Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

इस्लामाच्या आगमनानंतर 3

खेड्यापाड्यांतून स्त्रिया मोकळेपणाने वावरत. शेतात कामाला जात. सणावरी यात्रेला जात. नागपंचमी आली तर झाडाला झोका बांधून घेत. संक्रान्तीच्या दिवशी काही ठिकाणी या गावाच्या, त्या गावाच्या स्त्रिया सीमेवर जमायच्या नि उखाळ्या पाखाळ्या काढून गमतीने भांडायच्या. खेळ खेळायच्या. नाना प्रकार आहेत. महाराष्ट्रातील स्त्रियांचे हे स्वतंत्र जीवन हा एक विशेष आहे. वारकरी पंथाने स्त्रियांत अधिक मोकळेपणा निर्माण केला. साधुसंतांच्या कीर्तनाला स्त्रिया जात. वारकरी पंथाची दीक्षा त्या घेत. गळ्यात माळ घालीत. पंढरपुरला पायी वारीला जात. ही अपूर्व वस्तू आहे. खांद्यावर पताका नि पडशी, हातांत टाळ, अशा स्वरुपात या भगिनी जात. मुक्ताबाई, जनाबाई, ही नावे महाराष्ट्राच्या भक्तिप्रेमाची. अनेक स्त्रियांनी अभंग रचले.

वरच्या वर्गातून स्त्रिया थोडयाफार शिकत असाव्यात असे वाटते. चंद्रावळीने सावित्रीचे अभंग रचले. तिला लिहिता येत नसेल ? ही चंद्रावळी कोण, कधी झाली, फाऱशी माहिती नाही, परंतु मराठीतील एक सुंदर खंडकाव्य तिने निर्मिले, जे परंपरेने पवित्र झाले. कहाण्यांचे वाङमय तर स्त्रियांनीच रचले असावे. त्यांतील भाषा फार सुंदर. कहाण्या फार प्राचीन काळापासून मराठीत आहेत. ओवी वाङमयही मराठीत फार प्राचीन काळापासून आहे. स्त्रियांनी हे वाङमय तोंडातोंडी परंपरागत आणले नि जिवंत ठेवले. कथा-पुराणश्रवण हेच त्यांचे ज्ञानाचे साधन. परंतु काही काही घराण्यांतून स्त्रिया शिकत असाव्यात. समर्थ रामदासस्वामी एका घरी भिक्षेला गेले. एक सोवळी भगिनी एकनाथी भागवत वाचीत होती.

“काय वाचता ?” समर्थांनी विचारले.

“नाथांचे भागवत” त्या माउलीने उत्तर दिले.

“अर्थ समजतो का ?” पुन्हा समर्थांचा प्रश्न.

त्या भगिनीने काय उत्तर दिले माहीत नाही. परंतु पुढे समर्थांची ती शिष्या झाली. समर्थांचे अनेक आश्रम भगिनी चालवीत. वेणाबाई, आक्काबाई इत्यादी समर्थांच्या थोर शिष्या. वेणाबाईने ‘सीता-स्वयंवर’ हा सुंदर ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या सर्व भगिनी लिहिणार्‍या -वाचणार्‍या असल्याच पाहिजेत.