अध्याय सहावा
अध्याय सहावा
सूत म्हणतात हे शौनकादि ऋषीहो, एकदा वेंकटेशाने घोडा असावा असा विचार मनात आणला. त्याबरोबर त्याचेसमोर घोडा प्रत्यक्ष येऊन उभा राहिला.
॥१॥
वायु हा घोडा झाला. तत्वाभिमानी देवता लगाम होऊन स्वतः लक्ष्मी तो घोडा घेऊन समोर आली. मग त्या अश्वाची पूजा करून सर्व अलंकाराने शोभणारा वेंकटेश त्या घोड्यावर बसला. ॥२॥
पंधरा हात लांब असलेले शुभ्र वस्त्र नेसून त्यावर कमरपट्टा बांधला होता. त्यावर पाचहात लांबीचे अस्त्र अंगावर पांघरले होते. आरशात पाहून कपाळावर पांढर्या शुभ मृत्तिकेचा तिलक लावून त्यामध्ये मनोहर असा कुंकुम तिलक लावला होता. त्यावेळेस चुना, सुपारी यांनी युक्त असलेला त्याने तांबूल भक्षण केला होता. ॥३-४-५॥
याप्रमाणे आरशात पाहून ललाटभागी शुभ्र मृत्तिका, त्यावर कुंकुमाचा तिलक, कटिमध्यभागावर जरीचे वस्त्र गुंडाळलेले होते. ॥६॥
सुवर्णाचे यज्ञोपवीत, सुवर्णाचा कंठा गळ्यावर असून हातात कडी होती व बाहू पिळदार असून रत्नाची बाहुभूषणे धारण केली होती बोटात आंगठ्या होत्या केशराच्या गंधाने सर्वांग चोपडलेले होते. केसाचा बुचडा बांधून त्यावर तांबडा रुमाल बांधला होता कंठात लांबलचक फुलांच्या माळा रुळत होत्या. ॥७-८॥
सुवर्णामध्ये बसविलेल्या रत्नांनी युक्त अशा पादुकांनी घोड्यासह पाय झाकले गेले होते. धनुष्यबाण धारण करणारा, साक्षात मदनापेक्षाहि मदन दिसणारा तो वेंकटेश्वर अशा तर्हेचे मनोहर रूप धारण करून घोड्यावर बसण्यास सिद्ध झाला. ॥९-१०॥
ज्यांस रत्नाचे अलंकार व खोगीर घातले आहे ज्याच्या कपाळावर सुवर्णाप्रमाणे तिलक आहे, वायु अथवा मन यांच्याप्रमाणे ज्याचा वेग आहे, ज्याचा नीळसर रंग असून ज्याचे पाय मात्र पांढरे आहेत, जो पंधरा हात उंच आहे, देवमण्यादि उत्तम लक्षणांनी जो युक्त आहे अशा घोड्यावर बसून शिकार करण्याकरिता पर्वतावरून खाली उतरला. ॥११-१२॥
त्यावेळी वेंकटेशाने नानाप्रकारची हरिणे, सिंह, वाघ, लांडगे, हत्ती, शरभ, एडके, रेडे वगैरे प्राणी अरण्यात सर्वत्र संचार करीत मारले. ॥१३॥
अशा रीतीने शिकार करीत असता त्या अरण्यात वेंकटेशाने एक मदोन्मत्त हत्ती पाहिला. व त्याची शिकार करण्याकरिता त्याच्या मागोमाग वेंकटेश घोड्यावर बसून धावू लागला. ॥१४॥
श्रीनिवासाच्या भयाने तो दूर जाण्यासाठी पळत असता दीड योजने लांब गेल्यावर तो एकाएकी मागे वळला व आपली सोंड उचलून गर्जना करीत पुढचे दोन्ही पाय टेकवले व दंडवत प्रणाम करून पुनः तोंड वळवून पूर्वीपेक्षा जोरात पळून गेला. त्यावेळी त्या हत्तीच्या पलीकडे एक कन्या श्रीनिवासाच्या दृष्टीस पडली. ॥१५-१६॥
