देशबंधू दास 31
सरकार
विधीमंडळात होणारे पराजय सरकारला झोंबले. देशबंधूंची शक्ति कशात होती? देशबंधूंच्या भोवती शेकडो तरुण कार्यकर्ते होते. श्री. सुभाषचंद्र बोस आय. सी. एस. होऊन आलेले. परंतु असहकाराच्या त्या काळात कोणता ध्येयार्थी तरुण नोकरीकडे वळणार? सुभाषचंद्र देशासाठी धावून आले. अलौकिक बुध्दी, संघटनापटुत्व, त्यागाची हौस, रुबाबदार व तेजस्वी मूर्ती, असे ते तरुण सुभाषचंद्र होते. चित्तरंजनांचे ते उजवा हात बनले. कलकत्ता म्युनिसिपालटीचे ते चीफ ऑफिसर नेमले गेले. देशबंधूंचा हा वाढता व्याप, ही वाढती शक्ति सरकारला पाहवेना. देशबंधूंचे पंख तोडून टाकायला सरकार तयार झाले. सुभाषचंद्रांना बेमुदत अटक करण्यात आली. आणखीही अनेक तरुणांना गिरफदार करण्यात आले. दडपशाहीचा वरंवटा पुन्हा फिरू लागला.
हुतात्मा गोपीनाथ शहा
आणि तरुण गोपीनाथाने बाँब फेकला. कोणी साहेब मेला. गोपीनाथ फासावर गेला. चित्तरंजनांना वाईट वाटले. तरुणांनी हा दहशतवाद सोडावा असे त्यांना वाटे. परंतु या तरुणांचा मार्ग चुकला तरी त्यांची धीरोदात्तता, त्यांचा त्याग, यांचे कोण कौतुक करणार नाही? देशबंधूंनी गोपीनाथाचा मार्ग चुकला तरी त्याची त्यागवृत्ती सर्वांनी पूजावी, आपलीशी करावी असे लिहिले. देशबंधू का अहिंसावादी नव्हते? ते अहिंसावादीच होते. या देशाला दुसरा मार्ग नाही ही गोष्ट त्यांना पटत होती. परंतु तरुणांच्या त्यागाचा गौरव केल्याशिवाय त्यांना राहवेना.
महात्माजींविषयी परमभक्ति
देशबंधूंचे व महात्माजीचे मतभेद असत. परंतु अहिंसेच्या बाबतीत त्यांचे एकमत होते. विधायक कार्य, हिंदू-मुस्लिम ऐक्य या प्रश्नांवर एकमत होते. चित्तरंजनांनी दिलदारी दाखवून जो हिंदू-मुस्लिम पॅक्ट केला होता, त्याबद्दल महात्माजींनी त्यांना धन्यवाद दिले होते. एकदा देशबंधूंचे एक मित्र महात्माजींविषयी वाटेल ते कटू बोलू लागले. देशबंधू त्याला म्हणाले, ''तू हे काय बोलतोस? कोणाविषयी बोलतोस, कोणासमोर बोलतोस? जा. पुन्हा तुझे तोंड पाहणार नाही.'' महात्माजींची निंदा करणार्या त्या मित्राचा देशबंधूंनी कायमचा त्याग केला. कितीही मतभेद महात्माजीं बरोबर असले तरी ते राष्ट्राचे निर्माते होते. या हतपतित राष्ट्रात केवढा प्राण त्यांनी ओतला! त्यांची का निंदा, नालस्ती करावी? महाराष्ट्रातील निंदकांनी देशबंधूंची ही उदात्तता थोडी घ्यावी.