Get it on Google Play
Download on the App Store

सती

गंधमादन पर्वताचा एक निसर्गरम्य भाग ! वनदेवता आणि जलदेवता यांनी आपले सारे वैभव तिथे उधळले होते. वृक्ष पानाफुलांनी बहरले होते. फळांनी लहडले होते. वेलीही फुलल्या होत्या. फुलाफुलांतून सुगंध उधळीत होत्या. उंच गेलेले निळेशार आकाश मनाची प्रसन्नता वाढवीत होते. छोटे छोटे निर्झर आकाशाची निळाई आपल्या हृदयी साठवून खळाळत होते. कापराचा चुरा उधळावा तसे हास्य आपल्या तुषारांतून उधळत होते. हिरवळीचा गालिचा सगळीकडे पसरला होता. त्याचा मुलायम स्पर्श पायांना सुखवीत होता. वारा मंद मंद वाहत होता. आणि दक्षकन्या सती, आपल्या सख्यांबरोबर निसर्गाची ही किमया अतृप्‍त नजरेने न्याहाळत होती. आपल्या डोळ्यांत साठवत होती. तिचे लक्ष समोर गेले आणि ती थबकली. आपल्या सखीला संकेत करीत ती म्हणाली,"सखे विजये ! ते पाहिलंस का ?"
"काय ग ? काही आहे का पाहण्यासारखं ? का उगाच मघासारखी माझी थट्टा करते आहेस ?"
"थट्टा नाही ग ! अग, ती रोहिणी आणि चंद्र बघ किती गडबडीने निघाले आहेत. रोहिणी तर इतकी नटलेली दिसते आहे की, एखाद्या समारंभालाच निघाली आहे ! जातेस का जरा. जरा विचारुन तर ये, कुठे निघाले आहेत ते."
विजया निघून गेली. सती पुन्हा सख्यांच्या गराडयात गुरफटली; पण तिचे मन मात्र विजयेच्या वार्तेकडे लागले होते. विजया घाईघाईने परतत होती. ते पाहून सतीची उत्सुकता ताणली जात होती. तिचे मन अस्वस्थ होत होते. एक अनामिक हुरहूर तिचे मन बेचैन करीत होती. ’असं का व्हावं’ हे तिलाही समजत नव्हते. वनविहाराच्या आनंदाचे निर्माल्य झाले होते. विजया आली आणि म्हणाली,"सखे, अगं ते तुमच्याच घरी निघाले आहेत !"
"आमच्या घरी ?"
"हं ! म्हणजे प्रजापती दक्षमहाराजांकडे !"
"वा ग वा ! खुळीच आहेस की तू."
"काय झालं ग. मला उगाच खुळी म्हणतेस !"
"खुळी नाही तर काय ? आता ते घर काय माझं आहे ? माझं घर म्हणजे माझ्या पतीचं घर. एकदा तुझं लग्न झालं म्हणजे कळेल की लग्नानंतर मुलीला सासरचं किती मोल वाटतं ते ! अग, सासर-मग ते कसही असो, तिथं पत्‍नी ही राणी असते, अन् माहेरी पाहुणी !!"
"म्हणूनच पाहुण्यांना बोलावलेले दिसत नाही बरं का !"
"का ग, काय झालं ? रोहिणी कशाला चालली आहे तिकडे ?"
व्याकुळ होऊन सतीने विचारले. तिच्या शब्दातली कातरता विजयाला जाणवली. ती म्हणाली, "काहो पाहुण्याबाई, उगीच कशाला चौकशी ? पाहुण्यांना बोलावायचं का नाही ते यजमानांनी ठरवायचं असतं म्हटलं !"
"ए, चेष्‍टा पुरे झाली हं ! सांग ना काय आहे ते. माझं मन कसं व्याकुळ होतंय गं ! अग, माहेरचं नाव काढलं की, तातांचा आठव येतो, आईच्या मृदू हातांचा स्पर्श आठवतो अन् तिची साईसारखी दाट माया आठवते. मन भेटीसाठी ओढ घेतं ग ! सांग ना, ते कशाला चालले आहेत तिकडे ?"
