Get it on Google Play
Download on the App Store

अध्याय आठवा

अध्याय आठवा

सूत म्हणाला - हे शौनकादि मुनीहो, श्रीनिवास आपल्या पलंगावर येऊन झोपला त्यावेळेस त्याची सेवा करण्याकरिता बकुलादेवीहि त्याठिकाणी आली. ॥१॥

सूप, अपूप, रस इत्यादि पदार्थांनी युक्त असे सहा प्रकारचे अन्न घेऊन हरीवरील प्रीतीने त्याठिकाणी आली. ॥२॥

वारुळातील स्थानाचा आश्रय घेऊन झोपलेल्या, दीर्घ निश्वास सोडणार्‍या व हुंदके एणार्‍या आणि काहीहि न बोलणार्‍या श्रीनिवासाला पाहून बकुला म्हणाली, गोविंदा, हे पुरुषोत्तमा, उठ, उठ, तू का झोपला आहेस. ॥३-४॥

तू कधीहि दिवसा झोपत नाहीस किंवा तू कधी रडलेलाहि नाहीस. कोणत्यातरी कारणामुळे एखाद्या पीडलेल्या मानवाप्रमाणे तू दिसतो आहेस? ॥५॥

तुझ्या मनात काय आहे ते मला खरे खरे सांग. आज मी खीर केली आहे तरी ती खीर खाण्याकरिता उठ. याप्रमाणे बकुलेचे बोलणे ऐकून श्रीनिवास काहीच बोलला नाही. तेव्हा श्रीनिवासाकडे पाहून बकुला पुनः म्हणाली ॥६-७॥

हे कृष्णा, तू अरण्यात काय बरे पाहिलेस? कशाकरिता इतके भयंकर दुःख करीत आहेस? वास्तविक तू दुःखी नसतानाहि आपण दुःखी आहोत असे का दाखवितोस? ॥८॥

तुझ्या मनात असलेले सांग, मला आज्ञा दे. माझेपुढे तू संकोच करू नकोस. बलराम, देवकी, वसुदेव यांची शपथ आहे. ॥९॥

हे भूतभावना, तुला भोजन न केलेले पाहून मला फार वाईट वाटते. सर्वांचे दुःख हरण करणार्‍या हे पुण्यमूर्ते मी तुला नमस्कार करते. ॥१०॥

हे देवश्रेष्ठा, या भूलोकात मानवकन्या अथवा गंधर्वकन्या पाहिलीस काय? कोणत्या मुलीच्या संगतिची अपेक्षा धारण केल्याने हे चित्तवैकल्य निर्माण झाले आहे? ॥११॥

हे जगद्‌गुरो, अशी कोणतीपुण्यवान कन्या आहे की, जी भक्ताच्या स्वाधीन असणार्‍या श्रीहरीस कामार्त होऊन मोह उत्पन्न करील? अशी मी जाणत नाही. ॥१२॥

हे गोविंदा, तुझे कार्य काय ते सांग. मी क्षणमात्रांत करीन. क्रूर अशा मृगाला अथवा चोराला पाहून तुला भय वाटू लागले काय ॥१३॥

हे रमापते, भूतप्रेतपिशाच यांना पाहून भय वाटले तर मी मंत्र, तंत्र, यंत्रसमुदाय, मुळ्या, औषध इत्यादिकांच्या द्वारे यथाशास्त्र उपाय करून सर्वापासून मी तुम्हास सोडविते. याप्रमाणे आश्वासन देऊनहि श्रीनिवास गप्प बसलेले पाहून बकुलेने आणलेले भोजनाचे सर्व पदार्थ त्याठिकाणी ठेवले. व ती श्रीनिवासाजवळ येऊन झोपलेल्या श्रीनिवासाचे पाय चुरु लागली. ॥१४-१५-१६॥

अत्यंत भक्तीने सांत्वन करणार्‍या तिने मलूल झालेल्या देहावरून पायापासून तो मस्तकापर्यंत आपला हात फिरवीत नाना तर्‍हेने सांत्वन करूनहि श्रीनिवास काहीहि बोलेनात. तेव्हा बकुला खिन्नपणाने श्रीनिवासास म्हणाली. ॥१७-१८॥

आपल्या हाताने ठिकठिकाणी फाटलेले वस्त्र बाजूला करून म्हणाली- हे देवा, जगन्नाथा, पुराणपुरुषोत्तमा, मी तुझ्या मनातील सर्व गोष्टी पूर्ण करीन याविषयी संशय नकोच. तुझ्या मनात जे आहे ते मला सांग, मी निश्चयाने ते पूर्ण करते. तू भय किंवा संकोच बिल्कुल बाळगू नकोस. ॥१९-२०॥

