मराठी विकिपीडिया संपादन – अवघड की सोपे?
सदर लेख श्री. मंदार कुलकर्णी यांनी लिहीला आहे. हा लेख सकाळ आवृत्तीत प्रकाशीत झाला होता. ते येथे पुन:प्रकाशीत करण्यात येत आहे.
इंटरनेटने अवघे जग अगदी कमी कालावधीमध्ये व्यापून टाकले आणि तो आपल्या जीवनचा एक अविभाज्य भाग झाला आहे. आज जगातली कोणतीही ताजी बातमी, ताजी घटना या सर्वात पहिल्यांदा इंटरनेट उपलब्ध होतात. ज्यांना विशिष्ट वेबसाइट ची माहिती हवी असते ते साहजिकच गुगल किंवा तत्सम सर्च इंजिन वर जातात. तर ज्या मंडळींना ज्ञान आणि माहिती हवी आहे ते विकिपीडियाचा वापर करतात. इंग्रजी विकिपीडियाच्या सर्च मध्ये कुठलाही शब्द टाकला की त्या संदर्भात संपूर्ण माहिती इंग्रजी विकिपीडिया वर उपलब्ध होते. याचे कारण आज इंग्रजी विकिपीडिया मध्ये जवळजवळ ३८ लाख लेख आहेत.
“मराठी विकिपीडिया” यात मागे नाही. २००३ च्या महाराष्ट्र दिनी “मराठी विकिपीडिया” ची सुरुवात झाली. मराठी जाणणारे अनेकजण यास सक्रीय हातभार लावत आहेत. “वसंत पंचमी” हा पहिला ज्ञात लेख मराठी विकिपीडियावर तयार झाला. विकिपीडियाच्या मराठी अवतारात सध्या ३४८६८ लेख उपलब्ध करण्यात आले असून एकूण संपादनाची संख्या ९ लाखाच्या जवळपास आहे. मराठी विकिपीडिया मध्ये एकूण पानांची संख्या ९४००० असून एकूण सभासद १९६०० पेक्षा जास्त आहेत॰ येथे सध्या १३२ नियमित सदस्य असून अखंड कार्यरत आहेत. दिवसाचे २४ तास जगभरातून यामध्ये भर घालणे चालू आहे. हे सर्व सदस्य नियमितपणे या वेबसाइटसाठी काम करीत आहेत.
मराठी विकिपीडियाचा प्रचालक म्हणून अभ्यास करील असताना असे लक्षात आले की देवनागरी लिपीमध्ये लिहिताना सामान्य जणांना येणार्या अडचणी या मराठी विकिपीडिया ला सध्या मारक ठरीत आहेत. इंग्रजी ही जगाची भाषा असल्याने आजकाल प्रत्येकाला इंग्रजी मध्ये टाइप करता येते पण त्याच सहजतेने मराठी मध्ये टाइप करणे अथवा लिहिणे बहूसंख्य लोकांना जमत नाही. अशा वेळेस साहजिकच जे सोपे आहे त्याकडे धावण्याचा कल असल्याने मराठी पेक्षा इंग्रजीकडे धावण्याचा मोह सर्वांना होतो. आज बहुसंख्य मंडळींना मराठी विकिपीडिया माहिती आहे आणि ते मराठी विकिपीडिया फक्त माहिती पहाण्यासाठी भेट देतात पण या ज्ञान कोशात भर घालणे ही तितकेच महत्वाचे आहे. आज मराठी मध्ये असंख्य वेब साइट्स, ब्लॉग्स लिहिले जातात पण त्यातल्या बर्याच लेखकांना त्यात भर कशी घालायची याचे फारसे ज्ञान नसते. एमेल सुद्धा जवळ जवळ सर्वच जण देवनागरी च्या ऐवजी रोमन मधेच लिहिणे जास्त पसंत करतात. आज सगळे संगणक रोमन लिपीचा की बोर्ड वर देत असल्याने देवनागरी संगणकावर लिहिणे हे असंख्य जणांना अवघड गोष्ट आहे. अनेक जण या बाबतीत नाराजी व्यक्त करतात. अगदी गुगल च्या सर्च इंजिनवरही मराठी शब्द शोधणे ही सोपी गोष्ट नाही. मराठी टायपिंग म्हणजे कटकट अशी अनेकांची धारणा असते. त्यामुळे साहजिकच अनेक मराठी मंडळी मराठी विकिपीडिया पासून किंवा मराठी विकिपीडियाच्या संपादन पासून वंचित राहतात.
या सर्व अडचणी विचारात घेता मराठी विकिपीडिया मधील काही संपादकांनी विविध पर्याय लेखकांना देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी विकिपीडिया वर एक देवनागरी फॉन्ट दिलेला आहे. हा उनिकोड फॉन्ट असून वापरायला अतिशत सोपा आहे. मराठी विकिपीडियाच्या कुठल्याही पानावर उजव्या कोपर्यात “देवनागरी” अशी अक्षरे असून त्याच्या शेजारी एक छोटी चौकट आहे. त्या चौकटीत ‘टिक’ केले की मराठी विकिपीडियावर आपण देवनागरी मध्ये लिहायला सुरुवात करू शकतो.
