देशबंधू दास 27
बरोबरच्यांस घरचे अन्न देत
चित्तरंजनांस घरच्या अन्नाचा डबा येई. परंतु तेथे अशक्त व आजारी असणार्यांस ते आपला डबा देत. आधी त्यांना खायला देऊन मग आपण खात स्वतःपेक्षा इतरांची त्यांना काळजी. म्हणून तर त्यांचा शब्द झेलला जाई.
देशातील स्थिती
बरोबरचे सहकारी तुरुंगात गेले. गांधीजी अद्याप बाहेर होते. अहमदाबादच्या काँग्रेसला चित्तरंजन येऊ शकले नाहीत. त्यांचे अध्यक्षीय भाषण वाचून दाखविण्यात आले. अधिवेशन झाले. महात्माजी बार्डोली तालुक्यात करबंदीची चळवळ करणार होते. सरकारला न मानण्याची चळवळ तेथे होणार होती. बार्डोलीकडे सार्या देशाचे डोळे लागले. परंतु तिकडे संयुक्त प्रांतात हिंसेचे प्रकार झाले. महात्माजींनी बार्डोलीची चळवळ बंद ठेवली. महात्माजींवर पुष्कळजण रागावले. राष्ट्राचा हा तेजोभंग आहे असे कोणी म्हणाले. परंतु महात्माजी अविचल राहिले आणि सरकारने आता महात्माजींसही अटक केली. सहा वर्षांची त्यांना शिक्षा देण्यात आली. चळवळ थांबली. उत्साह ओसरला. देशात एक प्रकारची निराशा पुन्हा पसरली.