मी, माझ्यात जोपर्यंत जितकी माझी शक्ति असेल त्या शक्तीच्या योगाने विलंब न करता पूर्ण करीन. त्याप्रमाणे तिचे भाषण ऐकून दीर्घ निःश्वास सोडीत अतिशय दुःखाने श्रीनिवास आपले मनोगत हलके हलके सांगू लागला. ॥२१॥

हे बकुले, मला गंधर्वकन्या, ऋषिकन्या, अथवा राक्षसकन्या, मोहित करू शकत नाहीत. भूतप्रेतपिशाच हेहि मला भयावह नाहीत. ॥२२॥

सिंह व अरण्यातील हिंस्त्र हे अथवा चोर हे माझ्याविषयी क्रूर कधीच नसतात. कारण नुसते माझे नामस्मरण केले असता ते दाही दिशांना पळून जातात. ॥२३॥

त्यामुळे या सर्वांपासून मृत्यूचाहि मृत्यु असणार्‍या मला हे अनघे, मुळीच भय नाही. अरण्यात गेलो असता तेथे एक पद्मावती या नावाची एक कन्या मी पाहिली. ॥२४॥

तिला पाहून माझे मन काममोहाच्या स्वाधीन झाले आहे. ती अतिशय सुंदर असून तिचे केस कुरळे आहेत. मुख पूर्णचंद्रासमान असून शामवर्णाची व नीलमाणिक्य इत्यादिकांनी शोभिवंत दिसते. साक्षात्‌ रमादेवीप्रमाणेच ती असून तिच्याशी माझा विवाह जुळव. ॥२५-२६॥

जन्मजन्मांतरी केलेल्या पुण्यानेच अशी स्त्री मिळेल. हे सुलोचने; तिच्या दर्शनाने माझे पुण्य फळास आले आहे. ॥२७॥

मानवदेह प्राप्त झाल्यावर खाणेपिणे सोडलेल्या जडमतीशिवाय कोण बरे अशा कन्येचा त्याग करील? ॥२८॥

कार्य करू न शकणार्‍या अनित्य देहाशी तरी मला काय करायचे आहे? याकरिता त्या आकाशराजाच्या कन्येबरोबर आपले संबंध जुळव. ॥२९॥

यद्यपि तिने धोंड्याचा मारा करून माझा घोडा मारला असला तरी मी तिच्याशिवाय जगू शकणार नाही हे सत्य तू जाण. माझे जीवन वेंकटाचलावर तिच्यासाठीच आहे. कारण त्या पद्मावतीकरिताच माझा अवतार झाला आहे. ॥३०-३१॥

मी पूर्वी काय केले कोणास ठाऊक? कारण माझा पुत्र ब्रह्मदेवच माझ्याशी वैर करतो आहे. दृष्टिहीन (ह्या कन्येचा विवाह कोणाशी व्हावा हे न ठरविता) अशा ब्रह्मदेवाने ती कन्या उत्पन्न केली आहे. ॥३२॥

ब्रह्मदेवाने भयंकर असे माझे पाप कोणते पाहिले आहे? ज्या पापामुळे, ब्रह्मदेवाने त्या कन्येची विवाहगाठ माझ्याशी मारली नाही याकरिता हे बकुले, माझ्यापुरती तूच ब्रह्मदेव हो व मला साहाय्य कर म्हणजे अनायासाने माझे कार्य होईल असे मला वाटते. ॥३३-३४॥

हे बाले, जर तू माझे कार्य केले नाहीस तर मात्र माझा मृत्यु निश्चित होईल असे समज. मृत्यु प्राप्त झाला असता जगविण्यासाठी जे पुरुषश्रेष्ठ प्रयत्न करतात ते मानव विमानात बसून पुण्यमार्गाने स्वर्गास जातात. याप्रमाणे धर्म व अर्थ हे प्राप्त होण्याकरिता या धर्ममार्गाचा आश्रय कर. ॥३५-३६॥

मी फार काय सांगू. हिच्याशी माझा विवाह होईल असे कर. तूच आईबाप, बंधु, मामा आहेस. ॥३७॥

प्रल्हाद, अक्रूर, ध्रुव, गजेन्द्र, उद्धव, अर्जुन, बलि आदि भक्त तूच आहेस. ॥३८॥

अजामिल, द्रौपदी, बिभीषण हे सर्व तूच आहेस. याकरिता तूच हे कार्य कर. तुला पाहून मला नेहमीच आनंद होतो. ॥३९-४०॥

