श्रीमतीचे आख्यान
ईक्ष्वाकु वंशात अंबरीष नावाचा धार्मिक व न्यायी राजा होऊन गेला. त्याला श्रीमती नावाची अत्यंत सुंदर व गुणी कन्या होती. एकदा महामुनी नारद व पर्वत राजाकडे आले व त्यांनी श्रीमतीची चौकशी केली. राजा अंबरीषाने तिच्यासाठी वरसंशोधन चालू असल्याचे सांगितले. यावर दोघांनीही श्रीमतीशी विवाह करण्याची इच्छा दर्शवली. पण आपण कुणाला तरी एकालाच कन्या देऊ, असे अंबरीषाने सांगताच "आम्ही उद्यापरत येऊ' असे सांगून ते दोघेही निघून गेले. ते दोघेही भगवान विष्णूंचे भक्त होते. नारदमुनी प्रथम विष्णूंकडे गेले व आपणासच ती मुलगी प्राप्त व्हावी अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. यासाठी पर्वतमुनीचे तोंड माकडाप्रमाणे व्हावे असेही त्यांनी मागणे मागितले. विष्णूने तथास्तु म्हटल्यावर नारदमुनी परत अयोध्येस आले. नंतर पर्वतमुनीही विष्णूकडे गेले व त्यांनी श्रीमतीची प्राप्ती आपल्यालाच व्हावी म्हणून नारदाचे तोंड गायीच्या शेपटाप्रमाणे व्हावे, अशी इच्छा प्रदर्शित केली. विष्णूने त्यालाही "तथास्तु" म्हणून परत पाठवले.
अंबरीष राजाने स्वयंवराची सर्व सिद्धता केली. आपल्या कन्येस घेऊन तो तेथे आला. त्यांची तोंडे पाहून श्रीमती घाबरली. राजाने त्या दोघांपैकी एकाच्या गळ्यात माळ घालण्यास सांगताच ती म्हणाली, "हे दोघे असे विचित्र कसे दिसू लागले? या दोघांच्या मध्ये मला अतिशय देखणा, अलंकारांनी नटलेला असा एक तरुण दिसत आहे." श्रीमतीने त्या तरुणाचे वर्णन करताच ही सर्व भगवंताची माया आहे हे दोघा मुनींनी जाणले. श्रीमतीने वरमाला त्या तरुणाच्या गळ्यात घातल्याबरोबर श्रीमतीला विष्णूंनी आपल्याबरोबर विष्णूलोकी नेले. पूर्वकाली उग्र तप करून तिने प्रभूंची प्राप्ती करून घेतली होती.
दुःखी मनाने दोघे मुनी भगवंतांकडे आले. तेव्हा भगवंतांनी श्रीमतीला लपून राहण्यास सांगितले. आपण श्रीमतीस नेले नाही, असे विष्णूने सांगताच ही दुष्टता राजाची आहे असे वाटून ते दोघे अंबरीषाकडे आले. त्यांनी त्याला शाप दिला. त्याला जाळण्यासाठी तमोराशीचे उत्थान केले. पण भगवान विष्णूंच्या सुदर्शनचक्राने तमाला त्रस्त केले व तम दोघा मुनींच्या मागे लागला. विष्णूंची प्रार्थना केल्यावर त्यांनी चक्र व तम यांना आवरले. "आपण दोघांनी कोणत्याच कन्येशी विवाह करायचा नाही," अशी प्रतिज्ञा दोघांनी केली.