उपसंहार
उपसंहार
हे भविष्योत्तर पुराणातील वेंकटेशमाहात्म्य अतिलोकप्रिय आहे. यालाच "तिरुपति बालाजी" असेहि नाव आहे. हे महात्म्य अठराहि पुराणात असले तरी भविष्योत्तरपुराणातील महात्म्याचेच वाचन करण्याची परंपरा आहे. विशेषतः अश्विनी नवरात्रात पठण करण्याची परंपरा सर्वत्र रूढ आहे. या महात्म्याचे अध्याय पंधरा आहेत पण ते सर्व कोणी वाचत नाही. श्रीवेंकटेशाचा विवाह महोत्सव बाराव्या अध्यायात वर्णन केला आहे. तेथपर्यंतच वाचले जाते. पुढे संस्कृत महात्म्याचा गोषवारा दिला आहे. यद्यपि वेंकटेशाचा विवाह समारंभ वैशाख शु. दशमीला होत असला तरीहि वेंकटेशमाहात्म्याच्या बारा अध्यायाचा पाठ करण्याची नवरात्रात फार प्राचीन परंपरा आहे. सर्व भाषातून या संस्कृत भविष्योत्तर पुराणातील वेंकटेशमहात्म्याचा अनुवाद झाला आहे. पण मराठी भाषेत त्याचा अनुवाद नसल्याने अध्याय तेरा, चौदा आणि पंधराव्याचे सार या ठिकाणी देत आहोत.