माझे दुःख नाहीसे करण्याकरिताच परमेश्वराने तुला निर्माण केले आहे. हजार कोटी गाई दान दिल्याचे पुण्य, दहा हजार घोडे दिल्याचे पुण्य अथवा सुवर्ण, तिल आदी दानाचे पुण्य हे एका मांगल्यबंधनाच्या पुण्यासमान होते. प्रत्यक्ष त्या कन्येला तू पाहिलेस की तुलासुद्धा आनंद होईल यात मला संशय वाटत नाही- याप्रमाणे श्रीनिवासाने सांगितल्यावर बकुला म्हणाली. ॥४१-४३॥

जी कन्या तू पाहिलीस ती कुठे असते? हे दयासागरा, तिकडे जाण्याचा मार्ग मला सांग. मी स्वतः तिकडे जाऊन जाईन. ॥४४॥

ती पूर्व कोण होती? आता ती पुनः का जन्मली. वगैरे सर्व खरा वृत्तांत तू मला सांग.

याप्रमाणे ब्रह्मरुद्रादिक ज्याच्या चरणी नम्र झाले आहेत अशा श्रीनिवासाने बकुलेची विनंति ऐकून श्रीनिवास धरिणीची मैत्रिण बकुला हिला म्हणाला. ॥४५॥

हे बकुले, या पद्मावतीचा शुभ असा पूर्वीचा जन्मवृत्तांत सांगतो ऐक. त्रेतायुगात मी रामरूपाने अवतार धारण केला. ॥४६॥

त्यावेळी आईबापाच्या म्हणण्याप्रमाणे मी माझा बंधु लक्ष्मण व माझी पत्नी सीता यांचेसह दंडकारण्यात आलो. ॥४७॥

पूर्वी लोकांना त्रासदायक असा रावण या नावाचा एक राक्षस होता. त्याने लोकपालक रामाची पत्नी हरण करून तो तिच्यासह लंकेकडे जाण्यास निघाला. त्याचवेळी अगोदर सीतेच्या सांगण्यावरून लक्ष्मण अरण्यात गेलेल्या रामाचा शोध करण्याकरिता गेला. ॥४८॥

त्यावेळी सीता एकटीच आहे हे पाहून रावण सीतेस विमानात बसवून निघाला असता 'हे रामा, हे राघवा, हे लक्ष्मणा.' अशा नावाने ओरडू लागली. ॥४९॥

तिच्या त्या ओरडण्याने त्या अरण्यात राहणारे वनचर प्राणी त्यावेळी ओरडू लागले. त्या सर्वांचे ओरडणे ऐकून अग्निसुद्धा पाताल लोकातून पृथ्वीतलावर आला. ॥५०॥

जानकीस बलात्काराने ओढत असलेल्या व पराभव करण्यास अशक्य अशा रावणाला पातालातून वर आलेल्या अग्नीने नानातर्‍हेने उपदेश करीत म्हटले, ॥५१-५२॥

हे नरेश्वरा, ही जानकी नसून ही एक ब्राह्मणस्त्री आहे. तुझ्या भयाने दक्ष अशा रामाने माझ्याजवळ जानकीस ठेवले आहे. ॥५३॥

आणि म्हणूनच लक्ष्मणासह राम अरण्यात संचार करीत असतो. हे उदार रावणा, तू माझा परमशिष्य असून मला प्रिय आहेस. उगीचच ब्राह्मणस्त्रीचे ठिकाणी सीतेविषयक खोटा भ्रम तुला होऊ देऊ नकोस. याप्रमाणे कपटाने रावणास फसवून सीतेस आपल्या घरी पातालात आणले व तिची पूजा करीत आपली पत्नी स्वाहा हिचे जवळ सीतेला ठेवून अग्नीने मायेने वेदवती नामक सीतेच्या प्रतिकृतीस सीता म्हणून रावणास समाधान वाटावे म्हणून दाखवविले आणि म्हटले की, हे रावणा ही सीता घेऊन लवकर निघून जा. रावणाची विशेष अशी भक्ति अग्नीवर असल्याने अग्नीच्या म्हणण्याप्रमाणे सीतेचे मनाने स्मरण करीत, मोहाने उन्मत्त झालेल्या रावणाने हीच सीता आहे असे मानले. ॥५४-५५-५६-५७॥

नंतर विष्णूने आविष्ट अशा सीताकृतीस क्रूर अशा रावणाने लंकेस नेऊन अशोक वाटिकेतील शिंशपानामक वृक्षाखाली ठेवले. ॥५८॥

