ब्रम्हविहार 3
मैत्रीभावनेचा जवळचा शत्रु म्हटला म्हणजे वैयक्तिक स्नेह होय. विवेकपूर्वक मैत्रीभावना न केल्यास एकाच व्यक्तीवर फाजिल स्नेह जडण्याचा संभव असतो, आणि तसे झाले तर या भावनेपासून फायदा न होता हानिच होते. व्यक्ती अनित्य आहे आणि काही कारणाने ती आपल्या विरुद्ध गेली, आपणापासून विभक्त झाली, किंवा नाश पावली, म्हणजे आपणाला आतोनात दुःख होते. म्हणून मैत्रीचे पर्यवसान व्यक्तिगत स्नेहात होऊ नये यासाठी अत्यंत खबरदारी घेतली पाहिजे. द्वेष मैत्रीचा दूरचा शत्रु आहे. त्याला भिण्याचे कारण नाही. ज्याच्या चित्तांत मैत्रीचे अधिष्ठान झाले त्याला त्याच वेळी राग येण्याचा संभव नाही. म्हणून द्वेषापासून निर्भय राहून मैत्रीभावना करावी.
शोक हा करुणेचा आसन्न शत्रु आहे. करुणेचा अतिरेक झाला तर शोक उत्पन्न होतो. एका ख्रिस्तीपंथांत अशी चाल आहे की, ज्या दिवशी ख्रिस्ताला क्रॉसवर खिळले, त्या दिवशी प्रार्थनेच्या वेळी सर्व समुदाय मोठमोठ्याने रडून जगासंबंधाने शोक करीत असतो; म्हणजे त्याच्या करुणेचे पर्यवसान शोकात झाले आहे, हे स्पष्ट दिसून येते. अशा रीतीने करुणेचे पर्यवसान शोकात होणे, ही तिची विपन्नावस्था आहे, असे जाणून शोकापासून करुणा मुक्त असावी याविषयी अत्यंत खबरदारी घ्यावी. दुसर्याला उपद्रव देण्याची बुद्धि हा करुणेचा फार दूरचा शत्रु आहे. ज्याच्या मनात करुणा उद्भवली तो मनुष्य त्याच वेळी जाणूनबुजून दुसर्या प्राण्याला त्रास देईल, हे संभवत नाही म्हणून अशा त्रासदायक बुद्धीपासून निर्भय राहून करुणाभावना पुढे चालवावी.
हास्य मुदितेचा आसन्न शत्रु आहे. मुदिता विचारपूर्वक केली नाही तर भलत्याच प्रसंगी हास्य उत्पन्न होण्याचा संभव असतो, आणि असे झाले म्हणजे त्याची वेड्यात गणना होण्यास उशीर लागत नाही. म्हणून मुदिता भावना करणार्याने मुदितेचे पर्यवसान हास्यात न होऊ देण्याविषयी खबरदारी घ्यावी. अरति किंवा असंतोष हा मुदितेचा फार दूरचा शत्रु आहे. ज्याच्या मनात मुदिता उद्भवली तो त्याच वेळी असंतुष्ट होईल, हे संभवत नाही. म्हणून असंतुष्टीपासून निर्भय होऊन मुदिताभावना करावी.
अडाणी (अज्ञान) उपेक्षा उपेक्षाभावनेचा आसन्न शत्रु आहे. इकडे घराला आग लागली आहे आणि तिकडे काही लोक गप्पा मारीत बसले आहेत, अशा प्रकारच्या उपेक्षेला अडाणी उपेक्षा म्हणतात. ती खरी उपेक्षा नव्हे. व्यवहारात तिला आपण निष्काळजीपणा म्हणतो आणि उपेक्षाभावनेचे अशा निष्काळजीपणात पर्यवसान होऊ देणे म्हणजे तिला विपन्नावस्थेत ढकलून देण्यासारखे आहे. म्हणून उपेक्षाभावना करणार्याने निष्काळजीपणापासून अत्यंत सावध राहिले पाहिजे. व्यक्तिगत स्नेह उपेक्षेचा फार दूरचा शत्रु आहे. ज्याला थोडीशी उपेक्षा साधली, त्याचे मन व्यक्तिगत स्नेहात बद्ध व्हावयाचे नाही, मग ज्याला उपेक्षा पूर्णपणे साधली, तो स्नेहजाळात सापडेल. हे अगदी अशक्य आहे. म्हणून स्नेहापासून निर्भय राहून उपेक्षाभावना करावी.
थोडक्यात सांगावयाचे म्हटले म्हणजे, द्वेषाचे उपशमन होणे ही मैत्रीची संपत्ती आणि व्यक्तीगत स्नेहात बद्ध होणे ही विपत्ती त्रासदायक बुद्धि नष्ट होणे ही करुणेची संपत्ती व शोक उत्पन्न होणे ही विपत्ती असंतोष नाश पावणे ही मुदितेची संपत्ति आणि हास्यात पर्यवसान होणे ही विपत्ति. स्नेहापासून मुक्त होणे ही उपेक्षेची संपत्ति आणि निष्काळजीपणात पर्यवसान होणे ही विपत्ति. हे यथोचित जाणून आपले चित्त त्या त्या भावनेने संपन्न होईल असा प्रयत्न करावा.