काही जणांना हा देवनागरी फॉन्ट वापरणे काहीसे अवघड जात असेल तर त्यांनी निराश व्हायचे काहीच कारण नाही. त्यासाठी इंटरनेट च्या जाळ्यात अनेक सोयी आहेत. त्या अशा:
- गूगल ने मराठी ट्रान्सलेटरेशन टुल तयार केले आहे. http://www.google.com/transliterate या मध्ये रोमन मध्ये लिहिलेला शब्द स्पेस बार दाबल्यावर देवनागरी लिपीमध्ये रूपांतरित होतो. या मध्ये काही ओळी लिहून त्या कॉपी करून मराठी विकिपीडिया वर तक्ता येऊ शकतात.
- तामिळ क्यूब ने एक उनिकोड कन्व्हर्टर तयार केला असून ही सुविधा मराठी लेखांसाठी उपयोगी पडू शकते. http://www.tamilcube.com/translate/marathi.aspx
- क्वीलपॅड या वेब साईट मध्ये भारतातील विविध भाषांमध्ये लिखाण करायची सुविधा दिली आहे. http://www.quillpad.in/marathi/. त्यामध्ये मराठी भाषा निवडून देवनागरी मध्ये लिखाण करता येते.
- ज्यांना देवनागरी लिपीमधील लिखाण एका ठिकाणी लिहून दुसरीकडे कॉपी करणे अवघड जात असेल त्यांच्यासाठी अजून एक झकास सोय ‘एपिक’ नावाचा एका भारतीय ब्रौझर मध्ये आहे. http://www.epicbrowser.com/ . यात 12 भारतीय भाषांसह एकूण 20 जागतिक भाषांमध्ये कोणत्याही इंटरनेटवरील खिडकीमध्ये लिहायची सोय आहे. हा ब्रौझर एकदाच आपल्या संगणकावर उतरवून घेतल्यावर आपल्याला हवे असलेले कोणतेही पान त्या ब्रौझर मध्ये उघडायचे आणि ज्या खिडकी मध्ये आपल्याला लिहायचे आहे तेथे गेल्यावर त्या खिडकीच्या उजवीकडील वरील कोपर्यात भाषांचा पर्याय येतो. तेथे मराठी भाषा निवडून त्या मुख्य खिडकीत सरळ लिहीत सुटायचे. प्रत्येक रोमन लिपीतील शब्दाचे देवनागरी मध्ये आपसूक भाषांतर केले जाते. जिथे एका रोमन शब्दाचे अनेक देवनागरी शब्द होऊ शकतात तेथे तसे पर्याय पाहायला मिळतात.
- आता अनेक लेखक असे म्हणू शकतील की वरील सर्व पर्यायांना इंटरनेट असणे किंवा संगणकावर इंटरनेट चालू राहणे आवश्यक आहे. जर काही मंडळींना आधी माहिती पूर्ण लिहून मगच मराठी विकिपीडियावर भरायची असेल तर त्यांच्यासाठी मायक्रोसोफ्ट ने एक सुंदर सोय केली आहे. http://specials.msn.co.in/ilit/Marathi.aspx या वेबसाइट वरून काही माहिती आपल्या संगणकात उतरवून घ्यायची आणि संगणकात कंट्रोल पॅनल मधील ‘भाषा’ मध्ये काही छोटेसे बादल केले तर संगणकाच्या लँग्वेज बार मध्ये मराठी भाषा येऊन बसेल. ती भाषा निवडली की अगदी सहज पाने वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट मध्ये कोठेही कसेही लिखाण करता येईल. हे लिखाण करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नाही. तसेच जिथे एका रोमन शब्दाचे अनेक देवनागरी शब्द होऊ शकतात तेथे तसे पर्याय पाहायला आहेतच.
तात्पर्य, देवनागरी लिहिणे हे आता अगदी सोपे झाले आहे. मराठी विकिपीडिया मध्ये भर घालण्यासाठी आणि मराठी विकिपीडिया उतरोत्तर वाढवण्यासाठी ज्या अडचणी येतात त्यावर विकिपीडिया ची तांत्रिक मंडळी अहोरात्र काम करीत असतात.
दिनांक १८ ते २० नोव्हे. २०११ या काळात मुंबई येथे “WikiConference India 2011” भरवली जात आहे. या सम्मेलनात ‘मराठी विकिपीडिया’ हा अतिशय प्राधान्याने घेतला गेला आहे. यात मराठी भाषेतून काही भाषणे आणि चर्चासत्र आयोजित केली असून महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरून मराठी भाषिक आणि अन्य भाषिक येथे येणार आहेत. त्याचप्रमाणे मुख्य संमेलनात मराठी विकिपीडिया बरोबरच अन्य भारतीय भाषां संदर्भात माहितीची देवाणघेवाण आणि चर्चा आयोजली आहे.
मराठी विकिपीडिया पाहण्यासाठी http://mr.wikipedia.org वर भेट द्या आणि मराठी विकिपीडिया मध्ये आपण सारे आपल्याकडे असलेल्या ज्ञानाची भर घालूया.