त्यावेळी मृत्यूने प्रतारणा केला गेलेला रावण स्वतःस कृतकृत्य समजू लागला. पुढे रामाने लंकेस जाऊन त्या दुष्ट रावणाला त्याचा परिवारासह मारून सीतेस परत मिळविले व तो अयोध्येस आला. त्यावेळी लंकेमध्येच सीतेवर लोकापवाद येऊ नये म्हणून रामाने सीतेकडून अग्निप्रवेश करविला. पण अग्नीतून दोन सीता बाहेर आल्या हे पाहून सीतेस राम म्हणाला. ॥५९-६०॥

ही तुझ्या रूपाप्रमाणे तुझ्यासारखी दिसणारी ही स्त्री कोण आहे? या तुझ्या बिंबासमान असणारी ही स्त्री कोण आहे हे मी जानत नाही. ॥६१॥

याप्रमाणे रामाने विचरले असता जानकी म्हणाली- निष्कारणच दयेने युक्थोऊन लंकेत माझे दुःख तिने भोगले आहे. ॥६२॥

हिचे नव वेदवती असे असून अग्निभार्या स्वाहेजवळ असते. हे रामा, हिचा तुम्ही विवाहविधिपूर्वक स्वीकार करा. ॥६३॥

याप्रमाणे सीतेचे भाषण ऐकून श्रीराम म्हणाल- या अवतारात माझे एकपत्नीव्रत आहे. हे तुला माहीत आहे. ॥६४॥

द्वापारयुगामध्ये मी तुमचा स्वीकार करीन असे पुष्कळांना वर दिला आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे अठ्ठाविसाव्या कलियुगात मी हिचा स्वीकार करीन. ॥६५॥

तोपर्यंत ही ब्रह्मदेवाकडून सत्कार केली गेलेली ब्रह्मलोकात राहू दे. याप्रमाणे रामाने सांगितल्यावर ती वेदवती ब्रह्मलोकास गेली. ॥६६॥

तीच वेदवती सांप्रत पद्मावती या नावाने अवतरली आहे. याप्रमाणे पद्मावतीची पुरातन हकीकत मी तुला सांगितली आहे. माझे बोलणे कधीहि खोटे होत नाही असे वेदवेत्ते म्हणतात. ॥६७॥

याप्रमाणे तिचा पूर्वजन्म वृत्तांत ऐकून बकुला अतिशय आनंदित होऊन कुतूहलाने युक्त होत श्रीनिवासास म्हणाली. ॥६८॥

हे श्रीनिवासा, मी सर्व धर्म, अर्थ यामध्ये प्रवीण असणार्‍या सभासदांनी युक्त अशा राजश्रेष्ठ आकाशराजाच्या, देवानीहि स्तविलेल्या व रमादेवीस लपविणार्‍या नगरीस जाते. याप्रमाणे बकुलेने सांगितल्यावर स्वतःसाठी बकुलेस श्रीनिवासाने पाठविले. ॥६९॥

श्रीनिवासाने आपल्या मायेने निर्माण केलेले घोडे घेऊन आकाशराजाच्या नगरीकडे जाण्याचा मार्ग विचारण्यासाठी बकुला श्रीनिवासास म्हणाली. ॥७०॥

हे रमानाथा, राजाकडे जाण्याचा मार्ग कोणता? हे मला सांग- तेव्हा श्रीनिवास म्हणाला- याच पर्वताच्या शिखरावरून या मार्गाने खाली उतरल्यावर पर्वताच्या पायथ्याजवळ कपिलपूजित महादेव आहे. त्या ठिकाणी कपिलेश्वराच्या जवळ एक तीर्थश्रेष्ठ आहे. ॥७१-७२॥

त्या श्रेष्ठ तीर्थात माझ्यासाठी यथाविधि स्नान करून कपिलेश्वराजवळ अव्यय असा वर माग. ॥७३॥

"हे दयासागरा, श्रीनिवास तुला नमस्कार करतो. हे शिवशंकरा देवा, तुला नमस्कार असो. माझे तू कल्याण कर. त्यानंतर शुक्राजवळ येऊन त्यालाहि साष्टांग नमस्कार करावयाचा. व त्याची प्रार्थना करावयाची. सदैव कल्याणाची इच्छा करणार्‍या बालक श्रीनिवासाने मला पाठविले आहे. त्याची इष्ट कामना सिद्ध कर. ॥७४-७५॥

