Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

इस्लामाच्या आगमनानंतर 6

एक प्रकारे भारतवर्षात सर्व स्त्रियांची तीच दशा होती. गुजराती लोकगीत, स्त्रीगीते आहेत, त्यांतूनही आपल्याकडील ओव्यांत स्त्रियांच्या जीवनाचे असे चित्रण आहे तसेच आहे, करुणा असेच ते चित्र आहे. गुजरातेतही स्त्रियांना एक प्रकारे मोकळे जीवन आहे. खेड्यापाड्यांतील स्त्रिया कामाला जातात, कष्ट करतात. तिकडे गरबा-गीते वगैरे स्त्रियांचे नृत्य प्रकार आहेत. आपणाकडे फुगड्या वगैरे स्त्रियांचे नाना खेळ आहेत. परंतु गरबानाचासारखे सुंदर प्रकार आपणाकडे नाहीत. सामुदायिक नृत्याचे प्रकार, नाना ऋतूंची वर्णने, कृष्णाची गाणी हे सारे प्रकार गरबा नृत्यातून येतात.

दक्षिण हिंदुस्थानातील मंदिरातून देवदासी असत. त्या देवासमोर नृत्यगीतादी कलाप्रदर्शन करायच्या. दक्षिणेकडे अनेक घराण्यांतून मुलींना संगीत शिकवण्याची पद्धत असे. संगीताला तिकडे मान, नृत्यासही. परंतु या गोष्टी सर्रास अशा नसत. अपवादात्मकच. एकंदरीत जीवन चुलीजवळचेच. बाहेरच्या व्यापक जीवनाचा त्यांना स्पर्श नसे. उत्सव, यात्रा, समारंभ या वेळेसच बाहेरची हवा. रोज देवदर्शनास जावे ; नदीवर जावे ; परंतु सार्वजनिक जीवनात स्थान नसे. पुरुषांप्रमाणेच स्त्रीला वाटे की, पुरुषांच्या सेवेतच माझी कृतार्थता. स्वतःला जणू तिने शून्य केले होते. “स्त्रिया यशाची शक्ती” असे सावित्रीगीतात म्हटले असले, तरी लगेच पुढे “भ्रताराची करिती भक्ती” असा चरण आहे. स्त्रिया धीर देणार्‍या, कोंडयाचा मांडा करणार्‍या, घरी आल्यावर तुम्हांस सुखशान्ती देणार्‍या. जगात कोठे आधार नसला तरी घरी आहे. घरी तेल नसले तरी प्रेमस्नेहाचा दिवा पाजळून स्त्री बसलेली आहे. स्त्रीची शक्ती जगात गाजली नाही, तरी जीवनात ती अनुभवाला येते. पतंग जगाला दिसतो, परंतु त्याला नाचवणारा तो बारीक धागा असतो. स्त्रीचा तो आधार तुमच्या यशाचा पाया असतो. स्त्रीचा असा महिमा असला तरी तिच्या संपूर्ण जीवनाचा विकास आम्ही कधी पाहिला नाही. स्त्रियांनीही जे समाजाने दिले त्यांतच समाधान मानले. त्यांनी बंड केले नाही.