Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

रंग माझा वेगळा

सुवर्णा सोनवणे
चाळीसगाव
७७४४८८००८७

भूतलावर विविध विचारशैली बाळगणारे लोक राहतात .स्त्री असो वा पुरुष प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तीमत्व हे फक्त त्याच्या त्वचेच्या रंगावर अवलंबून नसते तर ,त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक विचारांच्या वलयावर अवलंबून असते .

गोऱ्या रंगाची व्यक्ती जर नकारात्मक विचारासरणीची असेल तर त्या वक्तीचे प्रभूत्व काही काळासाठी समोरच्या व्यक्ती वर पडते .पण जर एखादी व्यक्ती जर सावळी असेल सकारात्मक विचारसरणीची असेल तर तिच्या विचारांचा प्रभाव चिरकाळ टिकणारा असेल.

आपण नेहमीच पाहतो सतत  सकारात्मक चिंतन करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा नेहमीच आनंदी आणि हसतमुख दिसतो सत्तरीत सुध्दा ते चिरतरुण आणि उमेदी  भासतात . या उलट नकारात्मक चिंतन करणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर नेहमीच चिंता आणि आठ्या दिसतात . तिशीतच त्या साठ वर्षाच्या म्हाताऱ्या भासू लागतात .

एखादी व्यक्ती जर तपस्वी आणि अध्यात्मिक अभ्यास करणारी असेल तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर शांतता आणि तेजस्विता सहज जाणवते . त्या व्यक्तीशी पाच मिनटे बोलून मन हलके होते . असा प्रभाव सततच्या अध्यात्मिक सकारात्मक चिंतनाने पडत असतो .

मानवी जीवनात विचारांना फार महत्त्व आहे . आपले सुख आणि दु:ख आपल्या विचार करण्याच्या पध्दतीवर अवलंबून असते . सततच्या सकारात्मक चिंतनाने आपल्या भोवताली एक सकारात्मक वलय तयार झालेले असते . आपल्या संबंधातील संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते नेहमीच जाणवत असते . सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्ती सहसा कोणाला दुखवित नाहीत .उलट त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे दु:ख हलके होत असते . अशा व्यक्ती सतत आनंदी असतात आणि दुसऱ्यानाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

सकारात्मक विचारसरणीच्या व्यक्ती आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला आनंदाने स्वीकारतात म्हणून दु:ख त्यांच्या पासून कोसभर दुरच राहते .

या उलट नकारात्मक विचारसरणीच्या व्यक्तींच्या भोवताली आपोआप नकारात्मक वलय तयार होत असते .त्यांच्या संबंध संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना ते नेहमीच जाणवत असते .अशा व्यक्ती ना स्वतः आनंदी राहतात ना दुसऱ्यांना आनंद देऊ शकतात . अशा नकारात्मक वलयांच्या  व्यक्तींच्या चेहऱ्यावर नेहमीच आठ्या आणि प्रश्न चिन्ह दिसते .सुख त्यांच्यापासून कोसभर दुरच राहते .

सुख आणि दु:ख हे आपल्या विचारांवर अवलंबून असते .

उदा . रमेशला त्याच्या आईने दुकानातून साखर आणायला सांगितले . दुकान फार काही दुर नव्हते . रमेश ने कीबोर्ड ला अडकवलेली चावी काढली आणि मोटरसायकल सुरु करु लागला तेव्हा त्याच्या लक्षात येते गाडीचे चाक पंचर आहे . आता अशा परिस्थितीत आपण सकारात्मक आणि नकारात्मक मनस्थितीचा रमेश कशा पध्दीने प्रतिक्रिया देईल हे आपण पाहू .

सकारात्मक विचारांचे वलय असलेला रमेश स्वतःच्या मनातच  म्हणेल ," चला जाऊ थोडं पायी ,दुकान काय फार दूर नाही . त्यानिमित्ताने थोडे पायी फिरणे होईल .

या उलट नकारात्मक विचारांचे वलय असलेला रमेश मनात म्हणेल ," गाडीचे चाक पण काय आत्ताच पंचर व्हायचे होते . आता मला पायपीट करतच दुकानात जावे लागणार , माझं नशीबच खराब ". दुकान पण किती लांब आहे ! उदास होऊन पायी जाऊन साखर आणेल .

आपण पाहिले सकारात्मक आणि नकारात्मक विचारांच्या प्रभावाचे वलय आपल्याला सुख आणि दु:खाची जाणीव करून देत असते.

सकारात्मक विचार सरणीच्या व्यक्ती नेहमीच आपल्या संबंधात आणि संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. ते सहसा आपले दु:ख इतरांसमोर मांडत नाहीत . ते दु:खाचा सतत विचार करत बसत नाही त्यातून बाहेर पडण्यासाठी पर्याय शोधित असतात . म्हणून दु:ख त्यांच्यापासून कोसभर दूरच राहते .

या उलट नकारात्मक विचारसरणीच्या व्यक्ती सतत आपल्याच दु:खाचे चिंतन करत बसतात . आणि सर्वांना सांगत बसतात . समोरची व्यक्ती सकारात्मक विचारांची असेल तर सांत्वन करुन त्या बाहेर पडण्याचा मार्ग दाखवितात .पण जर नकारात्मक विचारसरणी च्या व्यक्ती असतील तर खोटं सांत्वन करून आपण सांगितलेल्या दु:खाची मिठाई बनवून इतर लोकांच्या वाटत फिरतात . आणि आपण किती बिचारे आहोत याचा पाठा वाचत फिरतात .कोणी आपल्याला बिचारे म्हणेल त्या पेक्षा आपले दु:ख आपले आसू देवाला दाखवा . देव मानत नसाल तर झाडांशी बोला . ते आपल्या दु:खाची मिठाई बनवून खाणार नाहीत आणि वाटणार ही नाहीत . किंवा एका कागदावर लिहा आणि कागद फाडून टाका . आणी विसरून जा मन हलके झाल्याचं समाधान मिळेल .

आपले दु:ख नेहमी सकारात्मक विचार सरणीच्या व्यक्तींसमोर मांडा .म्हणजे त्यापासून मुक्त होण्याचा मार्ग मिळेल . त्याहून उत्तम म्हणजे स्वतः सकारात्मक बना आपला मार्ग स्वतः शोधा . पहा करून बदललेले वलय आणि बदललेला सकारात्मक रंग तुम्हाला आणि इतरांना नक्कीच सुख आनंद देईल .

मग तुमच्या ओठी सहज शब्द येतील ,'साऱ्या जगात मी आगळा, सर्वांपेक्षा रंग माझा वेगळा'.