शांतीचा मार्ग
श्रीरामांनी वसिष्ठांना विचारले,"आपल्या म्हणण्याप्रमाणे प्राण व अहंकार हे एकच असतील तर अहंकाराचा नाश होताच या देहाचा नाश व्हायला पाहिजे. मी या अहंकाराचा त्याग कसा करू व त्याबरोबर जिवंत कसा राहू, हे आपण मला सांगा." त्यावर वसिष्ठ म्हणाले,"जो अहंकाररूपी वासनेचा त्याग करून प्रारब्धप्राप्त व्यवहार लीलेने करतो, त्याला जीवन्मुक्त म्हणतात. महात्मा जनक हे याचे उत्तम उदाहरण होय. जीवन्मुक्त हा हर्ष, भ्रम, काम, क्रोध इत्यादींनी व्याकूळ होत नाही. यासंबंधीची ही दोन ऋषिपुत्रांची कथा ऐक. जंबुद्वीपाच्या एका भागात लहान लहान टेकड्यांनी व अरण्यांनी वेढलेला महेंद्र नावाचा पर्वत होता. अनेक मोठेमोठे वृक्ष, उंच शिखरे, भरपूर पाणी, गुहा असे त्याचे वैभव होते. त्या गुहांमधून अनेक ऋषी-मुनी आपल्या परिवारासह राहून तप करीत. तेथेच एका नदीतीरी दीर्घतपा नावाचा, नावाप्रमाणेच प्रखर तप केलेला व अत्यंत उदार, धार्मिक असा तपस्वी आपली पत्नी व पुण्य आणि पावन नावाचे दोन गुणी पुत्र यांच्यासह राहत असे.
काही वर्षांनी ज्येष्ठ पुत्र पुण्य अध्ययनाने आत्मज्ञानसंपन्न झाला. पण पावन मात्र ज्ञान-अज्ञानाच्या सीमेवर होता. यथावकाश दीर्घतपा मुनी मरण पावले. त्या दुःखावेगामुळे त्यांच्या पत्नीनेही देहत्याग केला. ज्येष्ठ पुत्र पुण्य विवेकी असल्याने मरणोत्तर क्रियाकर्म करू लागला. पण पावन मात्र शोकमग्न होऊन इतस्ततः भटकू लागला. सतत रडत सुटला. सर्व क्रियाकर्म आटोपल्यावर पुण्याने त्याचे सांत्वन केले. तो म्हणाला,"असे इतके रडून तू आपले अज्ञान का प्रकट करतोस? हा माझा पिता, ही माझी माता ही मोहजन्य भावना तू धारण केली आहेस. आतापर्यंत आपण सर्व जण हजारो योनीतून गेलो असून तुझे हजारो मातापिता झाले आहेत. देह म्हणजे मी नसून केवळ देहात्मक भ्रम आहे. तुझे आतापर्यंतचे जन्म हे वासनेची फळे असून माझ्या ज्ञानदृष्टीने ते मला दिसले. ज्ञानी लोक व्यवहारात बाह्यतः कर्तव्य बजावतात, पण आत्म्याशी त्यांचे अनुसंधान कायम असते. ते मनाने आसक्त होत नाहीत. हे ऐकल्यावर पावनाला आत्मज्ञान झाले. दोघे बंधू काही वर्षांनी देह क्षीण होऊन मोक्षपदी पोचले.
सर्व शोकांचे कारण असलेल्या तृष्णांचा त्याग करणे हाच शांतीचा मार्ग आहे, असा उपदेश या निमित्ताने वसिष्ठांनी श्रीरामाला केला.