याप्रमाणे सूतांनी सांगितले असता मध्येच शौनकादि ऋषींनी प्रश्न विचारला- हे सूता, ती कन्या कोणत्या कारणास्तव अरण्यात आली होती वगैरे आम्हांस सांगा. ॥१७॥
याप्रमाणे त्या ऋषींनी प्रश्न विचारला असता परम धार्मिक अशा सूताने अति आनंदाने व बक्तीने पुढी कथाभाग सांगण्यास प्रारंभ केला. ॥१८॥
सूत म्हणतो - हे ऋषीहो, तुम्ही सर्वजण त्या कन्येचा पवित्र असा जन्मवृत्तांत सांगतो तो श्रवण करा. द्वापरयुगाच्या शेवटी माहात्म्या पांडवांचे कौरवांशी युद्ध
झाल्यावर कलियुगास प्रारंभ झाल्यानंतर विक्रमादित्यादि अनेक राजे होऊन गेले. ॥१९-२०॥
त्यानंतर एक हजार वर्षे उलटली असता चंद्रवंशामध्ये सुवीर या नावाचा राजा झाला. ॥२१॥
याला सुधर्म या नावाचा पुत्र झाला. यास आकाश व तोंडमान या नावाचे अतिशय यशस्वी व राजे लोकात श्रेष्ठ असे दोन पुत्र झाले. ॥२२॥
हे अतिशय धर्मिष्ठ व श्रीहरीचे एकनिष्ठ भक्त होते. ज्येष्ठ पुत्राचे नाव आकाश व कनिष्ठाचे तोंडमान असे नाव होते. ॥२३॥
आकाश हा तोंड देशाचा अधिपति असून पृथ्वीचे पालन करीत असे, तो आकाश राजा, प्रजाजनांचे पालन करीत असता सर्व प्रजाजन धर्मपरायण होते. स्थावरजंगमात्मक सर्व जगत् सुखी होते. गाई पुष्कळ दूध देत असत. स्त्रिया पतिव्रता होत्या. ॥२४-२५॥
पण सदैव पुत्राची इच्चा करणारा तो राजा, पुत्र नसल्याने दुःखी असे. तो एकदा एकान्तात असता आपल्या गुरूस म्हणाला. ॥२६॥
हे गुरो, हत्ती; घोडे, रथ इत्यादिकांनी युक्त असणार्या राज्याचा उपभोग मी घेतला. नानप्रकारची दाने दिली. विशेषतः तीर्थयात्राहि केल्या. ॥२७॥
पण हे ब्रह्मन, पितृगणांना मुक्तिप्रद असे पुत्रसौख्य मात्र मी उपभोगिले नाही. पूर्वजन्मात मी कोणते पाप केले असेल? अथवा मी कोणाच्या मुलाचा घात केला असेल? ॥२८॥
की त्या पापाने हे ब्राह्मणश्रेष्ठा, आमच्या घरी पुत्रजन्म झाला नाही. मी माझ्या मुलाचे मुखकमळ पाहिले नाह. ॥२९॥
रडत असता उमटलेला मुलाचा शब्द मी माझ्या कानांनी ऐकला नाही. आणि पुत्र नसल्यामुळे पितृगणांना दुर्गति प्राप्त होईल. ॥३०॥
कारण निपुत्रिकास उत्तम गति नाही असे वेदवेत्ते म्हणत आले आहेत. माझ्यासह वर्तमान मुलाने सोन्याच्या ताटात भोजन केले नाही. ॥३१॥
नाना प्रकारचे अलंकार घातलेल्या मुलास मी माझ्या मांडीवर बसवून खेळविले नाही, मी अतिशय पापी दुराचारी असून पुत्रावाचून मी दरिद्री आहे. ॥३२॥
मी माझ्या मुलासाठी प्रयत्नाने अनेक भूषणे तयार केली आहेत. पण त्यांचा उपभोग घेण्यासाठी आपल्या पित्याच्या कल्याणात आसक्त असणारा पुत्र झाला नाही. ॥३३॥
मी माझ्या मुलाकरिता कवच करून ठेवले असून (ते अंगात घालण्याकरिता) हे मुला, इकडे ये अशारीतीने मी त्यांस हाक मारली नाही. पुत्रहीन अशा मला पाहून यमदूत मला ओढतात. ॥३४॥