"तुझ्या वडिलांनी एक मोठा यज्ञ करायचं ठरविलं आहे. तिकडे निघाले आहेत ते. अनेक ऋषिमुनी, देवदेवता येणार आहेत म्हणे ! सती, तुमच्या घरचा यज्ञ, आणि तुम्हाला ग कसं बोलावलं नाही ?"
विजयेच्या बोलांनी सतीचे हृदय करवतीने कापावे तसे झाले. तिचा चेहरा बदलला. निरभ्र आकाश एकदम ढगांनी व्यापून गेले. तिला समजेनासे झाले की, ’आम्हाला बोलावणे का नाही ? तात विसरले असतील का ? छे, असं कसं होईल ? लाडक्या लेकीला ते कसे विसरतील ? मग निमंत्रण का नाही ? विचारांचा भुंगा तिचं मन पोखरु लागला. आणि त्याच स्थितीत ति कैलासावर आली.  कैलासावर शंकरांची सभा जमली होती. गणांच्या मध्यभागी शंकर शोभून दिसत होते. तारकांच्या समूहात पौर्णिमेचा चंद्र शोभाव तसे. सती त्या सभेत आली. शंकरांना वंदन करुन समोर उभी राहिली. चेहरा विस्मय, शंकाकुशंकांच्या जाळ्याने व्यापला होता. सती अवचित तेथे आलेली पाहून शंकरालाही आश्‍चर्य वाटले.
"सती, तू...? आणि सभेत अशी अवचित कशी आलीस ?"
"नाथ, आता एक वार्ता कानी आली म्हणून..."
"एवढी महत्त्वाची वार्ता आहे ? आणि तुझा चेहराही बदलला आहे. सांग, काय वार्ता आणली आहेस ?"
"माझ्या वडीलांकडे मोठा यज्ञ होणार आहे असं ऐकलं."
"आमच्याही कानी आलं आहे ते."
"मग...आपण जायचं नाही यज्ञाला ? ऋषिमुनी, देवदेवता सार जमले आहेत, असं ऐकलं. आपल्या इष्‍टमित्रांकडे जाण्याने प्रेमवृद्धी होते. नाथ, मला वाटतं, आपण यज्ञाला जावं !" सती मोठया उत्सुकतेने, अपेक्षेने भरभर बोलून गेली. शंकर तिच्याकडे पाहतच राहिले होते. मग ते तिला शांतपणे म्हणाले,"सती, इष्‍टमित्रांच्याकडे, आप्‍तस्वकीयांच्याकडे गेल्याने प्रेमवृद्धी होते, हे तुझं म्हणणं अगदी खरं आहे. पण मुळात प्रेम असेल तर..."
"म्हणजे, आपल्याविषयी दक्ष प्रजापतींना प्रेम नाही ?"
"असतं तर आपल्याला यज्ञाचं निमंत्रण नसतं का आलं ? तू तर त्यांची लाडकी मुलगी ! मी त्यांचा जावई ! प्रिये, न बोलावता कोणाकडेही जाऊ नये. तसं गेलं तर अपमान होतो आणि त्याचं दुःख मरणप्राय असतं."
ते ऐकून सती दुःखाने घायाळ झाली. ’पित्याने आपल्याला साधे निमंत्रणही देऊ नये,’ हे अपमानाचे शल्य तिचे हृदय कापीत गेले. क्षणभर तिचा चेहरा म्लान झाला. मस्तक खाली झुकलं. आणि दुसर्‍याच क्षणी काही एका निश्‍चयाने ती म्हणाली,"नाथ ! आपण सर्वेश्‍वर. आपल्या अस्तित्वानं, आशीर्वादानं सारी कार्यं पुरी होतात. अन् आपल्यालाच बोलावणं नाही; मग यज्ञ पुरा कसा होणार ?"
सतीच्या शब्दांनी शंकरांनी नुसते तिच्याकडे पाहिले. मंद स्मिताची एक रेषा त्यांच्या चेहर्‍यावर उमटली. त्यांच्याकडे पाहत ती पुन्हा म्हणाली, "ईश्‍वरा, आपल्या स्मिताचा अर्थ मला कळला. पण माझ्या पित्यानं आपल्याला का बोलावलं नाही, हेच मला समजावून घ्यायचं आहे. शिव म्हणजे कल्याण ! शिव म्हणजे शुचिता ! पावित्र्य !! अन् त्याला निमंत्रन नाही मग तो यज्ञ कसला ? हेच मला विचारायचं आहे. आपण मला जाण्याची अनुज्ञा द्यावी."
"प्रिये, तू तिथं जावंस, असं मला वाटत नाही. माझी तशी इच्छाही नाही. अपमान होईल तुझा."
"आता आणखी काय अपमान व्हायचा राहिला आहे ? नाथ, माझ्यापेक्षा आपल्या अपमानाचं शल्य माझ्या हृदयाला तीव्र वेदना देत आहे. आपण माझे सर्वस्व आहात. कोणतीही पतिव्रता आपल्या पतीचा अपमान सहन करु शकत नाही. नाथ, आपण अनुज्ञा द्या. पित्याकडून मला याचं कारण समजावून घ्यायचं आहे." सती काकुळतीला आली. अश्रूपूर्ण नेत्रांनी तिने शंकरांकडे पाहिले.

"जशी तुझी इच्छा. जा, पण सांभाळून रहा. जाताना महाराणीसारखा साजशृंगार करुन जा. कारण तिथं पूजा असेल ती लक्ष्मीची ! वैराग्याला कोण विचारणार तिथं ? आणि प्रिये, तुझ्या पित्यालाही समजू दे की, भौतिक श्रीमंती आमच्याजवळही आहे. पण आध्यात्मिक सुखाच्या नित्यानंदात रमलेले असल्याने हे श्रीमंती सुखसोहळे आम्हाला भुलवू शकत नाहीत. आम्ही वैराग्य धारण करुन राहतो ते त्यामुळे !"
सतीने सारे ऐकले. शंकरांना वंदन केले. यथोचित साजशृंगार केला. नंदी सजून तयार होता. बरोबर बराच लवाजमा घेतला. आणि ती आपल्या पित्याच्या यज्ञस्थानी जाण्यासाठी निघाली. यज्ञसमारंभासाठी प्रजापती दक्षाने आपले नगर शृंगारले होते. घराघरांवर तोरणे बांधली होती. केळीच्या खांबांची कलापूर्ण प्रवेशद्वारे ठिकठिकाणी उभी केली होती. केशर-कुंकुमाचे सडे घातले होते. अनेक ऋषिमुनी यज्ञासाठी आले होते. त्यांच्या पर्णकुटिकांनी नगराचे पावित्र्य वाढले होते. यज्ञ नुकताच सुरु झाला होता. आहुतींच्या धूमाने आसमंत व्यापून गेले होते. आहुती देताना म्हटलेला मंत्रांचा ध्वनी दूरपर्यंत ऐकू येत होता. सार्‍या गोष्‍टी न्याहाळीत सती यज्ञभूमीकडे जात होती. दुरुन दिसणारी यज्ञभूमी तेजाने तळपत होती. तिचा शृंगार डोळे दिपविणारा होता; परंतु त्याचा प्रभाव सतीच्या मनावर पडत नव्हता. अपमानाचे शल्य तिच्या मनाला खुपत होते. ती निघाली होती पित्याला जाब विचारायला ! त्यामुळे ते सौंदर्य, ते वैभव तिच्या दृष्‍टीने शून्यवत होते. तिचे तिकडे लक्षही जात नव्हते.
प्रवेशद्वारापाशी सती पायउतार झाली. तिने आत प्रवेश केला. झगमगत्या वैभवाने आणि अप्रतीम लावण्याने तिने सार्‍यांचे लक्ष वेधून घेतले. तेजस्वी अग्नीनेच मानवी रुप घेतले नाही ना ? का या यज्ञधूमातून विद्युल्लताच अवतरली ? या संभ्रमात क्षणभर दिङ्‌मूढ होऊन सारे तिच्याकडे पाहत राहिले. सतीला पाहून तिच्या बहिणी पुढे झाल्या. तिच्या वैभवाने क्षणभर त्याही दिपून गेल्या; आणि मग हसून त्यांनी तिचे स्वागत केले. तिच्या हाताला धरुन त्या यज्ञमंडपात जाऊ लागल्या. त्यांच्या हसण्यातही सतीला अपराधीपणाची छटा जाणवत होती. थोडेसे पुढे गेल्यावर आई दिसली. सतीला पाहताच ती हरखून गेली. आई दिसताच तिने नमस्कार केला. आपल्या छातीशी घट्ट धरीत आणि पाठीवरुन मायेनं हात फिरवीत ती म्हणाली, "सती, तू आलीस-किती बरं वाटलं म्हणून सांगू ? पोरी, तू नव्हतीस, तर हे सारं वैभव मला खायला उठलं होतं. हा प्रकाश मला अंधारल्यासारखा वाटत होता. शरीरातलं त्राण नाहीसं झाल्यासारखं वाटत होतं."
आईच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. सतीच्या मस्तकावर त्यांचा अभिषेक चालू होता. त्या मायेच्या प्रवाहात ती भिजत होती. मनही भिजत होते. शांत होत होते. क्षणभराने सतीच्या आईने प्रजापती दक्षाकडे पाहिले आणि ती त्याला आनंदातिरेकाने म्हणाली, "अहो ! पाहिलें का कोण आलंय ते ? आपली सती..."
दक्षाने मान वळवली. सतीला पाहताच त्याला आश्‍चर्य वाटले. चेहर्‍यावर एक सूक्ष्म आठी पडली. आपल्या वडिलांच्या चेहर्‍यात झालेला बदल तिच्या नजरेतून सुटला नाही. शांत झालेल्या मनात पुन्हा वादळ उठले. तरी तिने वडिलांना नमस्कार केला. आशीर्वाद तर नाहीच, पण आपलेपणाचा, अगत्याचाही अभाव तिला जाणवला. तिची नजर इकडे-तिकडे भिरभिरु लागली. विष्णू, ब्रह्मदेवादी देव, ऋषिमुनी आपापल्या स्थानी होते. त्यांचा यज्ञातील हविर्भाग काढून ठेवलेला होता. तिथे स्थान नव्हते ते फक्‍त शंकराला. शिवतत्त्वाला ! सारे दृश्य पाहिल्यावर सतीचा राग अनावर झाला. आधीच अपमान आणि त्यात पित्याकडून उपेक्षा ! तिचा चेहरा रागाने लाल झाला. वार्‍याने कोवळी वेल थरथरावी तशी ती थरथरु लागली. तिच्या तोंडून शब्द बाहेर पडू लागले. शब्द कसले, अग्निबाणच !
"तात, तुम्ही यज्ञ आरंभला आहे; पण शंकराला बोलावलं नाही. आपला यज्ञ पुरा कसा होईल ? ज्याच्या आगमनानं अखिल चराचर पवित्र होतं त्याला निमंत्रण नाही ? आपली बुद्धी भ्रष्‍ट झाली आहे का ? तात, यज्ञ म्हणजे त्याग ! त्याग हा मनाची शुद्धता वाढवतो. मन पवित्र करतो. आणि तुमच्या येथल्या यज्ञात तर मत्सर ! भेदभाव !! पावित्र्याला, शुचितेला तर इथे थाराच नाही ! हा कसला यज्ञ ? जे लोक सद्धर्म, सदाचार,पावित्र्य आपल्या पायाखाली तुडवितात ते दुष्‍ट आहेत. तात, तुम्ही दुष्‍ट आहात...दुष्‍ट..."
सतीच्या शब्दप्रहारांनी सारे भांबावून गेले. चित्रासारखे स्तब्ध झाले. एवढया देवदेवतांच्यासमोर झालेल्या अपमानाने दक्षही खवळला.
