गाढवापुढे कोडे एकदा पडले ...
गाढवापुढे कोडे एकदा पडले असे
मालकाचे प्रेम मोत्यावरतीच कसे ?
मोत्यासाठी भाकरी दुधामधे ताजी
माझ्यासाठी गवत खरकटयातली भाजी.
मोत्याच्या पाठीवर गोंजारणारा हात
इकडे मात्र नाही काठीशिवाय बात.
डोळे मिटून गाढव विचार करु लागले
विचार करता करता कारण त्याला कळले.
मीच लाजराबुजरा माझाच आहे दोष
म्हणून करतो मालक माझ्यावरती रोष.
मोत्या कसा खेळतो लाडेलाडे धावतो
मालकाच्या मांडीवर उडी मारुन बसतो.
गाढव हसून म्हणे खुबी कळली पुरी
करीन आता मीही असेच काहीतरी.
दुसर्या दिवशी गाढव धावत गेले घरात
चौखूर नाचू लागले आनंदाच्या भरात.
नाचत, ओरडत दिली उडवून दाणादाण
कंठापाशी आले घरातल्यांचे प्राण.
मालक वाचत होता पोथी देवापुढे
गाढव नाचत त्याच्या अंगावरती चढे.
मालक पडला जसा गडगडणारा गोटा
उठल्या उठल्या ओरडे, "आधी आणा सोटा."
सोटे आले पाच-सात गाढवावर पडले
पळता पळता म्हणे ते असे कसे घडले ?