स्वदेशी समाज 5
भारताची खरी कार्यपद्धती कशी असे हे पाहणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या देशांत मुख्यतः जर कसला प्रयत्न पूर्वी केला जात असेल तर तो मनुष्यामनुष्यांमध्ये ओलावा निर्माण करण्याचा हाय. परस्परांत स्नेहसंबंध निर्मिण्यासाठी भारतांत खटपटी केल्या जात. आपले संबंध दूरदूरच्याहि नातलगांशी असत. मुलेबाळे मोठी झाली तरी प्रेमसंबंध तसेच टिकत. शेजारी गावकरी-मग तो कोठल्याही जातीचा वा धर्माचा असा-त्याबद्दल आपणांस आपलेपणा वाटे. असे हे प्रेमसंबंध कायद्याने जोडलेले नसत. ते हृदयाचे संबंध असत. ज्याच्याज्याच्याशी म्हणून संबंध येई, त्याला आपण आपल्या मैत्रिच्या वर्तुळांत ओढून घेत असू, मनुष्य म्हणजे केवळ यंत्र आहे, त्याच्यापासून आपला फायदा जास्तींत जास्त कसा करुन घेता येईल एवढेच पाहावे अशी भारतीयांची कधींच दृष्टि नव्हती.
प्रेमाचे संबंध जोडीत जाणे हा आपला विशेष आहे. परिस्थितीप्रमाणे आपण आज जरी बदलत असलों तरी त्या बदलांतही हृदयाचे संबंध, हृदयाचा ओलावा, आपल्या सर्व व्यवहारांत प्रामुख्याने दिसतो. त्यामुळे व्यवहार बाजारी न होता विशुद्ध व निर्मळ होतो. यामुळे कित्येक वेळा आपणांवर जबाबदारीही जास्त पडते. केवळ जरुर म्हणून जीं बंधने निर्माण होतात ती तात्पुरती असतात. धनी व नोकर यांच्यातील संबंध जर केवळ व्यवहारीक गरजेचे असतील तर काम करावे व मजुरी घ्यावी एवढाच त्या संबंधाचा अर्थ राहील. परन्तु जर त्या संबंधांत वैयक्तिक भावना ओतावयाची असेल तर दोघांवर अधिक जबाबदारी येते. त्या धनीनोकरांत सुखदुःखांत भागीदार होण्याचे संबंध उत्पन्न होतात व ते संबंध दोघांस कायमचे जोडतात.
आपण हल्लीच्या प्रचंड सभा परिषदा बोलावतो. तेथे स्वागतसत्कार करण्यांत स्थानिक कार्यकर्ते मग्न होऊन जातात. आलेल्या पाहुण्यांस तकलीफ पडू नये, त्यांना सर्व प्रकारच्या सुखसोई मिळाव्या म्हणून आपण झटतो. व्यवहाराच्या बाह्य कामकाजांतही हृदय ओतून तो व्यवहार आपण सुंदर करतो. परिषदांत काय ठरले यापेक्षा स्वागत कसे झाले. लोक कसे, दिलदार होते, कशी सुंदर व्यवस्था होती, हेच विचार आपल्या हृदयांत राहतात, अधिक राहतात. पाश्चिमात्य पद्धतीने भरलेल्या या सभा आमच्या पौर्वात्य हृदयाला मारु शकल्या नाहीत. लोकांचे मनःपूर्वक स्वागत करणे हा आमचा राष्ट्रीय धर्म आहे. राष्ट्रीय सभांच्या बैठकांतून हा आमचा स्वभावच अधिक टिकणारे कार्य करितो. ठराव होतात व मरुन जातात. वर्षभर त्यांचे नावंहि एकू येत नाही. परन्तु प्रेमाने केलेले स्वागत हृदयांत राहते. भारतीय ऐक्य निर्मिले जाते.
प्राचीन काळी गृहस्थास मोठ्या प्रमाणांत आदरातिथ्य करावयाचे असले म्हणजे तो य़ज्ञ करी. आज यशाचे स्वरुप बदलेले. आज सभापरिषदांच्या रुपाने ते प्रकट होत आहे. या सभापरिषदांतून मातृभाषेचा उपमर्द करणा-या भाषेंतून भाषणे झाली तरी भारतमाता खिन्न होत नाही. आलेल्या कोनाकोप-यांतील माझ्या लेकरांचे मी स्वागत करीन, त्यांना माझ्याजवळची प्रेमळ मीठभाकर देईन, या विचाराने तिचे हृदय भरुन य़ेई. पुस्तकी पंडितांची, वाचाळ वाक्पटूंची, मनगटांत घड्याळे बांधून आलेल्या शिष्टांचीच फक्त सभा होण्याऐवजी, जर त्या सभेत रावरंक, खेडवळ व नागरिक, आमंलित व निरामंत्रित सारे जमले असते व त्यांना समजेल असे कामकाज चालले असते तर भारत मातेला अधिक आनन्द झाला असता. अशा गजबजलेल्या सभेंत लांब भाषणे. व खंडीभर ठराव पास करता नसते आले. परन्तु मातेच्या मंगल आशीर्वादांची आपल्या शिरावर अधिकच वृष्टी झाली असती.