगलमध्ये ‘मेरी सेलेस्टा’ इतर जहाजांना दिसली, परंतू एकाही मनुष्याविना. संपूर्ण जहाज त्यावरील साहित्य, मौल्यवान वस्तू अगदी जशाच्या तश्या होत्या. त्या शांत जहाजाला समुद्रात कमी होती ती फक्त मनुष्यांची.सर्वजण अगदी सागरात जणू दडून बसले होते.

५ डिसेंबर १९४५ ला बर्मूडा ट्रँगलने एकाच वेळी पांच विमानांना गिळंकृत केले. रुटीन ट्रेनिंगला निघालेली तज्ञ पायलटची टीम असणारी पाच ऍव्हेंजर जातीची विमाने दुदैवाने परत येऊ शकली नाहीत. पायलटांचा प्रमुख चार्लस् टेलर, ज्याला त्या भागाची पूर्ण माहिती होती त्याने दिलेला शेवटचा संदेश फारच भयावह होता. तो म्हणतो, ‘सर्व कांही चुकलेले, वेगळे वाटत आहे. समुद्रसूध्दा नेहमीसारखा नाही. अगदी वेगळा,’ पांच विमानांचे अदृश्य होणे कमी होते की काय कारण या विमानांना शोधण्यास गेलेल्या मार्टीन मरीनर या मोठया विमानाचा देखील २३ मिनिटांनी स्फोट झाला. आज अखेर त्या पाच विमानांचा शोध लागलेला नाही

बर्मूडा ट्रँगलने घेतलेला हा १२,००० टनी घास. सुमारे ५२२ फूटांची प्रचंड ‘सायक्लोप्स’ नांवाची अमेरिकन नौदलाची ही बोट. ८ जानेवारी १९१८ ला १०,००० टन माल व ३०१ सैनिक घेवून बाल्टीमोरला जाणरी ही बोट अचानक बर्मूडा ट्रँगलला वळल्याची नोंद झाली. खरेतर हे सारे प्लॅन प्रमाणे नव्हते.कारण बर्मूडा ट्रँगल प्रवासातील मार्गात येतच नव्हते. १३ मार्चला जेंव्हा ही प्रचंड बोट कांहीच संदेश देईना तेंव्हा सा-या अमेरिकेने आपली सर्व सैनिकी ताकद लावून शोधमोहिम राबविली, परंतु तोपर्यंत १२,००० टनी घास घेवून बर्मूडा गुपचूप बसला होता.

साभार : http://www.smartdost.in