Android app on Google Play

 

अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 1

 

अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान

या पुस्तकाच्या तिसर्‍या प्रकरणात दिलेल्या विशुद्धिमार्गाच्या उतार्‍यात दहा अनुस्मृति एकत्र आल्या आहेत.  पैकी आनापानस्मृति आणि कायगतास्मृति यांचा विचार अनुक्रमे तिसर्‍या आणि चवथ्या प्रकरणात केला गेल्यामुळे बाकी आठच अनुस्मृति राहतात.  त्यांचा विचार या प्रकरणात करावयाचा आहे.  या स्मृतीपैकी पहिल्या सहा सुत्तपिटकांत अनेक ठिकाणी एकत्र सापडतात.  त्या उपासक आणि उपासिका यांस उद्देशून सांगितल्या आहेत.  सर्वांत प्रथम अर्थातच बुद्धानुस्मृति येते.  तिचे आणि इतर पाचांचेही विधान मूळ पालि शब्दांसह येथे देत आहे.

बुद्धानुस्मृतीचे विधान असे ः-  इति पि सो भगवा अरहं सम्मासंबुद्धो विज्जाचरणसम्पन्नो सुगतो लोकविदू अनुत्तरो पुरिसदम्मसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवा ति ।

याप्रमाणे तो भगवान् अरहन् सम्यक संबुद्ध, विद्याचरणसंपन्न, लोकवित् श्रेष्ठ, दमन करण्यास योग्य पुरुषांचा सारथि, देवांचा आणि मनुष्यांचा गुरु बुद्ध भगवान आहे.

अशा रीतीने बुद्धगुणांचे ध्यान केले असता चित्ताला शांती मिळून ते एकाग्र होते.  परंतु ही एकाग्रता प्रथमध्यानापर्यंत जाऊ शकत नसल्यामुळे तिला उपचारसमाधि म्हणतात.  गावाच्या किंवा नगराच्या आसन्न प्रदेशाला ग्रामोपचार किंवा नगरोपचार म्हणतात; त्याप्रमाणे ही समाधि ध्यानाच्या जवळ असल्याकारणाने हिला उपचार समाधि म्हणतात.  पण पहिल्या, प्रकरणात आलेल्या चार ध्यानांना अर्पणा (अप्पना) समाधि म्हणतात.  लहान मूल चालण्याचा प्रयत्‍न करीत असता जसे पुनः पुनः पडते तशी उपचार समाधि फार वेळ टिकू शकत नाही; परंतु बळकट मनुष्य जसा दीर्घ काळ चालू शकतो, तशी अर्पणा समाधि पुष्कळ वेळ टिकते.  तरी लहान मुलाचा चालण्याचा प्रयत्‍न जसा त्याला चालण्याला समर्थ करतो, तसा योगी उपचारसमाधीच्या योगाने अर्पणा समाधि प्राप्‍त करून घेतो.

या भागात सांगितलेल्या सर्व कमस्थानांवर केवळ उपचारसमाधि साधता येते; कोणतेही ध्यान साधता येत नाही.  याचे कारण हेच की तन्मयता होण्याइतका दृश्य किंवा व्यापक विषय या कर्मस्थानात नाही.  बुद्धाचे गुण निरनिराळे असल्यामुळे त्यांच्यावर ध्यान साधता येणे शक्य नाही.  त्याचप्रमाणे इतर सात कर्मस्थानांची गोष्ट आहे.  मरणस्मृति थोडीशी भिन्न आहे खरी, तरी मरण हा दृश्य किंवा व्यापक विषय नाही.  अर्थात् त्यांच्यात तन्मयता होणे शक्य नाही.  इतरांप्रमाणों मरणस्मृतीमुळेही केवळ उपचारसमाधि साध्य होते.  व्यवस्थान म्हणजे आभ्यंतरच्या पृथ्वी, आप्, तेज आणि वायु या चार धातूंचे व्यवस्थान.  तेहि असेच बिकट असल्यामुळे त्यावर उपचारसमाधि तेवढी मिळवता येते.  संज्ञा म्हणजे आहार प्रतिकूल आहे अशी संज्ञा हीही गोष्ट दृश्य किंवा व्यापक नाही.  म्हणून तिची मजल उपचार समाधीपलीकडे जात नाही.
 

समाधिमार्ग

धर्मानंद कोसंबी
Chapters
समाधिमार्ग 1
समाधिमार्ग 2
समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 1
समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 2
समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 3
समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 4
समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 5
समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 6
समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 7
समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 8
समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 9
आनापानस्मृतिभावना 1
आनापानस्मृतिभावना 2
आनापानस्मृतिभावना 3
आनापानस्मृतिभावना 4
आनापानस्मृतिभावना 5
कायगतास्मृति आणि अशुभे 1
कायगतास्मृति आणि अशुभे 2
कायगतास्मृति आणि अशुभे 3
कायगतास्मृति आणि अशुभे 4
कायगतास्मृति आणि अशुभे 5
ब्रम्हविहार 1
ब्रम्हविहार 2
ब्रम्हविहार 3
ब्रम्हविहार 4
ब्रम्हविहार 5
अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 1
अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 2
अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 3
अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 4
अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 5
अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 6
कसिणे 1
कसिणे 2
कसिणे 3
कसिणे 4
कसिणे 5
अरुपावचर आयतने 1
अरुपावचर आयतने 2
विपश्यनाभावना 1
विपश्यनाभावना 2
विपश्यनाभावना 3
विपश्यनाभावना 4
विपश्यनाभावना 5