"सती, तू कोणाला बोलते आहेस याची शुद्ध आहे का ? तू इथे आलीस कशाला ? कुणी निमंत्रण पाठविलं होतं तुला ? न बोलावता कुठे जाऊ नये एवढी साधी गोष्‍ट तुला कळत नाही; आणि वर प्रत्यक्ष पित्याचा अपमान करतेस ? तोही त्या अकुलीन, अमंगल शंकरासाठी ?’
"कोणाला अकुलीन म्हणता आहात ? माझ्या पतीला ? प्रत्यक्ष परमेश्‍वराला ? तात, असं अभद्र बोलताना जीभ झडून कशी पडत नाही तुमची ?"
"हो-हो, तुझ्या पतीला ! त्याला मी चांगलं ओळखतो. त्याला नाही शास्‍त्रज्ञान. भूतप्रेतांच्या संगतीत स्मशानात राहणारा तो ! त्याची काय किंमत ठेवायची ? या ब्रह्मदेवाने त्या वेळी गळ घातली म्हणून तुझं लग्न त्याच्याशी करुन दिलं. त्यामुळे त्याला बायको तरी मिळाली."
दक्षाचे बोलणे सतीच्या हृदयावर घणाचे घाव घालीत होते. काळीज विदीर्ण होत होते. संताप आणि दुःख अनावर होत होते. तिला मनोमनी जाणवले की, ’अखेर नाथ म्हणाले तेच खरं !’ तिच्या मनात आले, ’आता परत कशी जाऊ ? इथे काय घडलं म्हणून विचारलं तर काय सांगू ? हे अपमानित तोंड त्यांना कसं दाखवू ?’ आपलं दुःख कसंबसं दाबीत एका कृतनिश्‍चयाने ती दक्षाला म्हणाली,"दक्षा, तू अहंकाराने उन्मत्त झाला आहेस. तू काय बोलतो आहेस याची शुद्ध तुला नाही. पतिव्रता आपल्या पतीचा अपमान कधीही सहन करीत नसते. तू माझ्या पतीचा अपमान केलास. तो ऐकल्यावर आता जिवंत राहून तरी काय करायचं आहे ? माझे पती मला तुमच्या नावावरुन ’दाक्षायणी’ म्हणतात. मला आता या नावाची लाज वाटते. तुमच्याशी संबंध असलेल्या या घाणेरडया शरीराचा बोजा आता मी सहन करु शकत नाही. त्याचा त्याग करणं हेच आता श्रेयस्कर आहे."
सती बोलत होती. सगळेजण ऐकत होते; पण कोणाचीही मध्ये बोलण्याची हिंमत होत नव्हती. अपराधी मुद्रेने सारे मान खाली घालून बसले होते. सती इतर देवांकडे वळून म्हणाली,"देवतांनो, ऋषिमुनींनो, तुम्हीही विवेक वापरु नये ? निदान तुम्हाला तरी कळायला हवं होतं की, शंकराशिवाय यज्ञ पुरा होऊच शकणार नाही. तुमच्याही मनी दुष्‍टता यावी ? महापुरुषाची निंदा तुम्ही मख्खपणे ऐकत बसलात. तुम्हाला काही वाटत नाही ? जो महापुरुषाची निंदा करतो त्याची जीभ छाटून टाकावी; आणि ते जर शक्य नसेल तर आपण निघून जावं, असं म्हणतात. पण तुम्ही इथे चित्रासारखे बसून राहिलात. याचं प्रायश्‍चित्त तुम्हाला घ्यावं लागेल."
