स्वदेशी समाज 22
“आमचा मतभेदच नाही, जाऊ द्या आमची मते चुलीत, आमच्या मतांचे काय एवढेसे”- असे वरपांगी बोलून, दिखाऊ ऐक्य निर्माण करा, असे मी कधीही सांगणार नाही. ते होणारहि नाही व झाले तरी हितकरहि नाही. या विश्वामध्ये लोटण्याची व खेचण्याची अशा दोन शक्ति आहेत. या दोन शक्तिप्रवाहांनी विश्वाचा विकास होत आहे. अशाच प्रकारची विकासपद्धती सर्व सनदशीर संस्थांतहि निर्माण झाली पाहिजे. आणि या प्रमाणे वागू लागल्यास परस्परविरुद्ध ध्येयांना फुटून दूर निघून जाण्याची पाळी न येता, तेथेच राहून वरचढ होण्यासाठी प्रयत्न करात येईल. उत्पन्न झालेली वाफ व्यर्थ जाऊ न देता, तिचा उपयोग करून घ्यावयाचा असेल तर वाफेला कह्यांत ठेवणारा बॉयलर तेथे अवश्य पाहिजे.
जोपर्यंत राष्ट्रांत जिवंतपणाच नव्हता, तोपर्यंत मतभिन्नताच दिसून येत नव्हती. तोपर्यंत अशा विकासवादी घटनेची जरूरच भासली नाही, परन्तु राष्ट्राचे हृदय आज पुन्हा उडू लागले आहे. आता राष्ट्राच्या मेंदूनेहि जागृत होऊन, अवयवांकडून नीट पद्धतशीर काम करून घेतले पाहिजे. राष्ट्रीय सभेची अनेक शकले व्हावी ही घटना फार दुःखदायी आहे.
एकाच मातृभूमीच्या अंगखांद्यावर आज शेकडो वर्षे हिंदुमुसलमान वाढवले जात आहेत, खेळवले जात आहेत. तरी अजूनहि आपण परस्परांहून किती दूर आहोत ? आपणांमधील ज्या काही विशेष दोषांमुळे हे असे होते, ते सारे दोष दूर केल्याशिवाय आपल्या प्रगतीच्या मार्गातील अडचणी दूर होणार नाहीत. हे दोष शोधून ते जोवर आपण समूळ खणून काढणार नाही तोपर्यंत आपल्या मोठमोठ्या आशाआकांशा फोल आहेत. हे दोष काढून टाकू तर परक्यांचे आपल्यामध्ये भांडण लावण्याचे प्रयत्न हास्यास्पद ठरतील. तसे खोडसाळ प्रयत्न मग कोणी करणारच नाही. सरकारला हे दुहीचे वणवे मग पेटवता येणार नाहीत. कारण पेटवण्यासाठी लागणारे इंधनच नसेल. निरिंधन अग्नी कसा पेटणार ? आणि थोडे फार इंधन सरकारजवळ राहिलेच तर सरकारच आधी धावपळ करून आगीचे बंब आणील व आग विझवील. अत्यंन्त गरीब व दरिद्नी माणसाच्या झोपडीला आग लावणे सम्राटालाहि करता येणार नाही ; कारण त्या ज्वाळा राजवाड्याकडेच पेटत जावयाच्या व राजवाडाच भस्म व्हावयाचा !
जुन्या बंधनांतून धडपडत जेव्हा एखादा नवीन पक्ष उदयास येतो, तेव्हा हा एक उपटसुंभ उभा राहिला, हा एक अभद्र धूमकेतु उत्पन्न झाला असे काहींना वाटू लागते. त्या नवीन पक्षाच्या मानेला नख लावून त्याला ताबडतोब मातीत मिळवावे असे त्यांना वाटते. मग नूतन पक्षहि अशा परिस्थितीत जर दंड थोपडून उभा राहिला, त्याने जरा आडदांडपणा केला, जरा शिष्टाचाराचे अतिक्रमण केले, तर ते क्षम्यच आहे. जे जे नवीन म्हणून निर्माण होते, ते संपूर्णपणे नवीन नसते. ते नैसर्गिक नियमांनीच उत्पन्न होते व जुन्याशीही अविभक्तपणे जोडलेले असते. कार्यकारणाच्या साखळीतील तो आणखी एक नवीन दुवा असतो. हे सारे लक्षांत घेऊन, नव्याजुन्यामध्ये जर काही झटापट झालीच, जर काही बाचाबाची, बोलाचाली झालीच तर ती तात्पुरतीच असणार. त्या झटापटीकडे फार लक्ष देऊ नये. या नव्या व जुन्या दोन्ही पक्षांचे एकीकरण होऊन एकच असा राष्ट्रीय पक्ष स्थापन होणार यांत शंका नाही.
राज्यकर्ते जो जो अधिक जुलूम करतील, तो तो त्या जुलमाला पुरून उरून जर राष्ट्र वर मान करू लागले, तर त्यांत भिण्यासारखे काय आहे ? अशामुळे सदैव असंतोषच राहील, धुसफूस राहील, असे भय वाटावयास नको. उलट राष्ट्र काही मेले नाही, हातपाय तरी झाडण्याची त्यांच्यात अद्याप धुगधुगी आहे, हे दिसून आल्याने अधिक उत्साह आपणांस वाटावा, अधिक आशा वाटावी. सरकारच्या जुलमाचा जरी प्रतिकार करता आला नाही, हातपायहि समजा हलवता आले नाहीत, तरीहि त्या जुलमाबद्दल जर मनांत अत्यन्त दुःख होत असेल, तर त्यांच्यातहि जिवंतपणा आहे असे वाटून मला आशा वाटते, भावनाशून्यता हा एक सद्गुण आहे असे मानावयास मी तरी कदापि तयार होणार नाही.