आकाशातुन पतंग काटले त्...
आकाशातुन पतंग काटले
त्यांचे झाले पक्षी,
झोतभट्टीतुन उडल्या ठिणग्या
त्यांची तारानक्षी.
कुणी नाचले आनंदाने
फुले तयांची झाली.
गोड बोलले त्यांची बोली
फळांत रसमय झाली.
रागाने कुणी लाल लाल हो
त्याची झाली आग,
कुणी मायेने धरी उराशी
तेव्हा फुलली बाग.
कुणी कुणाला आश्रय देतो
त्याची होते छाया,
कुणी कुणाला घास भरवतो
ती करुणेची माया.
आपण जे जे करतो त्याचे
असे उमटते बिंब,
उन्हात जाऊ आपण किंवा
होऊ पाऊसचिंब !