Get it on Google Play
Download on the App Store

देशबंधू दास 28

स्वराज्य पक्षाची स्थापना

सत्याग्रहाचा एक प्रयोग झाला. स्वातंत्र्याची प्राप्ती होईपर्यंत असे अनेक झगडे करावे लागतात. एक वर्षात स्वराज्य अशी महात्माजींची घोषणा होती. त्यांच्या सांगण्याप्रमाणे सारे राष्ट्र संपाचा तो प्रयोग होता. नि:शस्त्र राष्ट्राला तो पहिला धडा होता. महात्माजी मोठमोठया गोष्टी शिकवीत होते. तुटपुंज्या गोष्टी नकोत. 'लाखो चरखे सुरू करा. कोटयवधी सभासद करा. कामाचे डोंगर आहेत. काम करायला या.' अशी त्यांनी हाक मारली. सत्याग्रहाची लाट ओसरली. परंतु बाहेर पडलेले विद्यार्थी, वकिली सोडलेले वकील हे नवीन कायमचे सेवक राष्ट्राला मिळतील अशी आशा होती. त्यांच्यापैकी काहीजण तरी मिळतील. प्रांताप्रांतांतून, जिल्ह्याजिल्ह्यांतून अशी माणसे पुढे आली होती. त्यांच्यामार्फत सेवेच्या साधनाने सर्वत्र प्रचंड संघटना महात्माजी करू इच्छित होते. आणि पुन्हा चळवळ, पुन्हा लढाई योग्य वेळ येताच करणात होते. परंतु महात्माजी तुरुंगात. बाहेर नवीन कार्यक्रम द्यायला कोणी नाही. विधायक कामाचा अद्याप अनुभव नाही. देशात स्तिमितता पसरली. अशा वेळेस प्रांतिक विधीमंडळांतून घुसावे, तेथे सरकारचे पुनःपुन्हा पराजय करावेत, दिलेल्या सुधारणा कशा पै किंमतीच्या आहेत ते जगाला दाखवावे, असे चित्तरंजनांना वाटले. विधीमंडळावरील बहिष्कार उठवावा. निवडणुका लढवाव्यात, असे चित्तरंजन यांना वाटले. ते आता सुटून बाहेर आले होते. ते विचार करू लागले. मोतीलाल नेहरू, लजपतराय वगैरेंना ते भेटले. गया काँग्रेसमध्ये हा नवीन कार्यक्रम त्यांनी मांडला. पंरतु तो नामंजूर झाला. चित्तरंजन कचरले नाहीत. त्यांनी स्वंतत्र स्वराज्य पक्षाची स्थापना केली. मद्रास प्रांतांत मोठा दौरा काढला. परंतु महात्माजींच्यावर शस्त्रक्रिया होऊन ते सुटले. विश्रांतीसाठी महात्माजी मुंबईजवळ जुहू येथे राहिले. त्यांना भेटायला चित्तरंजन आले. नेहरू आले. शेवटी महात्माजींनी तडजोड केली. काँग्रेसने स्वराज्य पक्षाच्या कार्यक्रमास मंजुरी दिली. काँग्रेसचे मुख्य लक्ष विधीमंडळाकडे नव्हते. मुख्य कार्यक्रम विधायक कार्याचा. परंतु ज्यांना विधीमंडळात जाऊन झगडायचे होते, त्यांना काँग्रेसने परवानगी दिली. महात्माजींनी ऐक्य साधिले. ते स्वतः विधायक कार्याकडे, ठायी ठायी आश्रमांची जाळी पसरून त्यांच्या द्वारा जनता जागृत व संघटित करण्याकडे वळले.

देशबंधू दास

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
देशबंधू दास 1 देशबंधू दास 2 देशबंधू दास 3 देशबंधू दास 4 देशबंधू दास 5 देशबंधू दास 6 देशबंधू दास 7 देशबंधू दास 8 देशबंधू दास 9 देशबंधू दास 10 देशबंधू दास 11 देशबंधू दास 12 देशबंधू दास 13 देशबंधू दास 14 देशबंधू दास 15 देशबंधू दास 16 देशबंधू दास 17 देशबंधू दास 18 देशबंधू दास 19 देशबंधू दास 20 देशबंधू दास 21 देशबंधू दास 22 देशबंधू दास 23 देशबंधू दास 24 देशबंधू दास 25 देशबंधू दास 26 देशबंधू दास 27 देशबंधू दास 28 देशबंधू दास 29 देशबंधू दास 30 देशबंधू दास 31 देशबंधू दास 32 देशबंधू दास 33 देशबंधू दास 34 देशबंधू दास 35 देशबंधू दास 36 देशबंधू दास 37 देशबंधू दास 38 देशबंधू दास 39 देशबंधू दास 40 देशबंधू दास 41