Get it on Google Play
Download on the App Store

देशबंधू दास 34

महात्माजींना सारे पैसे दिले

१९०३ सालची गोष्ट. महात्माजी दक्षिण आफ्रिकेतून मदत गोळा करण्यासाठी आले होते. कलकत्त्यात ते चित्तरंजनांनाही भेटले. त्या वेळेस चित्तरंजन गरीब होते. परंतु स्वतःच्या बँकबुकात जेवढे पैसे होते, तेवढे सारे त्यांनी गांधीजींना दिले.

उपाशी होतास, मग आधी का नाही आलास?


त्यांच्या फॉर्वर्ड पत्राच्या कचेरीत एक नोकर होता. तो वेळच्या वेळी काम करीत नसे. एकदा टपाल घेऊन त्याला पाठवण्यात आले. परंतु त्याने पोस्टात जायला उशीर केला. पत्रे गेली नाहीत. देशबंधू रागावले. असा मनुष्य आम्हाला नको असे ते म्हणाले. त्याला कामावरून कमी करण्यात आले. परंतु दोन दिवसांनी तो मनुष्य पुन्हा देशबंधूंकडे आला.

''मला पुन्हा कामावर घ्या. दोन दिवसांचा मी उपाशी आहे.'' तो म्हणाला.
''दोन दिवस उपाशी होतास? मग आधी का नाही आलास? तुला कामावर नाही घेणार. कारण तू काम नीट करीत नाहीस. परंतु तुला कोठे उद्योग मिळेपर्यंत तू माझ्याकडे जेवत जा.'' असे देशबंधू म्हणाले.

शंभराची नोट दिली


आणि ती जुहू येथील एक गोष्ट आहे. महात्माजींना भेटायला देशबंधू आले होते. तेथे दुसरेही पुढारी होते. देशबंधू व दुसरे काही पुढारी समुद्रात नौकाविहारास जात. आणि त्यांची जायची वेळ आली. मुंबईचे एक पुढारी तेथे होते. त्यांना वाटले, या नावाडयाला देशबंधू कितीसे बक्षीस देतील? पाच रुपये देतील. आपण दहा द्यावे. असे मनात आणून त्या मुंबईच्या सद्गृहस्थाने दहा रुपयांची नोट त्या नावाडयाला दिली. आणि चित्तरंजनांनी खिशात हात घातला. शंभर रुपयांची नोट काढून त्यांनी दिली. तो मुंबईचा थोर पुरुष ओशाळला व देशबंधूंस म्हणला, ''दानवृत्तीत, औदार्यात कोणीही तुमची बरोबरी करू शकणार नाही.''

मी आधी कसा जेवायला बसू?

जुहूचीच ती दुसरी एक गोष्ट. एकदा तिथला एक मनुष्य काही कामासाठी मुंबईस गेला होता. जेवायला परत येईन असे सांगून तो गेला होता. परंतु बराच वेळ झाला तरी तो आला नाही. जेवण वाट पाहत होते.

''चला आपण बसू'' तेथे असलेले सारे पुढारी म्हणाले.

''आपण आधी कसे बसायचे? तुम्ही वाटले तर बसा. मी थांबतो. मी आधी कसा जेवू?''

शेवटी बाकीचे जेवायला बसले. देशबंधू तो कामाला गेलेला मनुष्य आला तेव्हाच त्याच्याबरोबर जेवले.

स्वयंसेवकांना स्वतः वाढीत

ही सहृदयता, ही माणुसकी देशबंधूंजवळ होती. प्रेमळपणाला सीमा नव्हती. कलकत्त्यात जेव्हा कधी स्वयंसेवकांस खूप काम पडे, तेव्हा रात्री त्यांना ते आपल्या घरी बोलावीत. त्यांना स्वतः जेवायला वाढीत. त्यांच्याबरोबर बोलत असत. त्यांचे कौतुक करीत. यामुळेच ते तरुणांचे जीव की प्राण झाले.

देशबंधू दास

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
देशबंधू दास 1 देशबंधू दास 2 देशबंधू दास 3 देशबंधू दास 4 देशबंधू दास 5 देशबंधू दास 6 देशबंधू दास 7 देशबंधू दास 8 देशबंधू दास 9 देशबंधू दास 10 देशबंधू दास 11 देशबंधू दास 12 देशबंधू दास 13 देशबंधू दास 14 देशबंधू दास 15 देशबंधू दास 16 देशबंधू दास 17 देशबंधू दास 18 देशबंधू दास 19 देशबंधू दास 20 देशबंधू दास 21 देशबंधू दास 22 देशबंधू दास 23 देशबंधू दास 24 देशबंधू दास 25 देशबंधू दास 26 देशबंधू दास 27 देशबंधू दास 28 देशबंधू दास 29 देशबंधू दास 30 देशबंधू दास 31 देशबंधू दास 32 देशबंधू दास 33 देशबंधू दास 34 देशबंधू दास 35 देशबंधू दास 36 देशबंधू दास 37 देशबंधू दास 38 देशबंधू दास 39 देशबंधू दास 40 देशबंधू दास 41