Get it on Google Play
Download on the App Store

मदालसा


उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा । आलासी कवण्या वाटां मातेचियां गर्भवासा ।
जो पंथ वोखटा रे पचलासी कर्मकोठा । अविचार बुद्धि तुझी पुत्रराया अदटा ॥१॥
पयें दे मदालसा सोहं जो जो रे बाळा । निजध्यानीं निज पा रे लक्ष लागो दे डोळा ।
निज तें तूं विसरलासी होसी वरपडा काळा ॥२॥
नवमास कष्टलासी दहाव्यानें प्रसुत झाली । येतांचि कर्मजाड तुझीमान अडकली ।
आकांतु ते जननीये दु:ख धाय मोकली । स्मरे त्या हरिहरा ध्यायीं कृष्णमाउली ॥३॥
उपजोनि दुर्लभु रे मायबापा झालासी । वाढविती थोर आशा थोर कष्टी सायासी ।
माझें  माझें म्हणोनिया झणी वायां भुललासी । होणार जाणार रे जाण नको गुंफ़ो भवपाशीं ॥४॥
हा देहो नाशिवंत मळमुत्राचा बांधा । वरी चर्म घातलें रे कर्म कीटकाचा सांदा ।
रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा । स्मरे त्या हरिहरा शरण जाई ऎसा ॥५॥ 
या देहाचा भरंवसा पुत्रा न धरावा ऎसा । माझें माझें म्हणोनियां बहु दु:खाचा वळसा ।
बहुत ठकियेले मृगजळाच्या आशा । तृष्णा ते सांडुनियां योगी गेले वनवासा ॥६॥
या पोटाकारणें रे काय न करिजे एक । या लागीं सोय धरी रे तिहीं भुलविले लोक ।
ठायींचे नेमियेलें त्याचें आयुष्य भविष्य । लल्लाटीं ब्रम्हारेखा नेणती तें ब्रम्हादिक ॥७॥
जळींचीं जळचरें रे जळीचिया रमती । भुललीं तीं बापुडीं रे ते कांहीं नेणती ।
जंव नाहीं पुरली रे त्यांची आयुष्यप्रात्पी । वरि घालुनि भोंवरा जाळ बापा तयातें गिवसिती ॥८॥
पक्षिणी पक्षिया रे निरंजनीं ये वनीं । पिलिया कारणें रे गेली चराया दोन्ही ।
अवचिती सांपडली रे पारधिया लागुनी । गुंतुनियां मोहोपाशीं प्राण त्याजिती दोन्ही ॥९॥
मृग हा चारिया रे अतिमानें सोकला । अविचार बुद्धि त्याची परतोनि मागुता आला ।
तंव त्या पारधियानें गुणीं बाणु लाविला । आशा रे त्यजुनियां थिता प्राणा मुकला ॥१०॥
अठराभार वनस्पती फ़ुली फ़ळी वोळती । बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती ।
ज्या घरीं कुलस्त्रिया राज्य राणीव संपत्ती । हें सुख सांडुनियां कासया योग सेविती ॥११॥
हे सुख सांडूनियां कोण फ़ळ तयासी । कपाट लंघुनियां योगी ध्याती कवणासी ।
योग तो सांग मज कवण ध्यान मानसी । सर्वत्र गोविंदु रे ह्र्दयी ध्यायीं ह्र्षीकेशी ॥१२॥
इतुकिया उपरी रे पुत्रा घेई उपदेशु । नको भुलो येणें भ्रमें जिवित्वाचा होईल नाशु ।
क्षीरा नीरा पारखी रे परमात्मा राजहंसु । निर्गूण निर्विकार पुत्रा सेवी ब्रम्हरसु ॥१३॥
इतुकिया उपरी रे पुत्र मातें विनविता झाला । संसार सोहळा थोर कष्टी जोडला ।
पंचभुतें निवती येथे म्हणोनि विश्रामु केला । वोखटा गर्भवासु कणवा कार्या रचिला ॥१४॥
गर्भीची यातना रे पुत्रा ऎके आपुल्या कानीं । येतों जातां येणें पंथें सांगाती नाहीं रे कोणीं ।
अहंभावो प्रपंचु पुत्रा सांडी रे दोन्ही । चौर्‍यांशी जीवयोनी प्रवर्तले मुनिजन तत्क्षणीं ॥१५॥
