Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

स्वागत नव्या पुस्तकांचे २


आरोग्यविषयक मार्गदर्शन करणारे अत्यंत संग्राह्य व उपयुक्त पुस्तक
BCG पासून ECG पर्यंत

आजकाल धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ आहे? लक्ष द्यायचे म्हणजे नेमके काय करायचे? कोणत्या वयात कोणती काळजी घ्यायची? निरनिराळे ऋतू, अवस्था, प्रवास, अपघात या वेळी कोणती काळजी घ्यावी?प्रथमोपचार कसे करावेत? औद्योगिक क्षेत्रात काम करतांना कोणती काळजी घ्यावी? या सर्वांची उत्तरे एकत्रितपणे देणारे पुस्तक म्हणजे डॉ. व्यंकटेश रामचंद्र जंबगी यांचे 'BCG पासून ECG पर्यंत' हे होय!

पुस्तकाचे नावच इतके समर्पक आहे की, त्यातून लगेच उलगडा होतो की, या पुस्तकात काय असेल? डॉ. व्यंकटेश जंबगी यांना वैद्यकीय व्यवसायाचा प्रदीर्घ अनुभव आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयात पंधरा वर्षे अध्यापनही केले आहे. या सगळ्या अनुभवातून समाजाला आरोग्याविषयी काही प्रबोधन करण्याची तळमळ या पुस्तकातून दिसून येते. धकाधकीच्या आयुष्यात आपण अनेक गोष्टी विसरतो त्या सर्वांची आठवण हे पुस्तक करून देईल. आपल्याला हे पुस्तक मित्रा इतके प्रिय वाटेल. 'BCG पासून ECG पर्यंत' हे पुस्तक आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देत असल्यामुळे संग्राह्य आहे.
 
समाजातील स्पर्धात्मक जीवनशैली, वाढते ताणतणाव, पाश्चात्त्य जीवनाचा प्रभाव, चंगळवादी दृष्टिकोन वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याची जपणूक करण्यासाठीसुद्धा हे पुस्तक उपयुक्त असून आपल्या प्रियजनांना, मित्र-मैत्रिणींना भेट देण्यासाठी अत्यंत उत्कृष्ट आहे.       

पृष्ठे - १८४        किंमत - २६०       ISBN - 978-93-87127-02-9
-------------------------------------------------------------------
 
मानवी संवेदनांचा तरल अविष्कार करणारा कवितासंग्रह
पावसाचं वय!

कवित्व असावे निर्मळ । कवित्व असावे सरळ ।।
कवित्व असावे प्रांजळ । अन्वयाचे ।।

समर्थ रामदास स्वामींच्या या उक्तीप्रमाणे डॉ. व्यंकटेश रामचंद्र जंबगी यांची कविता सरळ आहे. जे मनात येईल ते शब्दरुपाने अत्यंत साध्या आणि सुबोध भाषेत लिहिले आहे.  

पहिल्याच कवितेला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी दाद दिल्याने त्यांचा उत्साह वाढला आणि त्यांची कविता बहरत गेली. निरनिराळ्या काव्यवाचन व काव्यलेखन स्पर्धेत पारितोषिके मिळाली. अखिल भारतीय साहित्य संमेलनातही दोनवेळा (आळंदी व सातारा) काव्यवाचनाची संधी मिळाली. आकाशवाणी सांगली येथून 'साहित्य सौरभ' कार्यक्रमात काव्यवाचनाचे प्रसारण झाले.

'पावसाचं वय' हे फार समर्पक नाव दिले आहे. पावसापूर्वी आकाशात दाटणा-या मेघांप्रमाणे मनात विचार दाटत असतात. मग शब्दांचा पाऊस पडतो. बालपणीचा पाणी उडवणारा पाऊस. तरुणपणी भिजवणारा पाऊस. प्रौढपणी सावध करणारा पाऊस आणि वृद्धपणी केवळ खिडकीतूनच पाहता येणारा पाऊस. असा निरनिराळ्या वयातला निरनिराळा पाऊस आपण अनुभवत असतो. डॉ. व्यंकटेश रामचंद्र जंबगी यांच्या कवितेतील शब्द कधी रिमझिम पावसासारखे तरल, क्वचित रौद्र तर कधी खळाळणारे असे आहेत. तरीही प्रत्येकाच्या मनातली जाणीव अशीच असावी हा भास मात्र जाणवतो.   

पृष्ठे - ६८        किंमत - ८०      ISBN - 978-81-934308-3-5
--------------------------------------------------------------
 
वक्तृत्व, निबंध लेखन व सूत्रसंचालन यासाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक
विषय विविधा

व्यक्तिमत्व विकास हा आजकाल अत्यंत जरुरीचा विषय झाला आहे. प्रेझेन्टेशनचा जमाना आहे. स्वतःला सिद्ध करायचे असेल तर बोलण्याची कला साधली पाहिजे. सभाधीटपणा पाहिजे. लेखन मुद्देसूद पाहिजे. सूत्रसंचालन करता आले पाहिजे. हे सगळे एकत्र करण्याची किमया डॉ. व्यंकटेश रामचंद्र जंबगी यांनी साधली आहे. असे मार्गदर्शन एकत्रित मिळणे दुरुपास्त आहे.

'विषय विविधा' या पुस्तकामध्ये त्यांनी काही विभाग पाडले आहेत. व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र, कला, क्रीडा, संकीर्ण याप्रमाणे त्यांनी विविध विषय घेतले आहेत. वक्तृत्व अथवा निबंधासाठी कोणताही विषय असू दे या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल. प्रवास वर्णन कसे करावे याचेही मार्गदर्शन केले आहे.  

पुस्तकाच्या पहिल्या भागात वक्तृत्व कसे असावे? निबंध लिहितांना कसे मुद्देसूद लिहावे? सूत्रसंचालन कसे आकर्षक करता येईल? याचे विवेचन इतके सोपे करून सांगितले आहे की, वाचकांना वाटेल अरे! हे किती सोपे आहे. आपणसुद्धा असे करू शकतो.

डॉ. व्यंकटेश रामचंद्र जंबगी हे स्वतः एक उत्तम वक्ते आहेत त्यामुळेच ते 'विषय विविधा' या आगळ्यावेगळ्या पुस्तकाचे लेखन करू शकले. हे पुस्तक घरातील सर्वांसाठी संग्राह्य तर आहेच पण शाळा कॉलेजच्या विद्यार्थांसाठी निबंध लेखन, सूत्रसंचालन आणि वक्तृत्वासाठी सर्वोत्तम मार्गदर्शक व एक अनमोल ग्रंथभेट निश्चितच ठरणार आहे.  

पृष्ठे - १८४        किंमत - २६०       ISBN - 978-93-87127-03-6