माझ्या कंठाभोवती पाश आवळून "चल, चल, लवकर यमाच्या नगरीकडे चल" असे म्हणतील तेव्हा निपुत्रिक असा मी त्यांना उलट काय म्हणू? ॥३५-३६॥
संबोधलेले ऐकून कोणता पुरुष धैर्याने त्याचेसमोर उभा राहील? ॥३७॥
ज्याच्यायोगाने वंशाचा दीप नष्ट झाला आहे, जो अतिशय निर्दय आहे, मोठ्या कष्टाने ज्याचे शरीर उत्पन्न झाले आहे, असा मी पापात्मा स्वतःस नरकात नेणारा व्यर्थ जन्मलो आहे. ॥३८॥
पुत्रहीन कुल म्हणजे पाण्यावाचून असलेल्या खोल विहीरीप्रमाणे होय. पतिवाचून असणार्या स्त्रीची लोकसमुदायात निंदा होते. (त्याप्रमाणे पुत्रावाचून असलेल्या कुलाची निंदा होते.) ॥३९॥
हे ब्राह्मणा मी आता काय करू? मी कोणास शरण जाऊ? माझी गति पुढे काय होणार आहे? कोणत्या देवास मी शरण जाऊ की ज्याच्या योगाने हा संसाररूपी समुद्र तरून जाईन? ॥४०॥
मुलगा रडत असताना प्रेमपूर्वक त्याची मी समजूत काढीत असता त्याचे रडे थांबविण्यासाठी "रडू नको बाळ" असे म्हणत त्याची माता जर आली नाही तर रागाने माझ्या पत्नीची निंदा करून "याला दूध पाज नाहीतर मी तुला ताडन करीन." असे मी म्हटले असते. त्याला चेंडूफळी दे. ॥४१-४२॥
हत्तीवर बसून गावातून पुत्रास फिरवून आणा; कारण मी आता सभेस जात आहे. याप्रमाणे म्हणून मी त्याचे चुटक्या वाजवून सांत्वन केले असते. ॥४३॥
मी माझ्या मुलाचा लहानपणी जातकर्म केला नाही. मुलाचा नामकरणविधि केला नाही. त्यास कवच हे अद्भुत असे शिरोभूषण केले आहे. ॥४४॥
रत्ने, वज्रे यांनी युक्त असे उत्तम केशभूषणहि केले आहे. अशा तर्हेच्या अलंकारांनी सुशोभित केलेल्या माझ्या मुलास पाहून अजून आनंद पावलो नाही. ॥४५॥
मांडीवर बसवुन मी त्यास खेळविले नाही. अतिशय प्रीतीने माझ्या मुलाचे वयाच्या पाचव्या वर्षी उपनयन केले नाही. ॥४६॥
आठव्या किंवा दहाव्या वर्षी त्याचा विवाह केला नाही. त्याने मिळविलेल्या द्रव्याने मी माझे उपजीवनही केले नाही. ॥४७॥
मुलाला त्याच्या पत्नीसह राज्यावर अभिषेक करून परंपरे प्रमाणे माझे वनगमन अजून झाले नाही. ॥४८॥
हे महानुभावा, सत्पुत्रहीन व दरिद्री अशा मला कोणती गति प्राप्त होणार आहे बरे? पुण्यवान अशा सुधर्म राजाच्या वंशामध्ये; घट अथवा भिंत याच्याप्रमाणे निरुपयोगी असणारे हे शरीर व्यर्थ जन्मले आहे. ॥४९॥
अनाथ ह्या मानवकुलामध्ये पुत्राचा जन्म होणे हे दुर्लभच होय. मानवाच्या उदरी अतिशय पुण्यानेच पुत्रजन्म होतो. ॥५०॥
अनाथ अशा मानवकुलामध्ये पुत्राचा जन्म होणे हे दुर्लभच होय. मानवाच्या उदरी अतिशय पुण्यानेच पुत्रजन्म होतो. ॥५०॥
आम्ही अतिशय पापी असल्याने धर्मसंतान संज्ञक अशी सत्पुत्रीहि झाली नाही. ॥५१॥
