तात्या टोपे तात्या ...
तात्या टोपे
तात्या टोपेची तलवार
तराजूतले तख्त फोडते
गाते झाशीची समशेर
सत्तावनची क्रांतिगीते !
झाशीची राणी
राणी लक्ष्मी ही झाशीची
शपथ घालते प्रतापगडची !
कराबणीवर तुटला भाला
धडधडल्या क्रांतीच्या ज्वाला !
छत्रपती शिवाजी
छत्रपतींची आली स्वारी
छत्र धरा हो ढाळा चवरी !
कितीक राजे आले, गेले
एक शिवाजी, एकच उरले !
सुभाषबाबू
शंभर मारुनि मोजा एक
घात करी जो मायभूमिचा
लाख वगळुनि मोजा एक
सुभाष नेता दसलाखांचा
जवाहरलाल नेहरु
जवाहरांचे रमते कविमन
इवल्या इवल्या फुलांमुलांत
जिंकितसे जो विरुद्ध जनमन
नेता त्यासचि म्हणती जगात !
आंबेडकर
आंबेडकरांची आरोळी
ऐका असतील ज्यांना कान
शिवाशिवीला घाला गोळी
धरु नका खोटा अभिमान !
टिळक
टिळक टिळा शोभे भाग्याचा
कंठमणी माझ्या देशाचा !
कुलदीपक हा लक्ष कुळांचा
महापुरुष हा युगायुगांचा !
महात्माजी
महान जीवन गांधीजींचे
अवतरले दुसरे सिद्धार्थ !
सत्य, अहिंसा अन् शांतीचे
राजघाट हे प्रयागतीर्थ !
दादाभाई नौरोजी
दादा, दादा, दादाभाई
भारतमाता अमुची आई !
देशासाठी देह ठेविती
देऊळ घडते त्यांच्यावरती !
टाटा
टाटांच्या टाटानगरीत
किमया करिती हजार हात !
लोखंडाची बघा कोंबडी
घालितसे सोन्याची अंडी !
बंकिमचंद्र
बंकिमबाबूंचा बंगाल
भारत गातो गाणे लाल
एकच कविता पाठ करा रे
अमर चिरंतन सहा अक्षरे
वं दे मा त र म् !
रवींद्रनाथ टागोर
रवींद्रराणा कवी कवींचा
गाणे त्यांचे लिहा नि वाचा
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्यविधाता आहे !