याप्रमाणे शुक्राचार्यांची प्रार्थना करून पद्मसरोवराकडे जा. त्या तीरावर बलराम व कृष्ण हे आहेत. त्या दोघांना भक्तिभावाने नमस्कार करून पद्मसरोवरात उत्पन्न झालेल्या कमलानी माझ्याकरिता त्यांची पूजा कर, हे दोघे माझ्या बंधूसमान आहेत. ॥७७॥

मग पुढे सुवर्णमुखरी नदी लागेल. ती नदी ओलांडून पुढे जा. मग पुढे राजाची नगरी लागेल तेथे गेल्यावर वास्तव्य असणार्‍या कन्येसाठी तुला योग्य वाटेल त्याप्रमाणे तू कर. ॥७८॥

याप्रमाणे श्रीनिवासाने आज्ञा दिली असता त्याप्रमाणे बकुलेने केले. घोड्यावर बसून सुवर्णमुखरी नदी ओलांडून अगस्त्याश्रमास बकुला आली. त्याठिकाणी पद्मावतीच्या काही मैत्रिणींना बकुलेने पाहिले. त्या मुली महादेवाच्या देवालयात महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या होत्या. ॥८१॥

त्याठिकाणी त्या चांगल्या मुलींना पाहून "तुम्ही कोण आहात" असे बकुलेने त्या मुलींना विचारले असता त्या मुलींनी खरे खरे काय ते सांगितले. ॥८२॥

त्या मुली म्हणाल्या- आम्ही आकाशराजाच्या जवळ राहणार्‍या आहोत. काल कोण्या एका घोड्यावर बसून आलेल्या, मदनाप्रमाणे सुंदर असा किरातवेश धारण करून पद्मावतीजवळ आलेल्या अशा पुरुषाला आम्ही सर्वांनी पाहिला. ॥८३-८४॥

त्याला पाहून पद्मावती भ्याली व त्यामुळे आलेल्या ज्वराने ती मूर्छित झाली आहे. त्या तापाच्या शांतिकरता आम्ही राजाच्या आज्ञेने आलो आहोते. ॥८५॥

अगस्त्येश्वराला अभिषेक करण्याकरिता आम्ही आज येथे आलेल्या आहोत. इतक्यात कन्यारूप अशा तुला आम्ही पाहत आहोत. याप्रमाणे त्या मुलींनी संगितलेली हकीकत ऐकून बकुला म्हणाली. ॥८६॥

हा किरात वेष धारण करणारा कोण? तुम्हांस कोठे भेटला. वगैरे सर्व हकीकत हे मुलींनो, मला सांगा. ॥८७॥

तेव्हा त्या मुली म्हणाल्या- पद्मावतीसह आम्ही फुले गोळा करण्याकरिता अरण्यात जाऊन फुले गोळा करण्यास प्रारंभ केला असता. ॥८८॥

त्याठिकाणी एका विचित्र घोड्यावर बसलेला पुरुष आम्हाला भेटला. त्याने आमच्याबरोबर अर्वाच्य असे भाषण केले. ते ऐकून आमची राजकन्या रागाने त्यांच्याशी बोलली. ॥८९॥

त्यावेळी त्या उभयतांचा तंटा झाला. त्या कलहात त्याचा घोडा दगडाचा वर्षाव झाल्याने मृत झाला. ॥९०॥

त्या पुरुषाने, मेलेल्या घोड्याला तेथेच टाकून उत्तर दिशेस गमन केले. तो पुरुष निघून गेल्यावर पद्मावती मूर्छित होऊन जमिनीवर पडली. ॥९१॥

नंतर आम्ही राजकन्येला वाहनात बसवून सर्व जणी राजधानीस आलो. तिला वाहनातून आणलेले पाहून राजा चिंताग्रस्त होऊन असहाय्यतेने रडू लागला. ॥९२॥

तेव्हा राजाने आपल्या कन्येला मांडीवर घेतले असता, तिचे तोंड निस्तेज झाले असून ती बोलत नाही हे पाहून 'माझ्या मुलीला काय बरे झाले असावे? आमचा नाश करणारी ही भीती माझ्या मुलीस कशी बरे प्राप्त झाली? ॥९३॥

त्या भीतीचा नाश कसा करावा हे फक्त गुरुच जाणतात म्हणून आपल्या मुलाकरवी राजाने गुरुजींना बोलाविले. राजपुत्राने सांगितलेली पद्मावतीच्या तापाची ही हकीकत ऐकून गुरु पृथ्वीवरील राजाच्या राजवाड्यात लगेच आले. ॥९४॥

प्राण आल्याप्रमाणे गुरु आलेले पाहून आपले पुण्य परिपक्व दशेस आले असे राजास वाटून त्याने गुरुजीना रत्नमय आसनावर बसवून. पाद्य, अर्ध्य, मधुपर्क, भोजन इत्यादि साधनांनी त्यांचे स्वागत केले. ॥९५॥