वळवाच्या सरीसारखा सतीने संतापाचा वर्षाव केला; आणि ती एकदम शांत झाली. काही एका निश्‍चयाने ती भूमीवार बसली. वस्‍त्र नीटनेटके केले. डोळे मिटले. पतीचे स्मरण केले. योगधारणेला सुरुवात केली. मन विकाररहित झाले. योगसामर्थ्याने स्वतःभोवती तिने अग्नी उत्पन्न केला. क्षणार्धात त्याने आपल्या लवलवत्या ज्वाळांनी तिच्या पवित्र, कोमल शरीराला वेढून घेतले. पाहता पाहता सतीचे शरीर त्यात भस्म होत होते. त्या तेजस्वी ज्वाळांकडे दक्ष विस्मयचकित होऊन पाहत होता. त्यातून एक आकृती आकार घेऊ लागली. दक्ष भूतकाळात ओढला जाऊ लागला. त्याच्या डोळ्यांसमोर, त्या ज्वाळात देवी महेश्‍वरी उभी राहिली. ती म्हणाली, "दक्षा, मूढा ! मला ओळखलंस ? मी महेश्‍वरी, शिवा ! तुझ्या तपश्‍चर्येनं, भक्‍तीनं प्रसन्न झाले, त्या वेळी ’तुझ्या पोटी जन्म घेईन’, असा वर दिला होता. त्यामुळे तू आनंदी झालास. परंतु त्याच वेळी तुला सांगितलं होतं, ’ज्या वेळी तू माझा अनादर करशील त्याच क्षणी मी त्या शरीराचा त्याग करुन माझ्या मूळ रुपात विलीन होईन.’ हे तू विसरलास. तू माझा अनादर केलास आणि शिवाचाही अपमान केलास. मूर्खा, शिवाचा आणि शक्‍तीचा अवमान करुन कोणतंच कार्य पुरं होत नसतं, हे लक्षात ठेव."
महेश्‍वरी शिवेची आकृती अस्पष्‍ट होत होत अंतर्धान पावत होती. दक्ष देहभान विसरुन, त्या तेजाला नमस्कार करण्यासाठी पुढे धावला. पण उशीर झाला होता. ते तेज नाहीसे झाले होते. उरली होती रक्षा. सतीची, दक्षकन्येची पवित्र रक्षा !!

पौराणिक कथा - संग्रह १

संकलित
Chapters
हयग्रीव अवतार बौद्धावतार हरिश्‍चंद्र वज्रनाभ राजाची कथा उषा-अनिरुद्ध विवाह यादवांच्या नाशाची कथा महाप्रलयाची कथा व्यासपुत्र शुकाची कथा मुचकुंदाची कथा उर्वशी व पुरुरवा ध्रुवाची कथा अयोध्येच्या धोब्याची कथा गाईचा महिमा दंडकारण्य उत्पत्ती कथा कर्णपुत्र वृषकेतूची कथा नृसिंह व वीरभद्र पाच पांडव व द्रौपदी कलंकी अवतार तपती आख्यान कृपाची जन्मकथा सरस्वतीची झाली नंदा रामभक्त राजा सुरथ श्‍वेतराजाचा उद्धार शिवभक्त वीरमणी रावणकथा विष्णूचे चक्र व गदा वैजयंतीमालेची कथा नंदीची कथा सांबाची सूर्योपासना प्रल्हाद आख्यान पौंड्रकवासुदेव वध व काशिदहन शांतीचा मार्ग शंबरासुर वध पारिजात कथा श्रीवत्सलांच्छनाची कथा वृकासुराची कथा स्यमंतक मण्याची कथा १ स्यमंतक मण्याची कथा २ दशरथ कौसल्या विवाह त्रिशंकूची कथा भृगुपुत्र शुक्राची कथा कर्कटी राक्षसीची कथा जीवटाख्यान समुद्रमंथन व राहूची कथा रेणुकेचा जन्म रेणुका स्वयंवर सहस्रार्जुनाची कथा जयध्वजाचे आख्यान सौभरी चरित्र गरुडाचे गर्वहरण पराशर कथा श्रीमतीचे आख्यान कौशिकाचे वैष्णवगायन क्षुप व दधिचाची कथा श्रीरामांची सतीकडून परीक्षा शंखचूडाची कथा शिवांचे अवतार अवदशेची कथा कान्यकुब्ज नगरीची कथा भरताचे मागणे उर्वशी लोपामुद्रा सती सुकन्या नीलम आणि ऋता मैत्रेयी गार्गी सुभद्रा चित्रांगदा देवकी यशोदा