Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

वेदोत्तरकाल 1

वेदकालामध्ये भारतीय स्त्रियांची प्रतिष्ठा दिसते. उपनिषदांतही त्यांचा महिमा आहे. याज्ञवल्क्य आपली मालमत्ता उभय पत्‍नींना देऊन वनात जायला निघतो. तर त्याची एक पत्‍नी त्याला म्हणते “ही संपत्ती जर त्याज्य असेल, तर ती मला काय करायची ? जे सुख तुम्ही जोडू इच्छिता, तेच मलाही हवे आहे.” स्त्रिया तत्त्वज्ञानाच्या चर्चा करतात ; राजदरबारात वाद करतात, केवढे भव्य हे दृश्य ! परंतु स्त्रियांचा महिमा हळूहळू कमी होत आला असावा. गीत ‘स्त्रियोवैश्यास्तथा शूद्राः’ असा उल्लेख करते. म्हणजे स्त्रियांना स्वतंत्रपणे मोक्ष मिळणे अशक्य, अशी भावना होऊ लागली होती ? स्त्रिया म्हणजे का पापयोनी ?

जी स्त्री सर्व संसाराची आधार, ती तुच्छ का ? रामायण, महाभारतकाळी स्त्रियांचे स्वयंवर होत असे. स्वतःला पती शोधायला सावित्री जाते. स्त्रिया प्रोढ असत. स्त्रियांचे मौजीबंधनही होई. त्या गुरुगृही शिकायला राहत. सीता गोदावरीच्या तीरी संध्या करी, असे रामायणात वर्णन आहे. म्हणजे वेदविद्येचा त्यांना अधिकार होता. ‘ब्रह्मवादिनी’ अशी विशेषणे सीता, द्रौपदी यांना लावलेली आढळतात. रामाच्या मुद्रिकेवरचे नाव सीता वाचते. स्त्रिया राजकारणातही लक्ष घालीत. त्यांना युद्धकलेचेही शिक्षण असे. दशरथाबरोबर कैकयी रणांगणात जाते. सत्यभाभा नरकासुराला मारते. सुभद्रा रथ उत्तम तर्‍हेने हाकी. क्षत्रियकन्यांना हे सारे शिक्षण मिळत असे का ? इतर कलांचेही शिक्षण त्यांना मिळे. उत्तरेला नृत्य शिकवायला अर्जुन राहतो. चित्रकलाही त्या शिकत. उषा अनिरुद्धाला स्वप्नात पाहते. तिची मैत्रीण चित्रलेखा तिला जगातील सर्व तरुणांची चित्रे काढून दाखवते. तिचे नाव चित्रलेखा. क्षत्रिय मुलींना हे सारे सांस्कृतिक शिक्षण मिळत असेल. ब्राह्मण कन्या काय करीत ? त्याही गुरुगृही शिकत. गुरुगृही त्या मुलींना अनुरुप शिक्षण मिळत असावे. महाभारतात उद्योगपर्वात एक तपस्विनी म्हणतेः “मी सत्तर वर्षांची होऊन गेले. अनेक आश्रमांतून राहिले, ज्ञान मिळवले.” सत्तर वर्षे ती अविवाहित होती. सत्तरी ओलांडल्यावर ती चिरयुवती विवाह करु इच्छिते. स्त्रियाही का वाटेल तितके शिकत, इच्छेनुरुप विवाह करीत ?