आतिथ्य केल्यावर आकाशराजाने आपल्या श्रेष्ठ गुरुना आपल्या कन्येची हकीकत सांगितली. राजाने सांगितलेली हकीकत ऐकून कन्येला शांत वाटावे यासाठी गुरु राजास म्हणाला. ॥९६॥

बृहस्पति गुरु म्हणाला - तुझ्या कन्येवर आलेल्या संकटाचे कारण मी सांगतो ते हे राजा, तू ऐक. फुले गोळा करण्याकरिता अरण्यात तुझी कन्या गेली असता एका पुरुषाला पाहून ती भ्यालेली आहे. त्या भयाची शांति व्हावी याकरिता "अगस्त्येश्वर महादेवास लघुरुद्र पद्धतीने अभिषेक कर" ॥९७॥

याप्रमाणे गुरुने सांगितले असता सर्व अभिषेकविधि पूर्ण करण्याविषयी राजाने आम्हास आज्ञा दिली. ॥९८॥

मग आम्ही अभिषेकाचे सर्व साहित्य गोळा करून ब्राह्मणासह, तापाने त्रस्त होऊन राजवाड्यात झोपलेल्या आमच्या राजकन्येचा ताप उतरावा म्हणून हे स्त्रिये, बृहस्पति गुरुजींच्या सांगण्यावरून अगस्त्येश्वरास अभिषेक करण्याकरिता या देवालयात आलो आहोत. ॥९९-१००॥

याप्रमाणे त्या मुलींचे भाषण ऐकून बकुलेस अतिशय आनंद होऊन ती स्वतःशीच म्हणाली. ॥१०१॥

अहो पुराणपुरुषाचे माहात्म्य मी जाणत नाही. कारण त्या मुकुंदाला-कृष्णास माझा मुलगा असे मानून (त्याच्या विवाहासाठी) पुनः मला हे शरीर प्राप्त झाले आहे. ॥१०२॥

त्यावेळी त्या कन्या बकुलेस म्हणाल्या- हे बाले, तू कुणीकडे निघाली आहेस? कशाकरिता तू येथे आली आहेस? हे वरांगी, तुला काय पाहिजे ते तू सांग. ॥३॥

तेव्हां बकुला म्हणाली. मी काय सांगते तें तुम्ही निःशंकपणें ऐका. सध्यां मी वेंकटेशाची दासी आहे.॥४॥

राज भार्या धरणीजवळ माझे काम आहे. परदेशी लोकांना नारायणपुरात प्रवेश करणे अशक्य आहे. ॥५॥

म्हणून तुमच्या संगतीनें अंतःपुरांत मी प्रवेश करीन . याप्रमाणें म्हणून त्या मुलीसह बकुला राजवाड्यात आली. ॥६॥

याप्रमाणे श्रीनिवासाचे कार्य करण्याकरितां बकुला जरी आकाशराजाच्या नगरीस आली तरीहि श्रीनिवासांस तिच्या हातून आपला कार्यभाग होईल असां विश्वास वाटेना. एकच मुलगा असणें म्हणजे मुलगा नसल्याप्रमाणें होय. एक डोळा असणें तो नसल्याप्रमाणें समजावा त्याप्रमाणें स्त्रीच्याकडून केले जाणारे काम तेहि फलप्रद होत नाहीं. याप्रमाणें विचार करून मायावी, आपल्या इच्छेप्रमाणें रूप धारण करणार्‍या श्रीनिवासाने पुलिंदनामकजातीच्या स्त्रीचे रूप घेऊन त्याप्रमाणें वेष, भूषणें इत्यादिक धारण केली. ॥७-८-९-॥

श्रीनिवासाने एक जुने वस्त्र परीधान करुन अनेक छिद्रे असलेली चोळी घातली. ब्रह्मदेवाला मुलाचे रूप देऊन महादेवास हातांत धरणार्‍या काठीचे रूप दिले. ब्रह्मंण्डाला टोपली केली होती. ॥११०॥

