Get it on Google Play
Download on the App Store

वेदोत्तरकाल 4

असे स्थित्यन्तर व्हायला काय कारण ? लहानपणीच लग्न लावले तर मुलगी सासरी जाऊ-येऊ लागते. लहानपणी झाड उपटून दुसरीकडे लावले तर नीट जगते. मोठेपणी ते नीट मुळे धरु शकत नाही. त्या वेळेस एकत्र कुटुंबपद्धती होती. ती नांदवण्यासाठी का हा प्रयोग सुरु झाला ? सासरच्या मंडळीबद्दल, तेथीर दीर, नणंदा, भावजया यांच्याबद्दल लहानपणापासून परिचयामुळे प्रेम वाटेल, असे का प्रयोग करणार्‍यांस वाटू लागले ? ते काही असो, अशी पद्धत सुरु झाली खरी.

पुराण-कीर्तन-श्रवण हेच ज्ञानाचे साधन राहिले. वेदांचा अधिकारच गेला. प्रत्यक्ष शिक्षण संपले. अप्रत्यक्ष ज्ञान कळेल तेवढेच. अपवाद म्हणून स्त्रिया पंडित होत असतील. शंकराचार्य़ व मंडनमिश्र यांच्या वादविवादाच्या वेळेस मंडनमिश्रांच्या पत्‍नी अध्यक्ष असते. तिला का मंडनमिश्रांनी शिकवले होते ? काही घराण्यांतून ज्ञानोपसाना सुरु असेल.

कालिदासाची पत्‍नी शिकलेली होती परंतु तो अज्ञानी होता. शरमेने तो निघून गेला. त्याने उपासना केली. ज्ञान मिळवून घरी परत आला. त्याने दार ठोठावले. ‘कोस्ति ? कोण आहे’ असा पत्‍नीने आतून प्रश्न केला. “अस्ति कश्चित् वाग्विलासः” वाग्देवतेजवळ क्रीडा करणारा आहे कोणीतरी, असे त्याने उत्तर दिले. आणि पुढे या चार शब्दांतील एकेक घेऊन त्याने काव्यांचा आरंभ केला, अशी दन्तकथा आहे.

संस्कृत भाषा स्त्रियांना समजे, परंतु बोलता येत नसे. कारण शिक्षणच बंद झाले. वेदांमध्ये मंत्र लिहिले. उपनिषदांतून त्या चर्चा करताना दिसतात, परंतु संस्कृत नाटकांतून स्त्रिया संस्कृत न बोलता प्राकृत बोलतात. संस्कृत ही वरिष्ठांची भाषा राहिली. जे शिकत त्यांची भाषा. वैश्य, शूद्र, स्त्रिया यांना संस्कृत शिक्षणच मिळेणासे झाले.

सर्व बाजूंनी आत्म्याचा हा असा कोंडमारा होत होता. पतिव्रत्याचे स्तोम माजले. सती जाण्याची चाल पडली. पुरुषाने अनेक विवाह केले तरी परवानगी, एवढेच नव्हे तर त्याने पत्‍नी वारल्यावर लवकरच पुन्हा विवाह करावा म्हणून धर्माज्ञा. आणि स्त्रीने काय करावे ? तिला का भुका नाहीत ? परंतु तिने व्रतस्थ जीवन कंठायचे. ती संसारातील संन्यासिनी. तिने सारे काम करायचे. ती सोज्वला, सोवळी. तिने इतरांची बाळंतपणे करावी, आजार्‍याची सेवा करावी, स्वयंपाक करावा, लहान मुलेबाळे घरात असतील त्यांना संभाळावे. मुलाबाळांची हौस तिने देवाला मूल मानून भागवून घ्यावी. तो बाळकृष्ण. त्याला कुंची घालील, साखळी घालील. तो तिचा मुलगा. देवाची ती आई होते. वरिष्ठ वर्गांतून तरी स्त्रियांना असे हे प्रखर वैराग्य शिकवण्यात आले. ती परंपराच पडली.