हे वरदा, अच्युता, जगन्नाथा, जगद्गुरो, सुब्रह्मण्या, सुराधीशा, दयासागरा माझ्यावर दया करा. ॥५२॥
हे वेंकटेशा, रमाकांता, वराहवदना, अच्युता, शेषाचलाधिपते, रामकृष्णा मी तुम्हांस नमस्कार करतो. ॥५३॥
जे पुत्रवान आहेत तेच खरे भाग्यवान होत व ज्यांना मुले नाहीत ते दुदैवी होत कारण जे माझ्यासारखे निपुत्रिक लोक संसाररूपी सागर तरून जाण्यास असमर्थ असतात अशा कर्माप्रमाणे सुखदुःख भोगणार्यांची गती काय होणार आहे? ॥५४॥
याप्रमाणे आपल्या गुरूसमोर तो आकाशराजा "मी आता कोणत्या लोकास अथवा कोणत्या भयंकर नरकास जाईन." असे म्हणत शोकग्रस्त होऊन स्तब्ध बसला. ॥५५॥
महाराज, मला पुत्रप्राप्ती होण्यासाठी कोणताही उपाय नाही काय? याप्रमाणे राजचे भाषण ऐकून आकाशराजाचा गुरु म्हणाला. ॥५६॥
हे राजश्रेष्ठा, पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ कर म्हणजे तुला पुत्र होईल. हे गुरुचे भाषण ऐकून राजाने तात्काल यज्ञ करण्याकरिता भूमिशुद्धि करण्यासाथी अपेक्षित यज्ञभूमि नांगरण्यास प्रारंभ केला. ॥५७॥
सुवर्णाच्या नांगरांनी मंत्रघोष करीत भूमि नांगरत असताना जमिनीवर एक कमळ सर्वांनी पाहिले. ते कमळ एक हजार दलांनी युक्त होते. तेव्हा हे काय आहे असे आश्चर्यचकित होऊन राजा म्हणाला. ॥५८॥
त्या विस्तृत अशा कमलाच्या दलात साक्षात लक्ष्मीप्रमाणे सुंदर अशी एक कन्या त्या राजाने पाहिली व भगवंतानेच ठेवलेल्या, फुलाप्रमाणे मनोहर डोळे असलेल्या, दैवाने दिलेल्या त्या कन्येस पाहिल्याबरोबर राजा अतिशय आनंदित झाला ॥५९॥
व सर्वांचा स्वामी अशा नारायणाची माया ओळखणे हे अतिशय अवघड आहे. ॥६०॥
आता ही कन्या कोणास द्यावी? अथवा मीच या मुलीचा स्वीकार करावा? अशा संभ्रमात राजा पडला असता, "राजा ही कन्या तुझीच असून तिचे पालन कर. त्यामुळे तुझी कीर्ती होऊन उत्तम फल मिळेल." ॥६१॥
याप्रमाणे ती आकाशवाणी ऐकून राजा अतिशय आनंदित झाला व ती कन्या ग्रहण करून राजा आपल्या पत्नीस म्हणाला. ॥६२॥
हे भद्रे बुद्धिमते, देवाने दिलेली मंगलमय कन्या पहा. ज्याप्रमाणे आपल्या उदरी असलेल्या मुलीचे तू पालन केले असतेस त्याप्रमाणे या उत्तम मुलीचे पालन कर. ॥६३॥
याप्रमाणे बोलून राजाने ती कन्या आपल्या पत्नीच्या स्वाधीन केली. त्या मुलीची आपणांस प्राप्ती झाली म्हणून राजाने अनेक प्रकारची दाने दिली. त्या कन्येच्या पायगुणाने राजपत्नीहि पुढे गर्भवती झाली. ॥६४॥
आपली पत्नी गर्भवती झालेली पाहून त्याने पाचव्या महिन्यात त्या गर्भास सीमंत नामक संस्कर, अनेक यजुर्वेदी ब्राह्मणसमुदायाकडून यथाशास्त्र करविला. त्यानंतर नऊ महिने पूर्ण झाले. ॥६५-६६॥