एकशे पाचं वर्षे वयाच्या स्त्रीचे रूप घेऊन केस मोकळे सोडलेले, गुंजा व काचेच्या मण्याचे अलंकार आणि शंखाची एक गळ्यांत माळ, डोक्यावर नवधान्यांनीं भरलेले एक वेळूचे टोपले असा वेष घेतला. जिचे पोट लोंबकळते असून कानाच्या पाळ्या जिच्या लोंबत आहेत, जिचे स्तन लिबलिबीत झाले आहेत, जिच्या तोंडात दात नाहीत व जिचे तोंड सुकलेले आहे, अशी ती धर्मदेवता, तिने नाभीपासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाला सात महिन्याच्या मुलाचे रूप दिले. ते मुलहि एकसारखे रडणारे, तोंड सुकलेले, हातापायाच्या काड्या झालेले, लांबलचक हात असलेले असे होते. त्यास धर्मदेवतेने एका फाटक्या वस्त्रा मध्ये गुंडाळून पाठीवर बांधले होते. आपल्या डोक्यावर वेळूची टोपली व हातात काठी घेऊन नाचत नारद, ब्रह्मदेव इत्यादिकांनी वंदन केली गेलेली ती धर्मदेवता नारायणपुरास आली. ॥११-१२-१३-१४-१५॥

नारायणपुरात आल्याबरोबर "पति, पुत्र, बंधू असे मी देते" असे म्हणत ओरडू लागली. याप्रमाणे तिची घोषणा ऐकून गावातील स्त्रियांनी राजभार्या धरणीस म्हटले. ॥१६॥

त्या स्त्रिया म्हणाल्या- बदरिकाश्रमापासून एक धर्मदेवी आलेली आहे. ती वृद्ध असून मितभाषी असल्याप्रमाणे दिसते. ॥१७॥

तुमच्या मनातील सर्व मी सांगते असे ती पुनः पुनः म्हणत असल्याने हे महाभागे, (पद्मावतीसाठी) त्या विचार्‍या धर्मदेवतेला बोलाव, ॥१८॥

याप्रमाणे गावातील स्त्रियांचे बोलणे ऐकून आपल्या सुदैवानेच ती आली आहे असे समजून धरणीने आपल्या सखीसमुदायाला त्या धर्मदेवतेस आदरपूर्वक बोलावण्यास सांगितले ॥१८-१९॥

धरणी देवीने त्या धर्मदेवतेला बोलावण्यास सांगितले असता त्या ग्रामवासी स्त्रिया, त्या धर्मदेवतेजवळ येऊन "हे मंगलदायके देवी तू राजभार्येकडे लवकर चल." असे म्हणाल्या. ॥१२०॥

त्या स्त्रियांचे बोलणे ऐकून ती मनस्विनी धर्मदेवता सावकाश म्हणाली- मी स्वतः दरिद्री आहे. तर ती बाला धरणी भाग्यवान आहे. माझ्यासारखीस तिने बोलावणे हे चेष्टेकरिता, हसण्यासाठी असते. मला पाहून ती हसेल. हे माझे वस्त्र, मूल, माझे अलंकार, नवधान्यांनी भरलेले हे टोपले, गुंजामणि आदीनी सजविलेले माझे शरीर, वखवखलेले अन्नहीन मूल व मी हे सर्व हसण्यासारखेच आहे. ॥२१॥

म्हणून मी राजमंदिरात येत नाही. माझे तेथे काय काम आहे? - याप्रमाणे धर्मदेवीचे भाषण ऐकून त्या स्त्रिया राजभार्येकडे गेल्या. ॥

व धर्मदेवीने जे म्हटले होते सर्व सांगितले. तेव्हा धरणी स्वतःच जाऊन धर्मदेवतेस म्हणाली, हे भद्रे माझे कल्याण कर. हे महाभाग्यवंते तू साक्षात् धर्मदेवता आहेस. तू केवळ आमच्या सुदैवानेच आली आहेस. याप्रमाणे राजभार्येने म्हटले असता ती धर्मदेवता, खरेपणाने राजभार्येस म्हणाली. हे राजभार्ये, मी जे काही सांगेन ते जर खोटे ठरले तर माझे दोन्ही हात तोडून गावाबाहेर घालवून दे. खोटे भाषण केले तर हात तोडणे हे निष्ठूर नव्हे. ॥२२-२७॥

हे राजवल्लभे, परमपूज्य नरनरायण हे माझे पति आहेत. हे मूल त्यांचा पुत्र असून याला प्रजापति असे म्हणतात. ॥२८॥

पतीने आज्ञा केल्यामुळे मी लगबगीने तुझ्या घराकडे आलेली नसून वर्तमान, भूत, भविष्य या कालात घडलेल्या व घडणार्‍या गोष्टी हे जगदीश्वरी, मी सांगते. ॥२९॥

