अध्याय पाचवा
अध्याय पाचवा
शौनकादि ऋषी सूतास म्हणतात- हे महाभागा, सर्वशास्त्रविशारदा, पापनाशक असे वेंकटेश माहात्म्य ऐकिले. अवताराचे माहात्म्य, चोलराजास दिलेला शाप, वैकुंठाहून भूलोकी प्रयाणरूपी उत्तम असे देवचरित्र आम्ही ऐकिले. ॥१-२॥
हे दयासागरा, शिष्यावर प्रीति करण्यात तत्पर अशा सूता, तू दयाळू आहेस. आता वेंकटेशाचा संपूर्ण विवाहविधि सांग. आकाश राजा कोण? महालक्ष्मी त्याची कन्या कशी झाली? व श्रीहरि त्याचा जावई कसा झाला? हे सर्व मला सांग. कारण सज्जनांना आश्रयभूत असा श्रीनिवास, योगीजनांच्या मनासहि अगम्य असा आहे. ॥३-४॥
याकरिता तू आम्हास श्रीनिवासाचे वैवाहिक समारंभवृत्त सांग. जो मनुष्य हा श्रीनिवासाचा महिमा वर्णन करतो तो स्नानाचारात रत असणारा तो धन्य असतो. कारण श्रीहरीचा महिमा पुण्यवर्धक असतो. ॥५॥
याप्रमाणे मुनींचा प्रश्न ऐकून आदराने आपल्या शिष्यसंघास अतिशय भक्तीने नम्रतापूर्वक साधुजनाना योग्यप्रकारे सर्व चरित्र सांगण्यास प्रारंभ केला ॥६॥
सूत म्हणतो- हे ऋषीहो, शेषाचलाधिपती श्रीनिवासाचा अत्यंत कल्याणप्रद असा वधूपाणिग्रहणाचा वृत्तांत मी सांगतो. तुम्ही भक्तियुक्त मनाने ऐका. ॥७॥
एके दिवशी श्रीनिवास औषधाकरिता (औदुंबराच्या चिकासाठी) अरण्यात जाण्यासाठी अरुणोदयाचे सुमारास वारूळाच्या बाहेर निघाला. आणि त्याचेवेळी साळीच्या पिकाची नासधूस करीत असलेल्या वृषभ नामक दैत्याचा नाश करून मृगया करीत करीत आपल्या इतर सूकरासह वराहरूप परमात्मा त्याठिकाणी आला. ॥८-९॥
आणि त्याचवेळी वराहाने वेंकटेशास पाहिले. वेंकटेशाना पाहिल्याबरोबर वराहाने तू कोण आहेस? तू कोण आहेस? असे गर्जना करीत विचारीत असता वराहाचे अनुयायीहि तेथे आले. ॥१०॥
त्या सर्वांना पाहून वेंकटेश त्या सर्वांपुढे नम्र झाला. वेंकटेश नम्रपणे उभा राहिला. असता वराहरूप परमात्म्याने "वैकुंठातून आलेला हा लक्ष्मीपति श्रीहरि आहे असे जाणले. मग वराहाने वेंकटेशाबरोबर धैर्याने भाषण केले. ॥११-१२॥
वेंकटेशानेहि श्वेतवराहास जाणले. मग ते दोघेजण एकमेकांस मोठ्या उत्सुकतेने पाहात श्रीनिवासाच्या वारुळात आले. मग त्यावेळी एकमेकांच्या भेटण्यामुळे उभयताचे नेत्र आनंदाश्रूनी भरून आले. ॥१३॥
दोन रूपे घेतलेले ते दोघे-वेंकटेश व वराहदेव हे उभयता लोकविडंबन करीत बोलू लागले. ॥१४॥
ते अद्भुत असे त्या उभयताचे आचरण पाहून ब्रह्मरुद्रादि देवादि एकाच परमात्म्याच्या वेंकटेश व वराह (या दोन रूपावर, पुष्पवृष्टि केली.) ॥१५॥
"ज्याप्रमाणे प्राकृत मनुष्य क्रीडा करतो त्याप्रमाणे युगानुसार देशानुसार, कालानुसार, वयानुसार, अवतार घेत परमात्मा क्रीडा करतो." ॥१६॥
याप्रमाणे ब्रह्मादि देवश्रेष्ठ, परमात्म्याची ती विचित्र माया, त्याची क्रीडा पाहून श्रेष्ठ असा रमापति श्रीवेंकटेश याची स्तुति करीत बोलू लागले. ॥१७॥
याप्रमाणे बोलत असणार्या त्या वराह व वेंकटेश या श्रीहरीच्या दोन रूपाचे स्तवन करीत व दर्शन घेऊन सर्व देव आपल्या स्थानी गेले. ॥१८॥
सर्व देवगण निघून गेल्यावर वराहदेव श्रीवेंकटेशास म्हणाला, 'हे श्रीनिवासा वैकुंठाचा त्याग करून या पर्वतावर का आलास? ॥१९॥
