Get it on Google Play
Download on the App Store

स्वदेशी समाज 21

निबंध ३ रा.
सर्वांचा मिळून एकच राष्ट्रीय पक्ष होऊ दे.


मी कोणत्याही एका विशिष्ट पक्षाचा नसल्यामुळे राष्ट्रीय-सभेत जे झगडे झाले, त्यांचे ति-हाईत या नात्याने मला नीट निरीक्षणपरिक्षण करता आले. ज्यांना ते प्रत्यक्ष पहावे लागले, ज्यांच्या मनाला जबर धक्का बसला, त्यांची गोष्ट माझ्याहून निराळी आहे. ते ती गोष्ट लौकर विसरू शकणार नाहीत. परन्तु जी गोष्ट होऊन गेली, तिची उद्वेगजनक स्मृति सदैव ताजी ठेवणे हे बरे नव्हे. राष्ट्रीय आरोग्याचे ते लक्षण नाही. राष्ट्राची मंदावत चाललेली नाडी आज जीवनरसाने पुन्हा उडू लागली आहे. यासाठी मधूनमधून जरी असे वाताचे झटके आले तरी नाडी ठीक असल्यामुळे निराश होता कामा नये. पूर्वीचे आरोग्य पुन्हा प्राप्त होणार यांत शंका नाही. थोडा उशीर लागेल एवढेच. जो नवीन जीवनरस उत्पन्न होत आहे, त्यांच्या बळावर हे झटके सहज सहन करू शकू. तो जीवनरस एकदम जोमाने भरू लागल्यामुळे तर हा धक्का बसला. येणा-या आरोग्याची, लाभणा-या चैतन्याची ही आगामी चिन्हे आहेत. वाळलेले लाकूड तोडले तर ते वाढत नाही. परन्तु जिवंत वृक्षाला तोडले तर तो आणखी फोफावतो. राष्ट्राला झालेली आजची जखम आपण चिघळू देता कामा नये. आपले वाढते आरोग्य प्रकट करून ती जखम त्वरित भरून काढू या. जो धडा आपणांस शिकविण्यांत आला आहे, तो नम्रपणे शिकून अधिक विवेकी व शहाणे होऊन पुनश्च ऐक्याचे नवीन प्रयत्न करू या.

आजपर्यंत सारे राष्ट्र मृतवत् पडले होते. आता नाना रुपांनी, नाना दिशांनी जीवन पुन्हा प्रगट होत आहे. अशा वेळेस हट्ट धरून चालणार नाही. सर्व भिन्न भिन्न मतांबद्दल आपण आदर दाखविला पाहिजे, सहिष्णुता राखली पाहिजे. अखिल राष्ट्राच्या एकीकरणार्थ व वैभवार्थ प्रत्येकाने दुस-याशी अविरोधी राहून स्वतःची कार्यपद्धती आखावी असे ठरले पाहिजे. असे केल्यानेच आपणांस चांगले शिक्षण मिळेल, कार्यपद्धती समजेल. असा अनुभव घेतल्याशिवाय, अशा गोष्टी शिकल्याशिवाय, स्वराज्य म्हणजे एक भ्रान्त कल्पना राहील. कोणत्याहि स्वतंत्र राष्ट्रांत कोणतेहि मत दाबले जात नाही. निरनिराळ्या विरुद्ध पक्षांची एकमेकांवर क्रिया प्रतिक्रिया होत असते. प्रत्येक पक्ष धडपडतो व शेवटी एक निकाल बाहेर पडतो. तो निकाल बलवान असतो. इंग्लंडमध्ये मजूरपक्ष किंवा समाजसत्तावादी पक्ष-ज्यांचे विचार क्रान्तिकारक असतात- त्यांनाहि तेथील पार्लमेंटमध्ये स्थान आहे. इतके परस्परविरुद्ध पक्ष असूनहि त्यांच्या प्रतिनिधीमध्ये अशा प्रकारचे सहकार्य कसे बरे शक्य होते ? ते शक्य होते याचे कारण स्वातंत्र्यासाठी जे अनेक दिव्य झगडे त्यांनी केले, त्या झगड्यातून त्यांनी जे शिस्तीचे शिक्षण मिळविले ते होय. ही शिस्त त्यांच्या हाडीमासी खिळलेली आहे. आईच्या दुधाबरोबरच हे शिस्तीचे बाळकडू त्यांना पाजले जाते. ह्यामुळे नाना मतभेद असले, कितीही कटु वादविवाद झाले, तरी क्रियेचे व ध्येयाचे ऐक्य तेथे राहू शकते.

परन्तु आपण ज्या सभापरिषदा भरवितो, तेथे प्रत्यक्ष कार्याची कल्पनाच नसते. त्यामुळे जबाबदारीचीही जाणीव नसते. राष्ट्रीय वृत्ति व एक राष्ट्रीय इच्छा उत्पन्न व्हावी व ती वाढीस लागावी, यासाठी ह्या सभा परिषदा अस्तित्वांत आल्या. राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी भरवलेल्या या परिषदांतहि जेथे देशांतील थोर थोर पुढारी जमतात, वेचक माणसे एकत्र येतात, तेथेहि जर विरुद्ध मतांबद्दल आपण आदर दाखविला नाही तर या जगांत आपण फारच हिणकस ठरू.

स्वदेशी समाज

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
स्वदेशी समाज 1 स्वदेशी समाज 2 स्वदेशी समाज 3 स्वदेशी समाज 4 स्वदेशी समाज 5 स्वदेशी समाज 6 स्वदेशी समाज 7 स्वदेशी समाज 8 स्वदेशी समाज 9 स्वदेशी समाज 10 स्वदेशी समाज 11 स्वदेशी समाज 12 स्वदेशी समाज 13 स्वदेशी समाज 14 स्वदेशी समाज 15 स्वदेशी समाज 16 स्वदेशी समाज 17 स्वदेशी समाज 18 स्वदेशी समाज 19 स्वदेशी समाज 20 स्वदेशी समाज 21 स्वदेशी समाज 22 स्वदेशी समाज 23 स्वदेशी समाज 24 स्वदेशी समाज 25 स्वदेशी समाज 26 स्वदेशी समाज 27 स्वदेशी समाज 28 स्वदेशी समाज 29 स्वदेशी समाज 30 स्वदेशी समाज 31 स्वदेशी समाज 32 स्वदेशी समाज 33 स्वदेशी समाज 34 स्वदेशी समाज 35 स्वदेशी समाज 36 स्वदेशी समाज 37 स्वदेशी समाज 38 स्वदेशी समाज 39