याप्रमाणे धर्मदेवीने सांगितले असता त्या पतिव्रता राजपत्नी धरणीने तिचे समाधान केले व राजवाड्यात धर्मदेवी आल्यानंतर तिला रत्नासनावर बसवून शांतपणे व आनंदाने हलके हलके बोलू लागली. ते कल्याणि, तू स्नान करून कंचुकीसह शुभ्रवस्त्र परिधान कर. परमात्म्यास प्रिय अशा गुरु व देवता यांना नमस्कार कर. याप्रमाणे धर्मदेवीने सांगितल्याप्रमाणे सर्व काही धरणीने केले. ॥१३०-३३॥

नंतर धर्मदेवतेसमोर पश्चिमाभिमुख बसून धरणी म्हणाली- यानंतर मी काय करावे. ते तू मला सांग त्याप्रमाणे मी करते. ॥३४॥

तेव्हा ती धर्मदेवता पुलिंद स्त्री म्हणालि- माझ्या पूर्वीच्या देवतांना उद्देशून मोती व तांद्ळ यांनी भरून सुवर्ण सुपाचे वाण दे. ॥३५॥

तेव्हा भक्तिपूर्वक सुवर्णाच्या सुपात वायन तिच्यासमोर ठेवून धर्मदेवतेला धरणी म्हणली- हे महाप्राज्ञे, खरे काय ते सांग व माझ्या दुःखाचा नाश कर. याप्रमाणे धरणीचे म्हणणे ऐकून धर्मदेवी म्हणाली. ॥३६॥

हे धर्मज्ञे, मी तुला खरे खरे सांगते. पण या मुलाला तू अन्न दे. दिवसा अथवा रात्री केलेले रसयुक्त असे शिजलेले अन्न दे. ॥३७॥

तिचे बोलणे ऐकून आपल्या मुलाच्या करवी सुवर्णाच्या पात्रात ठेवलेले क्षीरान्न आणवून त्या लहान मुलाला दिले. ॥३८॥

हे राजा, सुवर्णाच्या पात्रातले अन्न पाहून त्या धर्मदेव्चा मुलगा रडू लागला. ॥३९॥

आपला मुलगा रडू लागलेला पाहून त्याची निंदा करीत त्यांस एक धपका घालून धर्मदेवता म्हणाली, 'हे दारिद्र्या, हे दुराचार्‍या, कंदमूल फळे खाणारा तू, ॥१४०॥

राजाच्या घरात तयार केलेले रुचकर अन्न बरे खाशील? हे राणी, केव्हाहि पाहावे? जेवण समोर आले की, हा रडतोय काय करावे? ॥४१॥

याप्रमाणे त्या मुलाची निर्भत्सना करीत ते उत्तम प्रकारचे अन्न भक्षण करीत "माझ्या पोटात गेलेले अन्न मुलाला हितकारकच होते" असे म्हणाली ॥४२॥

हे राजा याप्रमाणे म्हणत त्या धर्मदेवीने क्षीरान्न भोजन केल्यानंतर तिला समाधान वाटले, ॥४३॥

यानंतर ती धर्मदेवी म्हणाली- हे सुश्रोणि, मी तुला खरे सांगतो. आता तांबूल दे- ॥४४॥

याप्रमाणे पुलिंद स्त्रीने-धर्मदेवतेने सांगितले असता, वेलदोडे, लवंग कापूर विड्याची पाने इत्यादिकासह राणीने तांबूल समर्पण केला. ॥४५॥

नंतर पूर्वाभिमुख बसून आपल्या मांडीवर आपल्या मुलाला घेतले व समोर वेळूचे टोपले ठेवीत प्रशस्त मांडी घालून ती धर्मदेवता बसली. ॥४६॥

याप्रमाणे पुलंदिनी स्त्रीचे रूप घेतलेल्या श्रीनिवासाचे दर्शन घेण्यासाठी त्यांचे भाषण ऐकण्यासाठी सर्व देव, स्त्रीपुत्रासह आपल्या विमानात बसून मोठ्या कौतुकाने आनंदित होत परस्परांशी बोलू लागले. ॥४७-४८॥

त्या आकाशराजाने व त्याच्या पत्नीने कोणते पुण्य केले असावे बरे? कारण लक्ष्मीसह श्रीहरि प्राकृत मनुश्याप्रमाणे क्रीडा करीत आहे. ॥४९॥

या कलियुगात पापी लोकांच्या उद्धारासाठी ब्रह्मरुद्रादि देवांनी श्रीनिवासाची लीला ही श्रीहरीचे चित्रविचित्र कर्म म्हणून गाईले आहे. ॥१५०॥

याप्रमाणे भविष्योत्तर पुराणातील वेंकटेशमाहात्म्याचा आठवा अध्याय समाप्त