नंतर दहावा महिना प्राप्त झाला असता ती राणी एका मुलास प्रसवली. त्यावेळी कन्यामास (भाद्रपद) असून दशमी तिथी, रोहिणीनक्षत्र, शुक्लपक्ष, गुरुवार या दिवशी सायंकाळी प्रसूत झाली. त्यावेळी राजाने 'मुलगा झाला' असे वर्तमान सांगणार्यास सर्व काही दान दिले. ॥६७-६८॥
कोट्यावधि गाई, हजारो घोडे, नव धान्याच्या राशी दान दिल्या. इतकेच नव्हे तर छत्र व चामरे या राजचिन्हाशिवाय सर्व काही दान दिले. ॥६९॥
नंतर राजाने स्नान करून त्या नूतन शिशूचा स्वस्तिवाचनपूर्वक जातकर्म संस्कार केला. ॥७०॥
त्यानंतर बाराव्या दिवशी मुलाचे नाव वसुधान ठेवले. त्यादिवशी अनेक ब्राह्मणांना अन्नदान केले. ॥७१॥
याप्रमाणे सांगितल्यावर ऋषीनी प्रश्न विचारला हे सूता, मुलाचा जन्म, त्याचे नाव ठेवणे वगैरे सर्व आम्ही श्रवण केले. पण अयोनिज अशा कन्येचे नाव काय ठेवले ते सांग. ॥७२॥
तेव्हा सूत म्हणाला- पद्म म्हणजे कमल त्याप्रमाणे तिचा वर्ण असल्याने, कमलापासून उत्पन्न झाल्याने व पद्म म्हणजे लक्ष्मी तिचा अवतार असल्याने त्या प्रसन्नमुख असलेल्या कन्येचे नाव पद्मावती असे ठेवले. ॥७३॥
याप्रमाणे ती पद्माव्ती नामक कन्या व वसुधान नावाचा पुत्र आपल्या राजवाड्यात पूर्णचंद्राप्रमाणे, लक्ष्मी व चंद्र यांच्याप्रमाणे शोभणारे ते दोघेजण वाढू लागलेले पाहून राजास आनंद झाला. ॥७४॥
त्या राजास अगोदर कन्या नंतर मुलगा झालेला पाहून त्या राजाने अनेक जन्मात कोणते बरे पुण्य मिळविले होते? राजा अतिशय आनंदसागरात बुडून जात असे. याप्रमाणे काल जात असता ती कन्या तारुण्यात आली. ॥७५-७६॥
यौवनसंपन्न अशा, डोळे सतेज असलेल्या आपल्या मुलीला पाहून राजा चिंताग्रस्त झाला. व आपल्या मुलीला उत्तम वर कसा मिळेल? याविषयी विचार करू लागला. ॥७७॥
पण योग्य असा वर न दिसल्याने तो चिंताग्रस्त होऊन ही तारुण्यात आलेली कन्या मी कोणास द्यावी या विचारात मग्न झाला. ॥७८॥
राजाने आपला मुलगा मोठा झाला हे पाहून त्याचेहि उपनयन केले. एकदा मैत्रिणीसह ती कमललोचना पद्मावती वसंतऋतुचे आगमन झालेले पाहून फुले आणण्याकरिता भयंकर अशा अरण्यात गेली. ॥७९-८०॥
झाडाखाली आश्रय घेऊन तिने पुष्कळशी फुले गोळा केली. ती फुले गोळा करीत असता नारदमुनि जटा धारण करणार्या एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण करून तेथे आला. ॥८१॥
त्याचे सर्वांग धुळीने माखले असून कापराप्रमाणे पांढुरके झाले होते. अरण्यात त्या ऋषीला आलेला पाहून आश्चर्यचकित झालेल्या पद्मावतीने "हा भयंकर दिसणारा हा कोण असावा? या ठिकाणी का आला आहे? हे त्याला विचारा. तेव्हा मुलीनी त्या वृद्ध ब्राह्मणांस विचारले की, - हे ब्राह्मणा, तू कोण आहेस? तू या ठिकाणी कशाकरिता आला आहेस? ॥८२-८३॥
