Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय चवथा

अध्याय चवथा

शतानंदमुनि जनक राजास सांगतो. हे देवा, राजा, याप्रमाणे श्रीनिवासाने दिलेला शाप ऐकून मूर्च्छित पडलेला चोल राजा सावध झाल्यावर म्हणाला- ॥१॥

कोणताहि विचार न करता निरपराधी असलेल्या मला का बरे शाप दिलास? माझ्याकडून कोणता अपराध घडला बरे? मी तुला कोणत्याहि तर्‍हेने दुःख दिले नसता मला का बरे शाप दिलास? का बरे तु हे दुःख दिलेस. ॥२॥

याप्रमाणे राजाने श्रीनिवासाने विचारले असता शाप मूर्छित राजास श्रीनिवास सावकाश म्हणाला ॥३॥

हे राजश्रेष्ठा, मी अतिशय पापी व दुराचारी असा आहे. अतिशयित दुःखाने व अज्ञानाने मी तुला व्यर्थ शाप दिला. ॥४॥

भक्तवात्सल्याच्या दोषामुळे मी अत्यंत दुःखी झाल्याने मी तुला हा शाप दिला. हा म दिलेला शाप खोटा होणार नाही असे वेदवेत्ते म्हणतात. ॥५॥

कलियुग लागेपर्यंत तू दुःखी हो, सत्यसंकल्पदोषामुळे आपण दोहेहि दुःखी आहोत. ॥६॥

भविष्यकालात "आकाश" या नावाचा राजा होणार आहे. तो राजा आपली कन्या पद्मावती मला देणार आहे. ॥७॥

कन्यादानाच्या वेळी तो मला वरदक्षिणा देईल. तसेच रत्न व वज्रे यांनी युक्त असलेला शंभर भाराचा किरीट मला देईल. ॥८॥

तो किरीट मी दर शुक्रवारी सायंकाळी डोक्यावर धारण करीन. किरीट धारण केल्यावर (आता झालेल्या जखमेमुळे) माझे डोळे अश्रूनी भरून येतील. ॥९॥

त्यावेळी सहा घटका तुला सुख होईल.- याप्रमाणे राजाचा व सुखाचा काल तसेच भाविकालांत आपला होणारा अवतार त्याचे कारण सुचविले. ॥१०॥

याप्रमाणे राजास सांगितल्यावर त्या वारूळरूप गुहेतच श्रीनिवास राहू लागला. यानंतर आपली जखम भरून यावी याकरिता वैद्यशास्त्रांत पारंगत असे देवांचे गुरु जे बृहस्पति आचार्य यांचे स्मरण केले. स्मरण करण्याबरोबर बृहस्पति आचार्य तेथे आले असता सर्व हकीकत सांगून या जखमेवर औषध सांगा अशी विनंति केली. ॥११-१२॥

याप्रमाणे विचारले जीवांत श्रेष्ठ असा बृहस्पति म्हणाला. "औदुंबराच्या चिकामध्ये रुईचा कापूस भिजवून त्याची घडी नित्य या जखमेवर ठेवत जा." बृहस्पति आचार्याचे सांगण्याप्रमाणे श्रीनिवासाने तशी रोज औषधाची पट्टी ठेवण्यास प्रारंभ केला. ॥१३-१४॥

याप्रमाणे क्रीडा करीत श्रीहरी त्या पर्वतावर आहे. (वेंकटेश अवतार म्हणजे रामकृष्ण होत असे दाखवितात.) कौसल्या ही अवतारांत वारुळ झाली. दशरथ चिंचेचे झाड झाला. लक्ष्मण पर्वत झाला. अयोध्या वारुळाच्या सभोवतालचा प्रदेश झाला. याप्रमाणे रामावतारातील सर्वांनी अवतार घेतला. ॥१५-१६॥

देवकी वारूळ, चिंचेचे झाड हे वसुदेव बलराम हा पर्वत होय. वारूळाच्या सभोवतालची जागा ही मथुरा होय. ॥१७॥

स्वामि पुष्करणी ही यमुना नदी होय. यादव हे हरिण झाले. गोपिका स्त्रिया या पक्षी झाल्या. ॥१८॥

याप्रमाणे श्रीनिवास वराहदेवाचे स्थान अशा, वेंकटाचलावर श्रीकृष्णरूपाने संचार करीत आहे. अशातर्‍हेचा वेदमय (वेदामध्येहि ज्याचे वर्णन आहे असा) हा पर्वत श्रेष्ठ शेषाचल वैकुंठापेक्षाहि अधिक होय. ॥१९-२०॥

(वैकुंठाचे सादृश्य सांगतात.) सुवर्णमुखरी नदी ही विरजा नदी होय. वेंकटगिरि म्हणजे वैकुंठ होय. रमापति हे श्रीनिवास होत. ॥२१॥

मुक्त झालेले ब्रह्मदेव पक्षिगण होत. मुक्त झालेले रुद्रगण मृगोत्तम होत. सन्त्कुमारादि ब्राह्मणश्रेष्ठ हे येथील वानर होत. ॥२२॥

हा मानव देह प्राप्त झाल्यावर जो धर्मिष्ठ मनुष्य या वेंकटाचलावर जाण्याची इच्छा करतो त्यास सर्व काही (तीर्थयात्रा, दान वगैरे) केल्याप्रमाणे सर्व देवाकडून नमस्कार केला गेलेला रमानाथ संतुष्ट होतो. ॥२३॥

श्रीवेंकटाचलाचे हे अद्‌भूत असे माहात्म्य, ब्रह्मरुद्रादि देव आपआपल्या योग्यतेप्रमाणे जाणतात. मग अत्यल्प ज्ञानी असलेले, संसारात आसक्त असलेले, अद्‌भुत माहात्म्य असलेले हे विष्णुचा क्षेत्राचे माहात्म्य कसे बरे जाणू शकतील? ॥२४॥

याप्रमाणे भविष्योत्तर पुराणान्तर्गत वेंकटेशमाहात्म्याचा चवथा अध्याय समाप्त.