Get it on Google Play
Download on the App Store

वेदोत्तरकाल 3

स्त्रीला स्वातंत्र्य योग्य नव्हे, असा दंडक झाला. ती अबला बनली. लहानपणी पिता रक्षक, पुढे पती रक्षक, वृद्धावस्थेत पुत्र रक्षक. ती एक रक्षणार्ह वस्तू बनली. आणि जिचे रक्षण करायला दुसरे लागतात, तिला स्वतःची काय किंमत ? स्त्री म्हणजे जणू एक इस्टेट, मालमत्ता, एक चीज, तिचा आत्मा कुठे उरला ?

‘यत्र नार्यस्तू पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’

जेथे स्त्रियांची प्रतिष्ठा ठेवण्यात येते तेथे देवता रमतात, असे जरी स्मृतीतून उल्लेख असले तरी ते फार मोठी मजल मारताहेत असे नाही. स्त्रियांची पूजा म्हणजे त्यांचे स्वातंत्र्य नव्हे. त्यांना नीट वस्त्र द्यावे, दागदागिना द्यावा, त्यांना संतुष्ट ठेवावे, असे स्मृती सांगते. थोडक्यात, स्त्रिया म्हणजे बाहुल्या. खायला प्यायला-ल्यायला मिळाले की कृतार्थता मानणार्‍या. स्त्रियांना का याहून थोर आनंद नको होते ? वैचारिक आनंद, ज्ञानाचा आनंद, तो का त्यांना नको होता ?

‘दारिका हृदयदारिका पितुः’ मुलगी म्हणजे पाप, तिच्या लग्नाची चिंता, असे वातावरण दिसू लागते. यास्कांचे निरुक्त जवळजवळ अडीच हजार वर्षापूर्वीचे. परंतु त्यातही दारिका दारिका म्हणजे मुलगी. यास्काचार्यांनी या शब्दाचे अनेक धात्वर्थ दिले आहेत. परंतु हाही दिला आहे. अजूनही तीच स्थिती आहे. मुलीचे लग्न कसे करायचे, हीच चिंता आज हजारो वर्षे भारतात आहे. मुलाप्रमाणे मुलगी मोकळेपणाने वाढली नाही, शिकली नाही. तिला विवाह करण्याचे वा न करण्याचे स्वातंत्र्य नाही, अशी ही स्थिती दिसू लागते.