स्वदेशी समाज 1
आपल्या देशात राजा लढायी करी, परचक्रापासून रक्षण करी व कायद्याची अंमलबजावणी करी. परन्तु बाकीच्या सर्व गोष्टी समाजच करीत असे. पाणीपुरवठ्यापासून तों ज्ञानदानापर्यंतची सारी कामे समाजच संपादी. शेंकडों राजे येत व जात. परन्तु हा सामाजिक धर्म नष्ट होत नसे. अत्यंत सुलभतेने व स्वाभाविकपणे हीं सेवाकर्मे होत असत. राजे एकमेकांशी सारखे लढत. परन्तु मंदिरे उभारलीं जात, प्रवाश्यांसाठी धर्मशाळा बांधल्या जात, विहिरी तलाव खोदले जात, पंतोजी शिकवीत असत, रामायण वाचले जात असे, कथाकीर्तनें सुरू असत. सामाजिक जीवन बाह्य मदतीवर, कोणी सरकारवर अवलंबून नसे. आपण केवळ परावलंबी पशू बनत नसूं. बाहेरच्या स्वा-याशिका-यांनी, राजघराण्यांच्या येण्याजाण्यांनी, ही सामाजिक जीवनातील प्रशांत व सुंदर स्वतंत्रता नाहीशी होत नसे.
परन्तु आज कोठें आहे ती स्वाधीनता १ आज पाणीपुरवठा नाही, रस्ता चांगला नाहीं, गांवात शाळा नाहीं, म्हणून आपण रडत बसतो. आपल्या या सर्व गा-हाण्यांचे जे मूळ त्यांकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आपण लक्ष देऊं तंर आपणांस वांईट वाटेल. सार्वजनिक जीवनांत अतःपर आपले मन रमत नाही. ते कोठें तरीं बाहेर चालले आहे असे आपणांस दिसून येईल.
एखाद्या गांवाजवळून वाहणा-या नदीने जर आपला प्रवाह बदलला तर त्या गांवाचें भाग्य नाहीसे होईल. तेथील मळे, तेथील बागा दिसणार नाहींत. तें गाव ओसाड पडेल. घुबडें व वटवाघळें फक्त दिसू लागतील. नदीच्या प्रवाहाचें जसे हे महत्त्व आहे, तितकेंच किंबहुना अधिक मानवी मनःप्रवाहाचें आहे. आपल्या विचारांचा प्रवाह पूर्वी सामाजिक जीवनांत रमत असे. त्यामुळे खेड्यांपाड्यांतील वृक्षराजींत आनंद, समाधान व शांती हीं निर्दोष व पवित्र राहिली होती. परन्तु जनतेचें चित्त आतां भटक्या मारूं लागले आहे. खेड्यांना सोडून तें दूर जाऊं लागले आहे. खेड्यांना सोडून तें दूर जाऊं लागले आहे. त्यामुळे खेड्यांतील तळी गाळाने भरून गेली, मंदिरे पडून गेंली. खेड्यांत ना आनंद, ना कांही.
आतां सरकारनें पाण्याची सोय करावी, सरकारनें आरोग्याची व्यवस्था करावी, सरकारनें शिक्षण द्यावें, अशाप्रकारें सरकारचे दारांत आपण भीक मागत आहोंत. पूर्वीचें वैभवशाली झाड आज वरुन मदतीचे चार थेंब मिळतात का अशी आशाळभूषणें वाट पहात आहे. आपली ही याचना कोणी थोडीफार पुरविली तरी त्यांत काय शोभा ?
इंग्लंडमध्यें सरकार ही मुख्य व सर्वश्रेष्ठ संस्था आहे. आपल्या देशांतील राजशक्ती व इंग्लंड मधील राजशक्ती यांत फार भेद होता. लोकांच्या सुस्थितीची मुख्य जबाबदारी इंग्लंडमध्यें सरकारवर असते. तसें हिंदुस्थानांत नसे. असलीच तर फार थोडी असे. जे ऋषीमुनी समाजास मोफत शिकवीत त्याचे रक्षण व पोषण राजांना करावे लागत नसे असे नाहीं. परन्तु त्याची मुख्य जबाबदारी गृहस्थांवर असे. राजानें मदत दिली नाहीं, किंवा राजाच नसला, तरी समाजातील मुख्यमुख्य गोष्टींस त्यामुळे धोका पोंचत नसे. पाण्याची सोय राजा करीत नसे असें नाहीं. परन्तु इतर संपन्न लोक ज्याप्रमाणे आपलें कर्तव्य मानीत, तसेंच तें राजाहि मानी. राजानें हयगत केली तरी जलसंचय नाहींसे होत नसत. तलाव कोरडे पडत नसत. पाठशाळा बंद पडत नसत. कारण मुख्य आधार राजा नसून गृहस्थ असे.
इंग्लंडमध्यें प्रत्येक व्यक्तीला स्वतःची सुखे, स्वतःची करमणूक, स्वतःचा स्वार्थ ही संपादण्यांत कोणताही प्रत्यवाय नाही. सार्वजनिक कर्तव्यानीं ते बांधलेले नाहींत. महत्त्वाच्या सा-या जबाबदा-या तेथें सरकारवर आहेत. आपल्या देशांत राजावर फार जबाबदारी नसे. राजा कसा आहे याची फिकीर जनता फार करीत नसे. कारण आपलें सार्वजनिक जीवन ते राजावर अवलंबून ठेवीत नसत. सारी जबाबदारी समाज पार पाडी. ही जबाबदारी समाजांतील निरनिराळ्या घटकांवर नीट सोंपविलेली असे. श्रमविभागाची ही भारतीय पद्धति फार कार्यक्षम व अत्यंत आश्चर्यकारक अशी होती.