पिंपळगावी एक पोरगा मुलगा ...
पिंपळगावी एक पोरगा मुलगा निष्पाप,
भोळा अगदी नाव तयाचे बाळू जगताप.
गावामधले गुंड तयाला सदाकदा छळती
त्याला बघता दुष्टपणाला त्यांच्या ये भरती.
एके दिवशी घोडा अपुला घेऊन सांगाती
गुंडमंडळी, मित्र तयांचे, रस्त्यावर फिरती.
तोच अचानक दिसला बाळू त्यांना तो भोळा
क्षणात झाले त्याच्याभोवती सारे ते गोळा.
कुणी ओढती हात तयाचे, मान कुणी धरती,
गुंडांचा तो नेता येई घोडयासह पुढती.
म्हणे "बोल तू या प्राण्याचे नाव असे काय ?
सांग मला हा आहे घोडा अथवा ही गाय ?"
सांगे बाळू "गाय नसे ही, आहे हा घोडा."
गुंड म्हणे "तव फुटले डोळे, चढवु तुज खोडा !"
सगळे धरुनि त्याला म्हणती "गायच ही मूढा !"
रडून बाळू म्हणे "असे हा घोडा, मज सोडा."
तिकडुन येई परगावचा कोणी वाटसरु
गुंड म्हणाला, "चला विचारु याला, न्याय करु !"
हसूनिया ते वाटसरुला खुणावती सगळे
वाटसरुही हसुनी अपुले मिचकावी डोळे
"अहो पाहुणे", गुंड म्हणाला, "हा प्राणी काय ?
बाळू म्हणतो आहे घोडा, म्हणतो मी गाय.
तुम्ही शहाणे सांगा आता काय खरे-खोटे,
ठरेल खोटे त्याला आपण देऊया रट्टे !"
डोळे उडवित म्हणे पाहुणा, "बघतो मी नीट."
घोडयाचा तो लगाम घेई अपुल्या हातात,
बसून वरती नेई मग तो घोडा दूर जरा
पाहुन गुंडाकडे, म्हणे पाहुणा, "ऐका न्याय खरा !
घोडा नाही, गाय नसे, हे गाढव दमदार
माझे आहे, चुकले होते, मी तर कुंभार !"
असे म्हणुनी क्षणात उधळी घोडा तो स्वार
हा हा म्हणता होई बिलंदर दृष्टीच्या पार.
बावरलेले गुंड भयाने सारे ओरडती
कधीच गेला घोडा-कैसा यावा तो हाती ?
खुल्या मनाने खुदकन हसला बाळू जगताप
कधी दिला ना नंतर त्याला कोणी मग ताप !