स्वदेशी समाज 29
आज आपण दीनदरिद्री असलो तरी तो उज्ज्वल भविष्यकाळ आपण आपल्या अंतश्चक्षूसमोर सदैव राखू या. तो उज्ज्वल काळ जेव्हा येईल तेव्हा आपले नातूपणतू असे अभिमानाने म्हणतील की “हे सारे आमचे आहे ; हे सारे आम्ही निर्मिले, आम्ही उभारले ; ही शेति आम्ही सुपीक व समृद्ध केली, हे पाटबंधारे आम्ही बांधले ; ही दलदल आम्ही हटवली, हे रोग आम्ही दूर केले ; हे वातावरण आम्ही निर्मळ केले, हे ज्ञान आम्ही पसरविले ; हे बळ आमचे आम्ही मिळविले ; आम्ही आमचे दुर्बलत्य झुगारून हा काळ निर्माण केला ; आमच्या भाग्याचे आम्हीच विधाते.”
ते आणखी असे म्हणतील की “ही भरतभूमी, ही सुजला, सुफला, सस्यशामला, प्रेमळा, निर्मळा मंगला भरतभूमी- ही आमची हो आमची. श्रमाने जगणारे, सत्याने वागणारे दुस-या कोणास न नाडणारे, न पाडणारे, संयमशील व सामर्थ्यवंत असे हे आमचे राष्ट्र. या राष्ट्राकडे जो कोणी दृष्टी फेंकील त्याला जिकडे तिकडे उद्योग दिसेल, प्रयत्नांची पराकाष्ठा दिसेल. ध्येयांना कृतीत आणण्यासाठी अहोरात्र चाललेली धडपड दिसेल ; ह्या आमच्या राष्ट्रांत सर्वत्र चैतन्य नाचत आहे, उत्साह उसळत आहे, आशा, आनंद व प्रेम यांची गाणी गुणगुणली जात आहेत, असे दिसेल. अनंत मार्गांनी अनंत यात्रेकरू न दमता न थकता, त्या उज्ज्वल स्थानाकडे, त्या परम मंगल परमेश्वराच्या सिंहासनाकडे धडपडत जात आहेत व त्यांच्या पायाखाली ही धरित्री डळमळत आहे असे त्याला दिसेल !”