आला आला पाउस आला बघ...
आला आला पाउस आला
बघा बघा हो आला आला
पाउस आला ..... पाउस आला ॥धृ॥
काळ्या काळ्या मेघांमधुनी,
शुभ्र कशा या धारा झरती
अवतीभवती झुलू लागल्या जलधारांच्या माळा ॥१॥
हसली झाडे हसली पाने
फुले पाखरे गाती गाणे
ओल्या ओल्या मातीचाही श्वास सुगंधी झाला ॥२॥
धरणी दिसते प्रसन्न सारी
पागोळ्यांची नक्षी न्यारी
फांदीफांदीवरी थाटली थेंबांची ही शाळा ॥३॥
लेवुनिया थेंबांचे मोती
तरारली गवताची पाती
वसुंधरेने पांघरिला जणु हिरवा हिरवा शेला ॥४॥
गीत - वंदना विटणकर