Get it on Google Play
Download on the App Store

ब्रम्हविहार 2

आरंभी शत्रूवर प्रेम करण्याचा प्रयत्‍न केला असता चित्ताला आघात पोचतो, व शत्रूचे अपराध अधिकाधिक डोळ्यासमोर येऊ लागल्यामुळे मन उद्विग्न होऊन जाते.  स्त्रीने पुरुषावर किंवा पुरुषाने स्त्रीवर मैत्रीभावनेला आरंभ केला असता चित्तांत कामविकार उत्पन्न होऊन समाधीला भयंकर विघ्न करतो.  मृतावर मैत्रीभावनेला आरंभ केला, तर समाधि साध्यच होत नाही.  तेव्हा अशा रीतीने आरंभ न करता प्रथमतः स्वतःवर किंवा सदृश दोस्त माणसावर आरंभ करून मग शत्रूवरहि मैत्री करण्यास शिकावे.  नंतर या गावचे लोक सुखी होवोत, नंतर देशातील, नंतर सर्व पृथ्वीवरील लोक सुखी होवोत, असा विचार करावा.  नंतर सर्व स्त्रीजाति सुखी होवो, नंतर सर्व पुरुषजाति सुखी होवो, आर्य सुखी होवोत, अनार्य सुखी होवोत, देव सुखी होवोत, दुर्गतीला गेलेले प्राणी सुखी होवोत, दशदिशाला सर्वत्र सर्व प्राणी सुखी होवोत, अशा पद्धतीने हळूहळू सर्व प्राणिमात्रावर अगाध प्रेम करण्यास शिकावे.  येणेकरून चित्तांतील कामक्रोध दबून जातात आणि मन एकाग्र होते.

करुणेला प्रारंभ शत्रु आणि मित्र यांजपासून न करता मध्यस्थ मनुष्यापासून करावा.  रस्त्यावर बसणारे भिकारी, रुग्णालयांत असलेले रोगी, किंवा असेच अन्य सदृश मनुष्य पाहून त्यावर करुणेला आरंभ करावा.  नंतर आवडत्या मनुष्यावर, नंतर शत्रुवर आणि नंतर स्वतःवर करुणा करावी.  यापैकी सध्या जरी कोणी दुःखी नसला, तरी दुःख हे सर्वांच्या मागे लागलेलेच आहे,  कधीनाकधी व्याधिजरामरणाच्यायोगें सर्व प्राणी करुणाजनक स्थितीत येतातच येतात, असा विचार करून सर्वांवर सारखीच करुणा उत्पन्न करावी.

मुदितेला आरंभ सदृश अतिप्रिय माणसापासून करावा.  ज्याला पाहिल्याबरोबर आपणाला हर्ष होतो, आणि आपणाला पाहिल्याबरोबर ज्याला हर्ष होतो, अशा मनुष्यावर मुदितेला आरंभ करून नंतर क्रमशः मध्यस्थ आणि शत्रू यांवर मुदिता करून हळूहळू सर्व प्राणिमात्रांवर मुदिता करण्यास शिकावे.  काही मनुष्य सध्या दुःखांत पडलेले असले तरी कधीना कधी असा एक काळ होता की, ज्या वेळी ते अत्यंत प्रमुदित स्थितीत होते, आणि असा एक काळ येण्याचा संभव आहे की, त्यावेळी आज विपन्नावस्थेत असलेले प्राणी अत्यंत आनंदित होतील, अशा रीतीने विचार करून सर्व प्राणिमात्रांवर मुदिता उत्पन्न करावी.  सर्व प्राणी आपल्याप्रमाणेच प्रमुदित अंतःकरणाने परस्परांकडे पहात आहेत, आणि परस्परांशी वागत आहेत, असा सुन्दर देखावा डोळ्यांसमोर उभा करून त्यातच चित्त एकाग्र करावे व समाधि साधावी.

उपेक्षेला मध्यस्थ सदृश व्यक्तीपासून आरंभ करावा.  नंतर प्रिय मनुष्यावर, नंतर शत्रूवर आणि नंतर स्वतःवर उपेक्षाभावना करावी, मुलगा एकटाच खेळत असता किंवा गाढ झोपला असता आई जशी त्याची उपेक्षा करते, त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्रांविषयी जागृत उपेक्षा उत्पन्न करून समाधी साध्य करावी.

याप्रमाणे थोडक्यात या चार ब्रह्मविहारांचे विधान आहे.  या संबंधाने विशुद्धिमार्गात फार विस्तार केला आहे.  त्यात मुख्य गोष्ट शत्रुवर या भावना कशा करता येतील ही आहे, आपणावर, मित्रावर किंवा मध्यस्थावर या भावना करण्यास विशेष परिश्रम पडत नाहीत, पण शत्रू डोळ्यांसमोर आल्याबरोबर चित्त चलबिचल होते.  त्याला आवरून धरण्यासाठी बुद्धाच्या आणि साधुसंतांच्या उपदेशाचे आणि वर्तणुकीचे वारंवार मनन करावे.  अशी उदाहरणे आणि उपदेश विशुद्धिमार्गात पुष्कळ दिले आहेत.  त्याशिवाय ख्रिस्तासारख्याची उदाहरणे जगाच्या इतिहासात आहेतच.  त्या सर्वांचे पुनः पुनः परिशीलन करून शत्रुविषयी या सर्व भावना करण्यास शिकावे.

समाधिमार्ग

धर्मानंद कोसंबी
Chapters
समाधिमार्ग 1 समाधिमार्ग 2 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 1 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 2 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 3 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 4 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 5 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 6 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 7 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 8 समाधिला प्रतिबंधकारक गोष्टी 9 आनापानस्मृतिभावना 1 आनापानस्मृतिभावना 2 आनापानस्मृतिभावना 3 आनापानस्मृतिभावना 4 आनापानस्मृतिभावना 5 कायगतास्मृति आणि अशुभे 1 कायगतास्मृति आणि अशुभे 2 कायगतास्मृति आणि अशुभे 3 कायगतास्मृति आणि अशुभे 4 कायगतास्मृति आणि अशुभे 5 ब्रम्हविहार 1 ब्रम्हविहार 2 ब्रम्हविहार 3 ब्रम्हविहार 4 ब्रम्हविहार 5 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 1 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 2 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 3 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 4 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 5 अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 6 कसिणे 1 कसिणे 2 कसिणे 3 कसिणे 4 कसिणे 5 अरुपावचर आयतने 1 अरुपावचर आयतने 2 विपश्यनाभावना 1 विपश्यनाभावना 2 विपश्यनाभावना 3 विपश्यनाभावना 4 विपश्यनाभावना 5