पौंड्रकवासुदेव वध व काशिदहन
चेदिदेशात पौंड्रकवंशात वासुदेव नावाचा एक राजा होऊन गेला. अज्ञानवशात स्वतःच्या क्षमता न जाणून घेताच मी भगवान विष्णूचा अवतार आहे, असे म्हणू लागला. एवढेच नव्हे, तर शंख, चक्र, गदा, पद्म ही भगवंतांची चिन्हेही त्याने धारण केली. मग त्याने श्रीकृष्णाकडे दूताकरवी निरोप पाठविला, की तुम्ही वासुदेव हे नाव, तसेच चक्र इत्यादी चिन्हे सोडावी व मला शरण यावे. श्रीकृष्णाने उलट निरोप पाठविला, की मी सर्व चिन्हे घालून उद्याच तुझ्या नगरीत येईन. तू सावध राहा.
त्याप्रमाणे श्रीकृष्ण गरुडावर बसून सर्व चिन्हांसह पौंड्रकाच्या राजधानीत पोचले. पौंड्रकाच्या मदतीसाठी काशिनरेश आपल्या महान सेनेसह आला. दोन्ही सेना कृष्णाच्या समोर उभ्या ठाकल्या. स्वतः पौंड्रक वासुदेव सर्व चिन्हे, गरुडध्वज, श्रीवत्सचिन्ह इत्यादींसह समोर आला. भगवानांनी एका क्षणात आपल्या शार्ङ्ग धनुष्यातून बाण सोडून शत्रूला घायाळ केले. गदा, चक्र यांनी सर्व सेनेचा नाश केला. आपल्या मित्राच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी काशिनरेश युद्धास सज्ज झाला. भगवानांनी शार्ङ्ग धनुष्यातून सोडलेल्या बाणांनी त्याचेही शिर कापून टाकले. मग श्रीकृष्ण द्वारकेस परत गेले. ते काशिनरेशाचे मस्तक उडून काशीस येऊन पडले होते. त्याच्या मुलाला कळले, की हे कृष्णाचे काम आहे. तेव्हा त्याने भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले व वर मागितला, की कृष्णाच्या नाशाची काही योजना आखावी. त्यानुसार श्रीशंकरांनी अग्नीपासून एक अक्राळविक्राळ राक्षसी निर्माण केली. ती रागाने "कृष्ण कृष्ण' म्हणत द्वारकेस पोचली. भगवान श्रीकृष्णांनी तिच्यावर आपले सुदर्शनचक्र सोडले. त्या तेजाने ती राक्षसी जळू लागली व सैरावैरा धावू लागली. तिचा पाठलाग करीत ते चक्रही मागे जाऊ लागले. शेवटी हतबल झालेली ती राक्षसी काशीस येऊन पोचली. काशीतील सर्व सेना शस्त्रास्त्रे घेऊन त्या चक्राचा सामना करू लागली; पण त्या चक्राने सर्व सेनेला तसेच नगरीतील सर्व प्रजा, सेवक, हत्ती, घोडे यांना जाळून मगच ते शांत झाले व परत फिरून श्रीकृष्णांच्या हातात येऊन स्थिरावले.