देशबंधू दास 11
अलिपूर बाँब केस
अलिपूर बाँब केस म्हणून हा खटला प्रसिध्द आहे. अरविंद व इतर तरुण कैदेत होते. अरविंद ईश्वरध्यानात रमले. तुरुंगात श्रीकृष्णाचे दर्शन त्यांना होऊ लागले. परंतु अशा अवलियाला कोण वाचवणार? अरविंदांच्या बहिणीने एक पत्र प्रसिध्द केले. सर्व राष्ट्रापुढे तिने हात पसरले होते. ती भगिनी लिहिते
'माझा भाऊ निर्दोष आहे. परंतु जवळ पैसा नाही. पैसा मिळाला तर वकील देता येईल. बचाव करता येईल. माझा भाऊ वाचेल. मी सर्व राष्ट्रापुढे हात पसरीत आहे.' चित्तरंजन ते पत्र वाचून हळहळले, कळवळले. परंतु दुसर्या वकिलांच्या हातांतील कामात ते कशी ढवळाढवळ करणार? ते रोज आपल्या मित्रांजवळ म्हणत, 'हे माझ्याकडे का नाही खटला घेऊन येत? हा खटला मीच चालवू शकेन. अरविंदांना मीच वाचवू शकेन. अरविंदांचा आत्मा! त्या आत्म्याची ओळख मलाच आहे. त्या थोर आत्म्याची इतरांस ओळख होणे अशक्य आहे.'
चित्तरंजनांकडे खटला
शेवटी तो खटला, चित्तरंजनांकडे आला. त्यांना अत्यंत आनंद झाला. ते म्हणाले, ''एक दिवस हे काम माझ्याकडे येईल अशी मला खात्री होती. मी का अरविंदांचा कोणी नाही? ते का माझे भाऊ नाहीत?'' आणि असे म्हणून ते खटल्याच्या कामात पडले. हा खटला एक वर्षाहून अधिक काळ चालला होता. चित्तरंजनांच्या समोर रात्रंदिवस हे खटल्याचे काम असे; रात्री दोन दोन वाजेपर्यंत ते कागदपत्रे पाहत बसत. घरात अडचण असे. इतर कामे या काळात त्यांनी घेतली नाहीत. कर्ज काढून घरखर्च चालविण्यात येई. घरची गाडी-घोडा सारे विकले गेले. आणि ते शेवटचे त्यांचे भाषण! आठ दिवस भाषण करत होते आणि समारोप करताना म्हणाले, ''न्यायाधीश महाराज! अरविंद निर्दोषी आहेत. एक काळ असा येईल, की ज्यावेळेस राजकीय झगडयांची धूळ शांत झालेली असेल. निःपक्षपाती दृष्टीने त्यावेळेस पाहता येईल. आणि समुद्रापलीकडेही जाईल. एक थोर प्रेषित, एक ईश्वराचा दूत असे जग त्यांना संबोधिल. सर्वत्र त्यांचा गौरव व जयजयकार होईल.''
चित्तरंजनांची ही भविष्यवाणी किती यथार्थ झाली आहे! आणि न्यायाधीशांनी निकाल दिला. अरविंद निर्दोषी ठरले. न्यायाधीश निकाल देताना म्हणाले, 'चित्तरंजनांनी अति उत्कृष्टपणे काम केले. चित्तरंजनांसारखा बचाव करणारा येथे नसता तर कदाचित् एका निर्दोष पुरुषास मला मरणाची शिक्षा द्यावी लागली असती. त्यापासून चित्तरंजनांनी मला वाचविले.'