हे महाभागा, श्रीनिवासा, ते मला सांग. याप्रमाणे वराहदेवाची आज्ञा झाली असता त्यास श्रीनिवास म्हणाला, 'भृगुमुनीनी लाथ मारल्यामुळे वैकुंठाचा त्याग करून रमादेवी कोल्हापुरास गेली. त्या दुःखाने संतप्त झालेला मी वैकुंठाचा त्याग करून मी येथे आलो. हे धरापते, तुमच्या दक्षिणदिशेला असलेल्या वारुळात सध्या राहात आहे. व तेथे राहत असतानाच चोलराजाच्या गवळ्याने कुर्हाडीने माझ्या डोक्यावर प्रहार केला. ॥२०-२१॥
तीक्ष्णधारेच्या कुर्हाडीने केलेल्या प्रहाराने झालेली जखम फार त्रास देत आहे. हे वराहदेवा, त्या जखमेवर लागणारे औषध आणण्यासाठी दररोज मी बाहेर जातो. ॥२२॥
आज मी माझ्या सुदैवानेच भूपति अशा तुला भेटलो. कारण याठिकाणीच राहावे असा माझा संकल्प आहे. ॥२३॥
म्हणून हे पृथ्वीपते, कलियुग संपेपर्यंत मला राहाण्यासाठी जागा दे. याप्रमाणे श्रीनिवासाने विनंती केली असता वराहरूपी परमात्मा म्हणाला, "जागा विअक्त घेऊन राहा." याप्रमाणे वराहाने सांगितले असता "माझ्या दर्शनास येणार्याने अगोदर तुझे दर्शन घेऊन क्षीराभिषेक करावा."
हेच या जागेचे मूल्य म्हणुन हे करुणानिधे, मी आपणांस हेच द्रव्य देतो त्याचा स्वीकार कर . याचा स्वीकार करुन मला जागा देण्याची कृपा कर.॥ २४-२५-२६-२७ ॥
या प्रमाणें वेंकटेंशाने वराहदेवास सांगितले असंता वराहदेवानें वेंकटेशाच्या पायाने शंभर पावले जागा दिली. ॥२८॥
एकरूपी असणारे पण सध्या दोन रुपे धारण केलेले वेंकटेश व वराह यांनी आपल्या भक्त्तांची भक्ति वाढावी तसेंच अभक्त्ताना मोह उत्पन्न व्हावा यासाठी अशाप्रकारची लीला केली त्याचवेळीं भुवराहवांने स्वैपाक आणि इतर कामे करणारी बकुला नामक दासी श्रीनिवासाच्या भोजनासाठी लागणारे तांदुळ आदि पदार्थ त्या बकुलेच्या द्वारा वराहदेव पाठ्वीत. ती बकुलाहि अत्यंत भक्तीनें श्रीनिवासाच्या सन्निध राहून अन्नपान, औषधे इत्यादीकांच्या द्वारे निदोष श्रीनिवासाची सेवा करू लागली. ॥ २९-३०-३१-३२ -३३॥
याप्रमाणें वेंकटेशाचे चरित्र सूत सांगत असतांना ऋषीनी प्रश्न विचारला, हे सूता वैकुंठाहुन भुलोकात झालेले आगमन, वेंकटेशाची व वराहदेवाची भेट व शेषाचलावर वेंकटेशाचे वास्तव्य इत्यादि चरित्र तू आम्हांस सांगीतलेस आतां सेवा करण्याकरितां बकुला नामक दासी श्रीवराहदेवानें श्रीवेंकटेशास दिली तेव्हां ती स्त्री पूर्वजन्मात कोण होती ? ते तू आम्हांस सांग. ॥३४॥
तो प्रश्न ऐकुन सुत म्हणाला, पूर्वी कृष्णावतारात जी कृष्णमाता यशोदा होती तिनें कृष्णाचे बालचरित्र पाहिले पण आपल्या मुलाचा वैवाहिकविधि पाहिला नव्हता म्हणुन तिनें कृष्णाची प्रार्थना केली, कीं ॥३५॥
हे कृष्णा, माझे मन तुझा विवाहसोहळा पाहाण्याविषयी अतिशय आतुर झाले आहे म्हणून हे यशोदेचा आनंद वाढविणार्या रमानाथ, तूझे विवाहमहोत्सरुपी पवित्र असे चरित्र पाहाण्याची मला इच्छा आहे ती तू पुरी कर. ते ऐकून श्रीकृष्ण म्हणाला दुसर्या अवतारांत हे माते, काही कालानंतर श्रीशैलपर्वतावर मी तुझे मनोरथ पूर्ण करीन ॥३६-३७-३८॥
या प्रमाणे श्रीकृष्णाने यशोदेस वर दिला. त्यानंतर यशोदेच्या देहाचा त्याग करून ती बकुला झाली. ॥३९॥
तिच्या प्रीतिकरता अठ्ठाविसाव्या कलियुगात श्रीकृष्णाने वेंकटेशनामक अवतार घेतला. ॥४०॥
आणि त्या अवतारात यशोदेस आनंद देणारा, क्रीडा करीत, निर्दोष जगतास कारण अशा श्रीहरीने, कलियुगात ज्यांची मने मलिन होऊन पापाचार करण्यात आसक्त झाली आहेत अशांना पापरूपी कर्मापासून रक्षण करण्याकरिता तसेच देत्यांना मोह उत्पन्न व्हावा व देवांना मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी रमानाथ, प्राकृत मनुष्य ज्याप्रमाणे क्रीडा करतो त्याप्रमाणे भक्तांच्या कल्याणाकरिता विशेषतः वैराग्यसंपन्न भक्तांना मुक्ति देण्यासाठी प्राकृतमनुष्याप्रमाणे देह धारण करून क्रीडा करतो. ॥४१-४२-४३॥
याप्रमाणे जगताचे पालन करणारा जगतास मोह उत्पन्न करणार्या सौंदर्याने युक्त असा मानवदेह लीलेने धारण करणारा श्रीहरी, आत्मानंदात रत होऊन क्रीडा करतो. ॥४४॥
अशा तर्हेची लीला देवसमुदायाने अथवा ब्रह्मदेवानेहि केली नाही. तो आपल्या इच्छेप्रमाणे रूप धारण करुन आपल्या इच्छेनेच क्रीडा करतो. ॥४५॥
या कारणास्तव ती यशोदा, बकुला होऊन वैकुंठात वास्तव्य करणार्या श्रीहरीचा विवाहमहोत्सव करील. ॥४६॥
श्रीहरी संतुष्ट झाला असता ज्ञानविज्ञानरूपी संपत्ति ज्यांचेजवळ आहे अशाना अलभ्य असे काय आहे? एखाद्या वेळी भक्त देवाची पूजा करतो? तर काहीवेळा भक्ताची देव पूजा करतो. ॥४७॥
हनुमंताने रामाची सेवा केली तर स्वतः श्रीकृष्णाने अर्जुनाची सेवा (सारथ्य) केली (तात्पर्य) जगास पवित्र करणारी श्रीहरीची आश्चर्यचकित करणारी क्रीडा कोण बरे वर्णन करू शकेल. ? ॥४८॥
नित्यशुद्ध अशा विष्णूला प्रणाम केला असता सर्वांना पुण्य लागेल व प्रणाम न केल्यास पापसंग्रह होईल. ॥४९॥
याकरिता देवांनी, ऋषींनी, तत्त्ववेत्यांनी, पितृगणांनी, राजांनी, ब्राह्मणांनी, मानवांनी, राक्षसांनी, जडांनी, श्रीहरीची पूजा करावी. ॥५०॥
या कलियुगात पापाचार करण्यात रत असल्यामुळे ज्यांचे चित्त कलुषित झाले आहे अशांच्या रक्षणाकरिता प्राकृत मानवाप्रमाणे रमापति श्रीनिवास क्रीडा करतो. ॥५१॥
देवांना आनंद व्हावा, दैत्यांना मोह उत्पन्न होऊन दुःख व्हावे याकरिता जगातला मोह उत्पन्न करणार्या सौंदर्यांनी युक्त असा मानव देह धारण करणारा जगत्पालक असा बालक सामान्य बालकासह क्रीडा करतो. ॥५२॥
अशा तर्हेची क्रीडा देवांनी, अथवा ब्रह्मदेवानेही केली नाही. आपल्या इच्छेने धारण केलेल्या रूपाने शोभणारा श्रीहरि आपल्या इच्छेप्रमाणे क्रीडा करतो. ॥५३॥
त्या क्षेत्राचा महिमा व त्या तीर्थाचे (स्वामी पुष्करणी) वैभव हे दिव्य आहे. कारण त्याठिकाणी साक्षात् रमापति श्रीनिवासाचे वास्तव्य आहे अशा त्या स्थानाचे पुण्यकारक महात्म्य किती आहे हे काय सांगावे. ? ॥५४॥
अनेकजन्मांत मिळविलेल्या पुण्याने क्षेत्राचे दर्शन घडते आणि त्यातहि वेंकटेशाचे दर्शन मुक्तिप्रद असे आहे. ते दर्शन देवसमुदायासहि दुर्लभ आहे तर मानवांची काय कथा? ॥५५॥
याप्रमाणे भविष्योत्तरपुराणातील वेंकटेशमाहात्म्याचा पाचवा अध्याय समाप्त.