त्या मुलींचा प्रश्न ऐकून शांतपणे तो ब्राह्मण म्हणाला- हे मुलीनो, मी तुमचा कुलगुरू आहे. ॥८४॥
हे मुली, तू तुझा हात दाखव. मी सर्व लक्षणे सांगतो. तेव्हा लज्जेने ती कन्या म्हणाली, हे ब्राह्मणा, तू काय सांगणार आहेस? ॥८५॥
तेव्हा नारद म्हणाला- हे मुली, तुझ्या पित्याप्रमाणे मी आहे असे समजून शुद्ध मनाने तू आपला हात दाखव. याप्रमाणे नारदाने म्हटले असता संकोच सोडून आपला हात दाखवीत पद्मावती म्हणाली, ॥८६॥
हे बुद्धिमंता, माझ्या हातावर दिसणारी चांगली लक्षणे कोणती आहेत ते तू खरे सांग. याप्रमाणे तिने म्हटल्यानंतर तिचा हात आपल्या हातात घेऊन ब्रह्मदेवाचा पुत्र नारद सांगू लागला. ॥८७॥
हे धर्मज्ञे, तुझा पति त्रैलोक्याधिपति साक्षात् लक्ष्मीपति नारायण होणार आहे. कारण तुझे हात कमलदलाच्या चिन्हाने युक्त आहेत. पायावर स्वस्तिक चिन्ह आहे. ॥८८॥
मुख चंद्राप्रमाणे मनोहर आहे. डोळे कमळाच्या कळीप्रमाणे आहेत. तिळाच्या फुलाच्या आकारासारखे तुझे नाक आहे. ॥८९॥
फुललेल्या फुलाप्रमाणे तुझे कपोल असून तुझ्या भुवया धनुष्याकृति आहेत. तुझे तों हे कर्पूरपात्र असून डाळिंबाच्या बियाप्रमाणे तुझे दात आहेत. ॥९०॥
तांबूस अशा कमळाप्रमाणे तुझा अधर असून तुझी जीभ अति कोमल आहे. तीक्ष्ण तलवारीप्रमाणे तुझी केसाची बांधलेली वेणी दिसते आहे. ॥९१॥
रत्नाच्या पीठाप्रमाणे ललाट भाग दिसतो आहे. कान करंजीप्रमाणे दिसतात. भ्रुकुटी समान असून मदनाप्रमाणे कान्ती आहे. ॥९२॥
सूर्यकिरणाप्रमाणे कंठ असून विड्याचा रस कंठातून आत जाताना दिसतो. ब्रह्मदेवाने दुधाचा स्वाद घेतलेले स्तन हे पुष्ठ व घट्ट आहेत. ॥९३॥
उदर केळीच्या पानाप्रमाणे असून खाली नाभि आहे. कटिभाग सिंहाच्या कमरेप्रमाणे बारीक असून अनाकुल आहे. ॥९४॥
हे रमादेवी, केळीच्या झाडाप्रमाणे तुझ्या मांड्या असून पृष्ठभाग बेदिप्रमाणे आहे. (इतकी उत्तम लक्षणे आहेत त्याअर्थी) तू पूर्व जन्मात कोणते पुण्य केले होतेस? ॥९५॥
हे वरानने, तुझे चालणे हत्तीप्रमाणे आहे. हे सर्व पूर्वी मिळविलेल्या पुण्यानेच प्राप्त होईल. ॥९६॥
याप्रमाणे कमलोद्भव पद्मावतीशी बोलून देवर्षी नारद सर्वासमक्ष अंतर्धान पावला. ॥९७॥
याप्रमाणे कमलेचे स्तवन करून व आपल्या मनाने रमादेवीचे चिंतन व वंदन करून देवर्षी नारद तेथून निघून गेला. ॥९८॥
याप्रमाणे कमलोद्भव अशा महालक्ष्मीचा अवतार अशा पद्मावतीची ब्रह्मदेवाच्या पुत्राने-नारदाने स्तुती केली आणि नंतर नारायणाचे उत्तम असे जे स्थान शेषाचल तिकडे गमन केले. ॥९९॥
याप्रमाणे भविष्योत्तरपुराणातील वेंकटेशमाहात्म्याचा सहावा अध्याय समाप्त.