संत निवृत्तीनाथांचे अभंग
आमचा साचार आमचा विचार । सर्व हरिहर एकरूप ॥ १ ॥
धन्य माझा भाव गुरूचा उपदेश । सर्व ह्रषीकेश दावियेला ॥ २ ॥
हरिवीण दुजे नेणें तो सहजे । तया गुरुराजें अर्पियेलें ॥ ३ ॥
हरि हेंचि व्रत हरि हेंचि कथा । हरिचिया पंथा मनोभाव ॥ ४ ॥
देहभाव हरि सर्वत्र स्वरूप । एक्या जन्में खेप हरिली माझी ॥ ५ ॥
निवृत्ति हरी प्रपंच बोहरी । आपुला शरीरीं हरि केला ॥ ६ ॥