वाहातां महापुरीं रे पुत्रा काढिले तुज । राक्षिलासी प्रसिद्ध सापडलें ब्रम्हबीज ।
मग तुज ओळखी नाहीं कां रे नेणसी निज । आपेंआप सदगुरु कृपा करील सहज ॥१६॥
उपजत रंगणा रे पुत्रा तुवां जावें वना । बैसोनि आसनीं रे पाहे निर्वाणीच्या खुणा ।
प्राणासी भय नाहीं तापत्रयाचाराणा । मग तुज सौरसु पाहा रे परब्रम्हिच्या खुणा ॥१७॥
बैसोनी आसनी रे पुत्रा दृढ होई मनीं । चेतवी तुं आपणापें चेतविते कुंडलिनी ।
चालतां पश्र्चिम पंथें जाई चक्र भेदुनी । सतरावी जीवनकळा पाहे आत्मा हा चिंतुनी ॥१८॥
मग तूं देखसी त्रिभुवन स्वर्ग मृत्यु पाताळ । नको भुलों येंणें भ्रमें सांडीं विषय पाल्हाळ ।
आपणापें देखपा रे स्वरुप नाहीं वेगळें । परमात्मा व्यापकु रे पाहा परब्रम्हा सांवळें ॥१९॥
इतुकिया उपरी रे पुत्रा ते विनवी जननी । परियेसी माउलिये सन्तोषलों तत्क्षणीं ।
इंद्रायणी महातटीं विलासलों श्रीगुरुचरणीं । बोलियेले ज्ञानदेवो सन्तोषलों वो मनीं ॥२०॥
*
श्रीगुरु देवराया प्रणिपातु जो माझा । अनादि मूळ तूंचि विश्‍वव्यापक बीजा ।
समाधि घेई पुत्रा स्वानंदाचिया भोजा । पालखी पहुडलिया नाशिंवत रे माया ॥१॥
जाग रे पुत्रराय जाई श्रीगुरुशरण । देह तूं व्यापिलासी चुकवी जन्ममरण ।
गर्भवासु वोखटा रे तेथें दु:ख दारुण । सावध होई कां रे गुरुपुत्र तूं सुजाण ॥२॥
मदालसा म्हणे पुत्रा ऎक बोलणें माझे । चौर्‍यांशी घरामाजी मन व्यामुळ तुझें ।
बहुत सिणतोसि पाहतां विषयासीं वांझे । जाण हें स्वप्नरुप येथें नाहीं बा दुजें ॥३॥
सांडी रे सांडी बाळा सांडी संसारछदु । माशिया मोहळ रे रचियेला रे कंदु ।
झाडुनि आणिखी नेला तया फ़ुकटचि वेधु । तैसी परी होईल तुज उपदेशें आनंदु ॥४॥
सत्व हे रज तम तुज लाविती चाळा । काम क्रोध मद मत्सर तुज गोविती खेळा ।
यासवें झणें जासी सुकुमारा रे बाळा । अपभ्रंशी घालतील मुकशील सर्वस्वाला ॥५॥
कोसलियानें घर सुदृढ पैं केलें । निर्गमु न विचारिता तेणें सुख मानियेलें ।
झालें रे तुज तैसें यातायाती भोगविलें । मोक्षव्दार चुकलासी दृढकर्म जोडलें ॥६॥
सर्पे पै दर्दुर धरियेला रे मुखीं । तेणेंहि रे माशी धरियेली पक्षी ।
तैसा नव्हे ज्ञानयोगु आपाअपणातें भक्षी । इंद्रियां घाली पाणी संसारी होई रे सुखी ॥७॥
पक्षिया पक्षिणी रे निरंजनीं ये वनीं । पिलिया कारणें रे गेली चराया दोन्ही ।
मोहोजाळें गुतली रे प्राण दिधले टाकुनी । संसार दुर्घट हा विचारु पाहे परतुनी ॥८॥
जाणत्या उपदेशु नेणता भ्रांती पडिला । तैसा नव्हे ज्ञानप्रकाशु ज्ञानदेवो अनुवादला ।
अनुभवी गुरुपुत्रा तोचि स्वयें बुझाला । ऎक त्या उद्धरणा गायक सहज उद्धरला ॥९॥

निवडक अभंग संग्रह

संकलित
Chapters
श्लोक ३ रा निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्णजन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन - ज्ञानेश्‍वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम । बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी